ठाणे : शिवसेनेचे बंडखोर एकनाथ शिंदे गटाने आणि भाजपने एकत्रित येऊन नवे सरकार स्थापन केल्याने शिंदे गटाचे पुढे काय होणार अशी चर्चा सुरु असतानाच, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी रात्री ठाण्यातील भाजपा कार्यालयात जाऊन पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान पदाधिकाऱ्यांसोबत कोणतीही बैठक किंवा चर्चा झालेली नसली तरी मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच त्यांनी भाजपा कार्यालयाला दिलेल्या या सदिच्छा भेटीमुळे वेगवेगळे राजकीय अर्थ काढले जात आहेत. त्यामुळे या भेटीमागे दडलय तरी काय ? अशी चर्चा यानिमित्ताने सुरु झाली आहे.

शिवसेनेतील बंडखोरीच्या केंद्रस्थानी असलेल्या एकनाथ शिंदे यांनी पक्षाच्या ३९ आमदारांच्या मदतीने भाजपासोबत नवे सरकार स्थापन केले. या सरकारमध्ये मुख्यमंत्री पदावर एकनाथ शिंदे तर, उपमुख्यमंत्री पदावर देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली आहे. सोमवारी झालेल्या विशेष अधिवेशनामध्ये या सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला. या सभेचे कामकाज संपल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे हे ३९ आमदारांसह ठाण्यात कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी निघाले. आनंदनगर चेकनाका येथे त्यांचे कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले. त्यानंतर शिवसेनेचे दिवंगत जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या समाधीस्थळी जात असतानाच त्यांनी या मार्गावरच असलेल्या खोपट येथील भाजपा कार्यालयाला भेट दिली. या मार्गावरून जाताना कार्यालयाला भेट देणार असल्याचे त्यांनी ठाण्यातील भाजपाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना कळविले होते. त्यामुळे कार्यालयाच्या परिसरात भाजपाचे ठाणे शहराध्यक्ष निरंजन डावखरे,भाजपा प्रदेश सरचिटणीस संदीप लेले, महिला मोर्चा अध्यक्षा मृणाल पेंडसे, माजी नगरसेवक मनोहर डुंबरे, सूनेश जोशी, माजी नगरसेविका नंदा कृष्णा पाटील, स्नेहा रमेश आंब्रे यांच्यासह भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले होते.

sunil tatkare and ajit pawar devendra fadnavis morning oath
अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधीवर सुनिल तटकरेंचा मोठा खुलासा; म्हणाले, “आम्ही दोन्ही…”
devendra fadanvis
उपमुख्यमंत्री फडणवीस यांना समाज माध्यमांवर ठार मारण्याची धमकी; चित्रफीत शेअर करणाऱ्याला अटक
sanjay raut narendra modi (3)
“केंद्राने मोदींबरोबर असहकाराची भूमिका घेतल्यावर शरद पवारांनीच…”, राऊतांकडून पंतप्रधानांच्या जुन्या वक्तव्यांची उजळणी
Social workers detained yavatmal
आंदोलनाची दहशत… मोदींच्या सभेपूर्वीच सामाजिक कार्यकर्ते स्थानबद्ध

मुख्यमंत्री शिंदे यांनी भाजपा कार्यालयाला भेट दिली. त्यावेळी भाजपा पदाधिकाऱ्यांनी फेटा बांधून आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले. तसेच पदाधिकाऱ्यांनी त्यांना पेढेही भरविले. काही वेळात शिंदे तेथून आनंद दिघे यांच्या समाधीस्थळी जाण्यासाठी निघाले. या भेटीदरम्यान त्यांची पदाधिकाऱ्यांसोबत कोणतीही बैठक किंवा चर्चा झाली नाही. शिवसेना आणि भाजपाची युती असताना निवडणुक काळात त्यांनी भाजपा कार्यालयाला एक ते दोन वेळा भेट दिली होती. युतीचे सरकार जाऊन महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर शिवसेना आणि भाजपामध्ये टोकाचा संघर्ष सुरु होता. यातूनच ठाण्यातील भाजपा पदाधिकाऱ्यांकडून शिंदे यांच्यावर टिकेचा भडीमार केला जात होता. मात्र, शिवसेनेतून बंडखोरी करत एकनाथ शिंदे गटाने आणि भाजपासोबत नवे सरकार स्थापन केले असून या सरकारमध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर शिंदे यांनी पहिल्यांदाच भाजपा कार्यालयाला भेट दिली असून या सदिच्छा भेटीमागे दडलय तरी काय ? अशी चर्चा यानिमित्ताने सुरु झाली आहे.