scorecardresearch

स्वस्त आणि दूरगामी परिणाम करणारा प्रकल्प ;उल्हास नदी जलपर्णीमुक्त मोहिमेमुळे राज्याला दिशा

ठाणे: ठाणे जिल्ह्यातील लाखो नागरिकांची पाण्याची तहान भागवणाऱ्या उल्हास नदीवर वर्षभरापूर्वी जलपर्णी मुक्तीची मोहीम राबवण्यात आली. वर्षभर सुरू असलेल्या अथक प्रयत्नांनंतर उल्हास नदी जलपर्णी मुक्त झाली आहे.

सागर नरेकर, लोकसत्ता

ठाणे: ठाणे जिल्ह्यातील लाखो नागरिकांची पाण्याची तहान भागवणाऱ्या उल्हास नदीवर वर्षभरापूर्वी जलपर्णी मुक्तीची मोहीम राबवण्यात आली. वर्षभर सुरू असलेल्या अथक प्रयत्नांनंतर उल्हास नदी जलपर्णी मुक्त झाली आहे.

 कोटय़वधी रुपयांचे कंत्राट जाहीर करून अत्याधुनिक यंत्राद्वारे नदीपात्रातील जलपर्णी काढण्याचे प्रयोग अपयशी ठरले आहेत. त्याचवेळी उल्हास नदीच्या जलपर्णी मुक्तीसाठी अनोखी पद्धत वापरली गेली. सगुणा रुरल फाऊंडेशनच्या माध्यमातून हा प्रयोग राबवला गेला. या पद्धतीत ग्लायफोसेटचा नियंत्रित वापर केला गेला. त्याचे नमुने घेऊन शासकीय आणि खासगी प्रयोगशाळांमध्ये चाचणी केली गेली. त्याचा कोणताही परिणाम मानवी शरीरावर आणि जलचर, नदीवर अवलंबून असलेल्या जीवसृष्टीवर होत नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्याचा संपूर्ण नदीसाठी वापर करण्यात आला. जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर स्वत: या प्रयोगावर लक्ष ठेवून होते. या पद्धतीमुळे अवघ्या काही लाख रुपयांमध्ये नदी जलपर्णी मुक्त झाली. त्यामुळे या प्रयोगाची चर्चा सध्या राज्यभर सुरू आहे.

सध्या राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात गेल्या  आठवडय़ात मुंबईतील पवई तलाव, पुण्यातील मुळा आणि मुठा नदीच्या संवर्धनाचा विषय स्थानिक लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून उपस्थित करण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी उल्हास नदीचा जलपर्णीमुक्तीची मोहीम यशस्वी ठरल्याचे सभागृहाला सांगितले. त्यावेळी राज्यातील इतर नद्यांचा प्रश्न कसा सोडवणार याबाबत लोकप्रतिनिधींकडून विचारणा केली गेली. त्यावर एकनाथ शिंदे यांनी उल्हास नदीचा पॅटर्न राज्यातील इतर जलपर्णी असलेल्या नद्यांवर राबवला जाईल, असे सूतोवाच केले.  मोहीम सकारात्मक दिसत असून नदी याहून अधिक स्वच्छ ठेवण्यासाठी विविध शहरांच्या नाले, औद्योगिक सांडपाणी रोखायला हवे, असे   पर्यावरणप्रेमी शशिकांत दायमा यांनी सांगितले. 

जलपर्णी मुक्तीचे दिशादर्शन

ल्ल  ज्या – ज्या नगरपालिका महापालिका क्षेत्रांमध्ये वाहणाऱ्या नद्यामध्ये जलपर्णीची समस्या वाढली आहे. अशा नगरपालिका महापालिका यांच्या अधिकाऱ्यांना हा प्रकल्प राबवणाऱ्या संस्थेची भेट घालून दिली जाईल, असे एकनाथ शिंदे यांनी नगरविकास मंत्री या नात्याने जाहीर केले आहे. जलपर्णी मुक्तीच्या प्रयोगानंतर गेल्या काही महिन्यांमध्ये उल्हास नदीतील जलपर्णी दिसून आली नाही. पाणीही स्वच्छ असल्याची माहिती उल्हास नदी बचाव कृती समितीचे सदस्य आणि वरद गावातील ग्रामस्थ अश्विन भोईर यांनी दिली आहे.

ल्ल जागतिक जलदिनाच्या दिवशी नदीची स्थिती पूर्वीसारखी स्वच्छ दिसत असल्याने नदीकिनारी राहणाऱ्या विविध गावातील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. मुळा, मुठा तसेच मुंबईतील पवई पट्टय़ातील काही अभ्यासकांनीही उल्हास नदीतील पथदर्शी प्रयोग अभ्यासण्याची इच्छा व्यक्त केली आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनातील सूत्रांनी दिली.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Cheap far reaching projects ulhas river jalparnimukta campaign directs state river contract announced amy

ताज्या बातम्या