– यापूर्वी दोन लग्न झाली असताना पीडितेबरोबर केले तिसरे लग्न

डोंबिवली – यापूर्वी दोन लग्न केलेल्या मुंब्रामधील एका जादूटोणा करणाऱ्या इसमाने डोंबिवलीतील २९ वर्षाच्या योग प्रशिक्षक असलेल्या एका तरूणीला आपल्या मित्राला योग शिकायचे आहे असे सांगून तिला मुंब्रामधील दत्तूवाडीतील रहिवास नसलेल्या घरात नेले. तेथे तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले. हा प्रकार कोठे बाहेर सांगितला तर आपण तुझ्या सोबतच्या अश्लिल दृश्यध्वनी चित्रफिती तुझ्या पालकांना दाखवू अशी धमकी दिली. तसेच, जादूटोणा करून तुझ्या कुटुंबीयाला संपून टाकण्याची धमकी दिली. या सगळ्या प्रकाराने त्रस्त झालेल्या तरूणीने शुक्रवारी मध्यरात्री रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

पोलिसांनी या पीडितेच्या तक्रारीवरून इम्रान सुभान शेख उर्फ छोटे बाबा, सगिरा सुभान शेख, सुभान शेख, हुसेना शेख, फक्रुद्दीन शेख यांच्या विरूध्द भारतीय दंड संहितेप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. जुलै २०२२ ते नोव्हेंबर २०२४ या कालावधीत हे प्रकार घडले आहेत.

पीडितेने तक्रारीत म्हटले आहे, की आपण आपले आई, वडील आणि दोन भावांसोबत डोंबिवलीत राहतो. घरात आर्थिक अडचणी होत्या. त्यामुळे माझी आई, वडील मुंब्रा येथील दत्तूवाडीतील नारियलवाला बाबा या मांत्रिकाकडे जात होते. परिचय झाल्याने नंतर मी एकटी नारियलवाला बाबांकडे जात होती. नारियलवाला बाबांचा मुलगा इम्रान शेख उर्फ छोटे बाबा यांनी मला स्वताचे योग प्रशिक्षण वर्ग सुरू करण्याचे सुचवले आणि त्यासाठी सहकार्य करण्याची तयारी दर्शवली. या कामासाठी त्यांनी आपला मोबाईल क्रमांक घेतला.

जुलै २०२२ मध्ये इम्रान यांनी आपल्या मित्राला योग शिकायचे आहे असे सांगून मला मुंब्रा येथे बोलावून घेतले. दत्तूवाडीतील एका घरी नेऊन तेथे घरात कोणी नसताना आपल्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले. हा विषय कोणाला बाहेर सांगितला तर तुझ्या कुटुंबीयांना जादूटोणा करून मारून टाकीन अशी धमकी दिली. या प्रकाराने घाबरलेल्या पीडितेने मुंब्रा येथे जाणे बंद केले. त्यानंतर इम्रान पीडितेला आपल्या शरीरसंबंधाचे दृश्यध्वनी चित्रफिती केल्या आहेत. त्या तुझ्या कुटुंबीयांना दाखवीन अशी धमकी देऊन पीडिते बरोबर जबरदस्तीने शरीर संबंध करत होता.

पीडितेने हा प्रकार इम्रानच्या कुटुंबाला सांगितला तर त्यांनीच आपणास शिवीगाळ मारहाण केली आणि आपणास इम्रान बरोबर लग्न करण्यास प्रवृत्त केले, असे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे. पीडितेने इम्रानबरोबर लग्न केले. इम्रान विविध प्रकारचे त्रास देऊ लागल्याने पीडिता इम्रानला सोडचिठ्ठी देऊन पुन्हा डोंंबिवलीत आईकडे राहण्यास आली होती. एक दिवस इम्रानने आपणास गोड बोलून अकोला येथे नेले. तेथे विविध आश्वासने देऊन आपल्या बरोबर पुन्हा विवाह केला.

मुंब्रा येथे आल्यावर मला इम्रानचे अशाप्रकारचे हे तिसरे लग्न असल्याचे समजले. याबाबत विचारणा केल्यावर इम्रान आपणास अधिकच त्रास देऊ लागला. आपल्या आई, वडिलांना जादूटोणा करून तो संंपविण्याची सतत धमकी देत असल्याने आपण शुक्रवारी डाॅक्टरकडे जाते सांगून मुंब्रा येथून आपल्या आईच्या घरी आले. त्यानंतर ही आपण तक्रार करत आहे, असे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे.