दिव्यांच्या माळांमध्ये भारतीय उत्पादनांना अधिक पसंती

सागर नरेकर

उल्हासनगर : दिवाळीच्या रोषणाईत कंदिलांप्रमाणेच दिव्यांच्या माळांनाही विशेष मागणी असते. आकर्षक आणि नाना प्रकारच्या चिनी माळांनी गेली अनेक वर्षे बाजारात वर्चस्व राखले होते. यंदाही चिनी उत्पादने मोठय़ा प्रमाणात दिसत आहेत. मात्र, तरीही ग्राहकांकडून भारतीय बनावटीच्या दिव्यांच्या माळांना अधिक मागणी मिळत आहे. मुंबई पट्टय़ातील स्वस्त उत्पादनांची मोठी बाजारपेठ असलेल्या उल्हासनगरात ग्राहकांप्रमाणेच विक्रेत्यांनीही स्वदेशीला अधिक महत्त्व दिल्याचे दिसून येत आहे.

गेल्या वर्षांत करोनाच्या संकटात ग्राहकांनी खिशाला हात लावत खरेदीवर मर्यादा आणली होती. यंदाच्या वर्षांत दिवाळीच्या पूर्वीच जवळपास सर्वच गोष्टींवरील र्निबध कमी केल्याने बाजार पूर्ण क्षमतेने खुला झाला आहे. त्यामुळे यंदा सर्वच बाजारात बऱ्यापैकी तेजी पाहायला मिळते आहे. दिवाळीला काही दिवस शिल्लक असल्याने ग्राहकांनी बाजारांमध्ये खरेदीसाठी गर्दी सुरू केली आहे. रोषणाईत महत्त्वाचा वाटा असलेल्या इलेक्ट्रिक माळा, दिवे यांच्या बाजारात ग्राहकांनी चांगली हजेरी लावली आहे. स्वस्त दरातील इलेक्ट्रिक बाजार म्हणून मुंबईनंतर उल्हासनगरचा बाजार ओळखला जातो. या बाजारातही विद्युत दिवे, माळा खरेदीसाठी गर्दी केल्याचे दिसते आहे. यंदाचा बाजार देशी उत्पादनांनी भरल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या दोन वर्षांपासून चिनी उत्पादनांची आवक घटल्याने देशी उत्पादनांना बाजारात स्थान मिळत आहे. या मालाच्या किमतीही तुलनेने कमी असल्याने ग्राहक या वस्तूंना पसंती देत आहेत. उल्हासनगरच्या बाजारात ७० रुपयांपासून ते ५०० रुपयांपर्यंतच्या विविध प्रकारच्या, विविध रंगांच्या माळा बाजारात उपलब्ध झाल्या आहेत. नव्या उत्पादनांप्रमाणेच जुन्या उत्पादनांनाही मागणी कायम असल्याचे विक्रेते प्रेम झमनानी यांनी सांगितले आहे.

आकर्षक आकारांना पसंती

गोल आकारातील बबल बॉल, व्हाईट बॉल, क्रिस्टल बॉल, लेड बॉल या प्रकारच्या मोठमोठय़ा माळांना ग्राहकांकडून पसंती दिली जाते आहे. शांत आणि पांढऱ्या रंगाच्या या माळांचा दर ३०० रूपयांपासून ५०० रूपयांपर्यंत आहे. सोबतच बाटलीतील आकर्षक रचना असलेल्या बॉटललाईट माळही बाजारात भाव खाते आहे. सोबतच चांदणीच्या आकाराची स्टार लाईट माळ, कंदिलाची लॅम्पलाईट माळ, फुलांची फ्लॉवर लाईट, एलईडी पाईप लाईट या प्रकारांनाही चांगली मागणी आहे.

मागणी नसल्याने चिनी माल जुनाच

दिवाळीनिमित्त विकल्या जाणाऱ्या बहुतांशी दिव्यांच्या माळा यंदाही चीनहून आयात झाल्या आहेत. ४० रुपयांपासून या माळांची सुरुवात आहे. मात्र, चिनी मालाला फारशी मागणी मिळत नसल्याने यंदा या उत्पादनांमध्ये नवीन प्रकार पाहायला मिळत नाहीत. विक्रेत्यांनीही मागणी कमी असल्याच्या शक्यतेने मर्यादित साठा मागवला आहे. चिनी बनावटीची पाच मीटर लांबीची साधी दिव्यांची माळ ४० चे ५० रुपयांना, १५ मीटर लांबीची १०० ते १५० रुपयांना तर ३० मीटर लांबीची ३०० ते ३५० रुपयांना मिळत आहे. याच दिव्यांवर चेंडू, शंख, चंद्र, चांदणी अशी टोप्या असलेली ५ मीटर लांबीची दिव्यांची माळ २५० ते ३५० रुपयांपर्यंत उपलब्ध आहे. 

यंदा चिनी माल कमी प्रमाणात असल्याने आम्ही स्वदेशी मालाचीच खरेदी केली आहे. ग्राहकांकडूनही यंदा दिवे, माळांना चांगली मागणी आहे. गणेशोत्सवात झालेले आर्थिक नुकसान दिवाळीत भरून काढण्याचा प्रयत्न करत आहोत.

– शशी भाटीया, दुर्गा इलेक्ट्रिकल, उल्हासनगर.