ठाणे – ठाणे शहरातील ऐतिहासिक चेंदणी कोळीवाड्याचे प्रत्यक्ष सर्वेक्षण करून अधिकृत सीमांकन तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अधिकाऱ्यांना दिले. यामुळे चेंदणी कोळीवाड्याच्या हद्दीचा प्रश्न आता मार्गी लागण्याची शक्यता आहे. कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांच्या पाठपुराव्यानंतर मंत्रालयात बुधवारी यासंदर्भात बैठक झाली. या बैठकीला कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल आणि ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ हे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. यावेळी महसुल मंत्र्यांनी सर्वेक्षण करण्याचे निर्देश दिले.

महाराष्ट्र शासनाने २९ जानेवारी २०२६ रोजी कोकणातील कोळीवाड्यांचे प्रत्यक्ष सर्वेक्षण आणि सीमांकन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ठाणे जिल्ह्यातही जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्याची कार्यवाही सुरू आहे. महसूल कागदपत्रांची तपासणी करून आवश्यकतेनुसार ड्रोन सर्वेक्षण आणि भूमापनाच्या माध्यमातून सीमांकनाची प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करण्याची मागणी डावखरेंनी बैठकीत केली. सीमांकन पूर्ण होईपर्यंत विकास प्रकल्पांमध्ये चेंदणी कोळीवाड्याची हद्द, पारंपरिक घरे आणि सार्वजनिक तसेच सामुदायिक जागांचा विचार करावा, अशी मागणी त्यांनी केली.

चेंदणी कोळीवाडा हा केवळ निवासी परिसर नसून ठाण्याच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाचा भाग आहे. त्यामुळे महसूल कागदपत्रे, ऐतिहासिक पुरावे आणि प्रत्यक्ष परिस्थितीच्या आधारे कोळीवाड्याची हद्द निश्चित करावी, अशी भूमिका डावखरे यांनी मांडली. ठाणे इंटिग्रेटेड रिंग मेट्रोसह विविध पायाभूत प्रकल्प प्रस्तावित असल्याने कोळीवाड्यातील पारंपरिक घरे, श्री दत्त मंदिर, विहिरी, भूजलस्तर आणि सामुदायिक जागांचे संरक्षण करण्याची मागणी करण्यात आली. चेंदणी कोळीवाड्यातील ५९१ मिळकतधारकांच्या हक्कांचे संरक्षण करावे, अशी मागणीही बैठकीत करण्यात आली.

कोळीवाड्याच्या आसपास असलेल्या शासकीय जमिनीचा योग्य पद्धतीने कोळीवाड्याच्या विकासासाठी उपयोग करण्याबाबतही सकारात्मक विचार करावा, अशी मागणीही त्यांनी केली. चुहा पूल परिसरातील कचराभुमीवर कारवाई मुंब्रा येथील चुहा पूल परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर कचरा, माती आणि कांदळवन परिसरातील अनधिकृत भरावाचा मुद्दाही बैठकीत उपस्थित करण्यात आला. पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या या भागातील अनधिकृत कचराभुमी तातडीने थांबवून संबंधित यंत्रणांनी समन्वयाने कारवाई करावी, असे निर्देश महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिले.