रासायनिक प्रक्रियेवर रानमेव्याचा उतारा | Loksatta

रासायनिक प्रक्रियेवर रानमेव्याचा उतारा

वसईत खेडय़ापाडय़ातून आलेल्या महिला बाजारात टोपल्यातून रानमेवा विकायला बसलेल्या दिसत आहेत.

रासायनिक प्रक्रियेवर रानमेव्याचा उतारा
वसईत खेडय़ापाडय़ातून आलेल्या महिला बाजारात टोपल्यातून रानमेवा विकायला बसलेल्या दिसत आहेत.

खेडय़ापाडय़ातून येणाऱ्या फळांना वसईकरांची पसंती

उन्हाळ्यात फळांच्या राजाची आतुरतेने वाट पाहणारा ग्राहक रानमेव्याचीही तितकीच आतुरतेने प्रतीक्षा करत असतो. संत्री, आंबे अशा मोठय़ा फळांसोबत आपले अस्तित्व टिकून ठेवणारी ही रानफळे वसंत ऋतूत दृष्टीस पडतात. हंगामी फळे म्हणजे जांभूळ, राजन, करवंद, जाम, लालजाम वसईच्या बाजारात दाखल झाली आहेत. सध्या बाजारात रासायनिक प्रक्रिया केलेल्या फळांची आवक असल्याने या फळांपेक्षा रानमेव्याला जास्त पसंती देत आहे.

वसईत खेडय़ापाडय़ातून आलेल्या महिला बाजारात टोपल्यातून रानमेवा विकायला बसलेल्या दिसत आहेत. शहरातील लोकांना ही फळे सहज उपलब्ध होत नसल्याने आज बाजारातून खरेदी करून हे लोक या फळांचा आस्वाद घेत आहेत. दिवसेंदिवस वाढणाऱ्या उकाडय़ात ही फळे खूप लाभदायक ठरतात. अनेक रोगांवर ती गुणकारी मानली जातात. सफरचंद, संत्री, आंबा, टरबूज, डाळिंब, चिकू, केळी या फळांवर मोठय़ा प्रमाणात रासायनिक प्रक्रिया करण्यात येते, त्यामुळे ही फळे आरोग्याला घातक ठरतात. परंतु रानमेवा नैसर्गिकरीत्या वाढलेला असतो व आरोग्यालाही लाभदायक ठरतो असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

आदिवासींना रोजगार

रानमेव्याचा मुख्य भाग असलेली करवंदे आदिवासी बांधवांना एप्रिल अखेरपासून ते जूनपर्यंत साधारणपणे अडीच महिने रोजगार मिळवून देतात.रवंद खुडणे हे अत्यंत कष्टाचे काम असून एक दिवस ती खुडण्यात व दुसरा दिवस ती बाजारात विकण्यासाठी लागतो. वसईच्या बाजारात १० रुपये एक ग्लास या दराने ही करवंदे तसेच जांभूळ आणि राजन ही फळे विकली जातात.

लाल जामला बहर

लाल जामचे उत्पादन हे सफेद जामच्या उत्पादनाच्या तुलनेत कमी असल्याने काहीच ठिकाणी हे जाम उपलब्ध आहेत. वाघोली येथील शनिमंदिराच्या आवारात जयवंत नाईक यांनी या लाल जामचे उत्पादन घेतले आहे. यांच्यासह कृषिभूषण शेतकरी सुभाष भट्टे  यांच्या वाडीतदेखील लाल जामला बहर आलेला दिसून येतो.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-04-2017 at 02:24 IST
Next Story
वसईच्या सनसिटी परिसरात मोटारसायकलस्वारांचा धुमाकूळ