scorecardresearch

उल्हास नदीच्या पूररेषेचे फेर सर्वेक्षण होणार ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश

दोन वर्षांपूर्वी जलसंपदा विभागाने उल्हास नदीची कर्जत ते उल्हासनगर अशी पुररेषा निश्चित केली. मात्र या पुररेषेत त्रुटी असल्याचा आरोप झाला.

उल्हास नदीच्या पूररेषेचे फेर सर्वेक्षण होणार ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश
प्रातिनिधिक छायाचित्र /लोकसत्ता

बदलापूर : बदलापूर शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदीच्या पुररेषाचे फेर सर्वेक्षणाचे आदेश देण्यात आले आहेत. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात पार पडलेल्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे आदेश दिले. दोन वर्षांपूर्वी जलसंपदा विभागाने उल्हास नदीची पुररेषा जाहीर केली होती. मात्र ही पुररेषा चुकीची असल्याचे सांगत या रेषेचे फेर सर्वेक्षण करण्याची मागणी केली जात होती. आता जलसंपदा विभागाने स्थानिक नगर पालिकेच्या मदतीने सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत.

रायगड जिल्ह्यातून वाहत येणारी उल्हास नदी वांगणीच्या जवळ ठाणे जिल्ह्यात प्रवेश करते. ती पुढे बदलापूर, कल्याण तालुक्यातील ग्रामीण भाग आणि उल्हासनगर शहराजवळून पुढे वाहत जात खाडीला मिळते. गेल्या काही वर्षात उल्हास नदीच्या किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर नागरिकरण झाले. तर उल्हास नदीला येणाऱ्या पुरामुळे या नव्याने उभारण्यात आलेल्या असंख्य गृहसंकुलांमध्ये पाणी शिरते. त्यामुळे नदी किनारी ना बांधकाम क्षेत्र स्थापित करावे अशी मागणी होती. नागरिकांची होणारी फसवणूक थांबावी यासाठी उल्हास नदीला पुररेषा निश्चित करून या भागात गृहसंकुलांची उभारणी थांबवावी अशी मागणी केली जात होती.

हेही वाचा : Shinde vs Thackeray: “ते लोक आईवर…”; रश्मी ठाकरेंसंदर्भात शिंदे गटाने केलेल्या दाव्यावरुन आदित्य ठाकरे संतापले

दोन वर्षांपूर्वी जलसंपदा विभागाने उल्हास नदीची कर्जत ते उल्हासनगर अशी पुररेषा निश्चित केली. मात्र या पुररेषेत त्रुटी असल्याचा आरोप झाला. ही पुररेषा निश्चित करताना स्थानिक कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या विविध विभागांना कळवण्यात आले नव्हते, असा आरोप झाला. परिणामी ही पुररेषा सदोष झाली. ज्या भागात गेल्या १०० वर्षात पुराचे पाणी गेले नाही असे काही उंच भाग, परिसर, टेकड्याही या पुररेषेत समाविष्ट करण्यात आले होते. त्यामुळे तेथील बांधकामावर परिणाम होऊ लागला होता. त्यामुळे स्थानिक आमदार किसन कथोरे, माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे आणि विविध पक्षांच्या लोकप्रतिनिधी यांनी एकत्र येत तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंत पाटील, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत ही पुररेषा नव्याने आखण्याची मागणी केली होती. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना स्थानिक पालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यासोबत अशा ठिकाणांची पाहणी करण्याचे आदेश दिले होते.

हेही वाचा : ठाणे महापालिका मुख्यालयातून शिंदे सेनेची दसरा मेळाव्याची तयारी – माजी नगरसेवकांची पालिकेत पार पडली बैठक

२६ जानेवारी रोजी बदलापूर शहरात हा संयुक्त पाहणी दौरा पार पडला. त्यानंतर जलसंपदा विभागानेही काही अनावश्यक जागा पुररेषेत आल्याचे मान्य केले होते. त्यानंतर या विषयावर ठोस काही होऊ शकले नव्हते. नुकतीच या विषयावर सह्याद्री अतिथीगृहात एक बैठक पार पडली. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या पुररेषेचे संयुक्त फेर सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता उल्हास नदीच्या पुररेषेचे फेर सर्वेक्षण होणार हे निश्चित झाले आहे. या बैठकीला कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार डॉ. बालाजी किणीकर, नगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव भूषण गगराणी, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव सोनिया सेठी, ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, एमएमआरडीएचे सहआयुक्त विजय सुर्यवंशी, तसेच बदलापूर नगर पंचायतीचे मुख्याधिकारी योगेश गोडसे, माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे आदी उपस्थित होते.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या