अंबरनाथः १०० हून अधिक दिवसांची वालधुनी  नदी स्वच्छता मोहिम  अंबरनाथ नगरपालिका आणि सामाजिक संघटनांच्या  मदतीने राबवल्यानंतर नदीची स्थिती काहीशी सुधारली होती. मात्र गेल्या तीन दिवसांपासून होणाऱ्या पावसाचा गैरफायदा घेत काही प्रदुषणकारी घटकांनी पुन्हा वालधुनी नदीत रासायनिक सांडपाणी सोडल्याचा संशय व्यक्त  होतो आहे. मंगळवारी सायंकाळनंतर वालधुनी नदीचे पात्र फेसाळले होते. दोन दिवसांपासून रात्रीच्या सुमारास नदीत मोठ्या प्रमाणावर फेस दिसून येत असल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे.

प्रदुषणामुळे गटारगंगा झालेल्या  अंबरनाथ तालुक्यातील वालधुनी नदीच्या पुनरूज्जीवनासाठी फेब्रुवारी महिन्यात अंबरनाथ नगरपालिकेने पुढाकार घेतला होता. विविध सामाजिक संघटना, संस्था, शाळा, महिविद्यालये, पर्यावरणप्रेमींनी वालधुनी नदीच्या स्वच्छता मोहिमेत सहभाग नोंदवला होता. जवळपास १०० पेक्षा अधिक दिवस ही मोहिम चालली होती. त्यानंतर वालधुनी नदीचे रूप काही अंशी पालटले होते. नदीच्या पात्रात नितळ पाणी दिसू लागले होते. त्यामुळे नदीच्या किनारी वृक्षारोपणही करण्यात आले. एकीकडे ही मोहिम नुकतीच संपली असताना आता प्रदुषणकारी घटकांनी पुन्हा वालधुनी नदी प्रदुषीत करण्यास सुरूवात केली आहे. गेल्या दोन दिवसांपासून अंबरनाथच्या प्राचीन शिवमंदिराशेजारून वाहणाऱ्या वालधुनी नदीच्या प्रवाहात फेस दिसून येतो आहे. फेसाळ पाणी वाहत असल्याची बाबत एका पर्यावरणप्रेमीने आपल्या कॅमेऱ्यात चित्रीत केली. मंगळवारी सायंकाळनंतर  वालधुनी नदीच्या पाण्यावर फेसाळ थर पसरला होता. गेल्या दोन दिवसांपासून हा फेसाळ थर दिसत असल्याची माहिती येथील रहिवाशांनी दिली आहे. त्यामुळे पुन्हा वालधुनी नदीच्या पात्रात रासायनिक सांडपाणी सोडल्याचा दाट संशय व्यक्त  होतो आहे. गेल्या तीन ते  चार दिवसांपासून अंबरनाथ आणि वालधुनी नदीच्या उगम स्थानावर जोरदार पाऊस पडतो आहे. त्यामुळे वालधुनी नदीपात्र दुथडी भरून वाहते आहे. त्यामुळे याच वाहत्या पाण्याचा आणि पावसाचा फायदा घेत रासायनिक सांडपाणी सोडले जात असल्याचा संशय पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केला आहे.