ठाणे – ठाणे पूर्व-पश्चिम जोडणाऱ्या चेंदणी कोळीवाडा येथील रेल्वे पुलाखालील भुयारी मार्गावर भरतीच्या काळात खाडीचे पाणी शिरून होणाऱ्या जलभरावाची गंभीर दखल जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. यामुळे नागरिकांच्या जीविताला, आरोग्याला आणि वाहतुकीला धोका निर्माण होत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून प्राप्त होताच जिल्हा प्रशासनाने मध्य रेल्वे आणि ठाणे महापालिकेला संयुक्त पाहणी करून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत.

चेंदणी कोळीवाडा येथील रेल्वे पुलाखालील भुयारी मार्गावर भरतीच्या काळात खाडीचे पाणी शिरून जलभराव होतो. याबाबत ठाणे गावठाण, कोळीवाडे पाडे संवर्धन समितीचे अध्यक्ष गिरीश साळगावकर यांनी तक्रार केली होती. त्याची गंभीर दखल जिल्हा प्रशासनाने घेतली आहे. हा बोगदा ठाणे पूर्व-पश्चिम वाहतुकीसाठी महत्त्वाचा आहे. पाणी साचल्याने नागरिक, पादचारी, महिला, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना येथून जाणे शक्य होत नाही. तसेच आपत्कालीन सेवांनाही अडथळा निर्माण होतो. त्यामुळे मध्य रेल्वे आणि ठाणे महापालिकेने समन्वयाने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.

भरती तसेच अतिवृष्टीच्या काळात भुयारी मार्गात मोठ्या प्रमाणात पाणी साचते. विशेष म्हणजे हे पाणी दूषित असल्याने सार्वजनिक आरोग्यालाही धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने मध्य रेल्वे, ठाणे महापालिका आणि संबंधित विभागांना तातडीने कार्यवाही करण्यास सांगितले आहे. यासाठी मध्य रेल्वे, ठाणे महापालिका आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या प्रतिनिधींचे संयुक्त पथक तयार करून भुयारी मार्गाची प्रत्यक्ष पाहणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

पाणी साचण्यामागील नेमके कारण शोधताना पर्जन्यजल निचरा, भरतीच्या पाण्याचा प्रतिप्रवाह, ड्रेनेजची क्षमता, रेल्वे पुलाखालील संरचना आणि परिसरातील निचरा व्यवस्थेचा तांत्रिक अभ्यास केला जाणार आहे. भरतीचे पाणी भुयारी मार्गाच्या दिशेने येत असल्याचे स्पष्ट झाल्यास त्याचा प्रतिप्रवाह रोखण्यासाठी शाश्वत उपाययोजना करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. यामध्ये प्रतिप्रवाह रोखणारे झडपद्वार, एकमार्गी झडप, उच्च क्षमतेची पाणी उपसा यंत्रणा, साठवण टाकी किंवा पाणी उपसा केंद्र, तसेच पाणी निचरा व्यवस्था सुधारण्यासारख्या उपाययोजनांचा विचार करण्यास सांगण्यात आले आहे. कायमस्वरूपी उपाययोजना पूर्ण होईपर्यंत अतिवृष्टी आणि भरतीच्या काळात पाणी उपसा व्यवस्था, मार्गरोधक, सूचना फलक, वाहतूक नियंत्रण आणि पर्यायी मार्गाची व्यवस्था सज्ज ठेवावी, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. साचलेल्या दूषित पाण्याचा तातडीने निचरा करून आवश्यकतेनुसार निर्जंतुकीकरण आणि आरोग्यविषयक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

कामाला कालमर्यादा ठरविण्याचे निर्देश

ठाणे महापालिका आणि मध्य रेल्वेने त्यांच्या अधिकारक्षेत्रातील जबाबदारी निश्चित करून संयुक्त कालबद्ध कृती आराखडा तयार करावा, असे आदेशात नमूद आहे. या आराखड्यात कामाचे स्वरूप, जबाबदार अधिकारी, अंदाजित खर्च, निधीचा स्रोत आणि काम पूर्ण करण्याची कालमर्यादा निश्चित करावी लागणार आहे. तसेच आवश्यक असल्यास आपत्ती जोखीम कमी करण्याच्या योजनेंतर्गत स्वतंत्र तांत्रिक व आर्थिक प्रस्ताव सादर करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. मोठी भरती किंवा अतिवृष्टीच्या काळात भुयारी मार्गात पाणी साचण्याची शक्यता असल्यास नागरिकांना आगाऊ सूचना देण्यासाठी पूर्वसूचना यंत्रणा, सूचना फलक आणि स्थानिक वाहतूक नियंत्रण व्यवस्था कार्यान्वित ठेवण्याचेही जिल्हा प्रशासनाने सांगितले आहे.