राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज दुपारी ठाणे शहरात येणार आहेत. मुख्यमंत्री झाल्यानंतर ते पहिल्यांदाच ठाणे शहरात येत असल्यामुळे समर्थकांनी त्यांच्या स्वागताची तयारी केली आहे. आंनद नगर चेक नाका येथे मुख्यमंत्री शिंदे यांचे जल्लोषात स्वागत करण्यात येणार आहे.

राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतल्यानंतर ठाणे जिल्ह्याच्या त्यांच्या समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करत जोरदार जल्लोष केला होता. शपथविधीनंतर मुख्यमंत्री शिंदे हे ठाण्यात येण्याची शक्यता वर्तविली जात असल्यामुळे समर्थकांनी त्यांच्या स्वागताची तयारी सुरु केली होती. मात्र, ते व्यस्त कार्यक्रमांमुळे येऊ शकले नव्हते. यामुळे ठाणेकरांना मुख्यमंत्र्यांच्या भेटीची प्रतिक्षा असल्याचे दिसून आले होते. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज दुपारी ठाणे शहरात येणार असल्याचे कळताच समर्थकांनी त्यांच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू केली आहे. माजी महापौर नरेश म्हस्के यांनी रविवारी टेंभीनाका येथील आनंद आश्रममध्ये बैठक घेऊन स्वागत तयारीचे नियोजन केले. यानुसार ठाणे आणि मुंबई शहराच्या सीमेवरील आंनद नगर चेक नाका येथील धर्मवीर आनंद दिघे प्रवेशद्वारावर येथे मुख्यमंत्री शिंदे यांचे जल्लोषात ठाणे नगरीत स्वागत करण्यात येणार आहे. त्यानंतर शिंदे हे आनंद दिघे यांचे समाधीस्थान असलेल्या शक्ती स्थळाचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर ते टेंभीनाका येथील आनंदाश्रम येथे भेट देणार आहेत. त्यानंतर ते त्यांच्या लुईसवाडी येथील ‘शुभ-दिप’ या निवास्थानी जाणार आहेत.