छटपूजेसाठी होणारी गर्दी रोखण्याचे आव्हान

शहरात करोनाची परिस्थिती आटोक्यात आहे. गेल्या काही दिवसांपासून निर्बंधही शिथिल झाले आहेत.

नियमांचे उल्लंघन टाळण्यासाठी पालिका, पोलीस यंत्रणा दक्ष

ठाणे : शहरात दिवाळी सणाच्या काळात मोठी गर्दी करत करोना नियमांचे उल्लंघन करण्यात आले असतानाच त्यापाठोपाठ आता छटपूजेनिमित्त तलावांच्या काठावर होणारी गर्दी टाळण्याबरोबरच करोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे. असे असले तरी छटपूजेसाठी शहरातील तलावांच्या काठाजवळ बेदी (मातीचे छोटे ढिगारे) उभारण्यात आले आहेत. यामुळे पालिकेसह पोलीस यंत्रणा दक्ष झाली असून त्यांच्यापुढे छटपूजेच्या काळात गर्दी टाळण्याबरोबरच करोना नियमांचे उल्लंघन रोखण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.

शहरात करोनाची परिस्थिती आटोक्यात आहे. गेल्या काही दिवसांपासून निर्बंधही शिथिल झाले आहेत. असे असले तरी करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून पालिकेने दिवाळी सणाच्या काळात गर्दी टाळण्याबरोबरच करोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले होते. त्यानंतरही दिवाळी सणाच्या काळात मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी करत करोना नियमांचे उल्लंघन केल्याचे दिसून आले होते. ठाणे तसेच आसपासच्या परिसरात राहणाऱ्या उत्तर भारतीयांकडून विविध तलावांच्या किनारी छटपूजा साजरी करण्यात येते. यंदाही बुधवारी सायंकाळी आणि गुरुवारी पहाटे छटपूजा साजरी केली जाणार आहे. या पूजेच्या काळात नागरिकांची गर्दी होऊ नये म्हणून पालिकेने काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. या सूचनांव्यतिरिक्त परिस्थिती पाहून निर्बंध अधिक कडक करण्याचे अधिकार महापालिका तसेच स्थानिक पोलीस प्रशासनाला असणार आहेत, असेही पालिकेने स्पष्ट केले आहे.

पालिकेच्या सूचना

छटपूजेच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी करू नये. या ठिकाणी फटाके फोडण्याचे टाळावे.  छटपूजा कार्यक्रमाच्या ठिकाणी मुखपट्टीचा वापर आणि अंतरसोवळ्याच्या नियमांचे पालन करावे छटपूजा उत्सवाच्या ठिकाणी मंडप उभारण्यात येऊ नयेत.

छटपूजेची तयारी कुठे?

उपवन तलाव, कोलशेत विसर्जन महाघाट, रायलादेवी तलाव, दत्तघाट (मासुंदा तलाव), कोपरी खाडी, पारसिक विसर्जन महाघाट, पारसिक रेतीबंदर.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Chhath municipal police system vigilant to prevent violation of rules akp

ताज्या बातम्या