scorecardresearch

लग्नाचे आमिष दाखवून कल्याणमधील तरूणाची १५ लाखाची फसवणूक

विवाह संकेतस्थळावर वधूच्या मागणीसाठी नाव नोंदणी केलेल्या एका तरूणाला एका भुऱट्या तरूणीने संपर्क केला.

विवाह संकेतस्थळावर वधूच्या मागणीसाठी नाव नोंदणी केलेल्या एका तरूणाला एका भुऱट्या तरूणीने संपर्क केला. विवाह करणार असल्याचे खोटे आमिष तरूणाला दाखविले. या माध्यमातून ओळख वाढवून तरूणाकडून महिनाभरात विविध कारणे देऊन १४ लाख ९६ हजार रूपये उकळले. आपल्याशी विवाह करणारी तरूणी भुरटी आणि तीने आपली फसवणूक केली आहे हे लक्षात आल्यावर तरूणाने खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी त्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल केला आहे.
शंकर भीमसेन ससमल (३७) अशी तरूणाची ओळख आहे. त्यांनी भारत मेट्रोमनी ओरियामेट्रोमनी या ऑनलाईन वधू वर नोंदणी संकेतस्थळावर वधू पाहिजे मागणीसाठी गेल्या महिन्यात नोंदणी केली होती. शंकर यांची संकेतस्थळावरील माहिती वाचून एका अनोळखी तरूणीने शंकर यांच्याशी संपर्क केला. आपण संकेतस्थळावर तुमची माहिती वाचल्याचे सांगितले. शंकर बरोबर त्या तरूणीेचे नियमित संभाषण होत होते. या बोलण्यातून तरूणीने आपण तुमच्याशी विवाह करणार असल्याचे शंकर ससमल यांना सांगितले.

तरूणीच्या बोलण्यावर शंकर यांनी विश्वास ठेवला. होणारी पत्नी असल्याने तिच्या आर्थिक मागण्या ते पूर्ण करू लागले. एक दिवस तरूणीने शंकर यांना संपर्क करून आपणास विमानतळावर सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले आहे. आपणाजवळ किमती सामान आहे. त्याची सोडवणूक करण्यासाठी अधिकारी आपल्याकडे १४ लाख ९६ हजार रूपये दंडात्मक रक्कम म्हणून मागतात. ती रक्कम भरल्याशिवाय सामानाची सोडवणूक होणार नाही असे सांगितले. सोबत तीनेे तीन बनावट इसम उभे केले. त्यांनी सीमा शुल्क अधिकारी म्हणून शंकर यांच्याशी संवाद साधला. त्यांनी रक्कम भरणा केल्या शिवाय सामान सोडणार नसल्याचे सांगितले. शंकर यांनी भावी पत्नीवर आलेले संकट पाहून १४ लाख ९६ हजार रूपये तिच्या बँक खात्यात ऑनलाईन पध्दतीने जमा केले.
रक्कम जमा झाल्यानंतर शंकर ससमल तरूणीशी संपर्क करू लागले. तिचा मोबाईल बंद येत होता. वारंवार संपर्क करूनही प्रतिसाद मिळत नसल्याने तरूणीने आपली फसवणूक केली. विवाह नाहीच पण, आपली फसवणूक केली आहे हे लक्षात येताच शंकर यांनी याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली. या तक्रारीवरून पोलिसांनी माहिती व तंत्रज्ञान कायद्याने गुन्हा दाखल करून घेतला. तांत्रिक माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक शरद झिने यांनी या तरूणीचा, या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Cheating youth kalyan lure marriage crime khadakpada police station amy