दोन वर्षाच्या खंडानंतर राज्यभर दहीहंडी उत्सवाचे मोठ्या उत्साहात आयोजन केले गेले आहे. अनेक ठिकाणी लोकप्रतिनिधी आणि विविध संस्थांनी मेगा दहीहंडी कार्यक्रमांचे आयोजन केलं आहे. विशेषतः मुंबई आणि ठाण्यात लाखोंची बक्षिसे ही पुन्हा एकदा दहीहंडी उत्सवाचे आकर्षण ठरले आहेत. राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते यांचा मोठा उत्साह या उत्सवाच्या आयोजनात दिसत आहे. विशेषतः महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता नेतेमंडळी दहीहंडी उत्सवाचे आयोजन करत एक प्रकारे शक्तीप्रदर्शन करतांना बघायला मिळत आहेत.

यानिमित्ताने शिवसेनेत बंडखोरी केलेले मुख्यमंत्री एखनाथ शिंदे यांनी आज दिवसभर विविध दहीहंडी मंडळ, लोकप्रतिनिधींनी आयोजीत केलेल्या उत्सवाच्या ठिकाणांना भेटी देण्याचा जंगी कार्यक्रम आखलेला बघायला मिळत आहेत. यानिमित्ताने समर्थकांनी आयोजित केलेल्या दहीहंडी उत्सवाला भेटी देत शक्तीप्रदर्शन करण्याचा, एक प्रकारे हिंदुत्वाचा पुकार करण्याचा एकनाथ शिंदे यांचा प्रयत्न दिसत आहे.

आज दिवसभरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मीरा भाईंदर, मुंबई, भिवंडी आणि ठाणे इथल्या ११ दहीहंडी कार्यक्रमाच्या ठिकाणी भेटी देत आहेत. यानिमित्ताने सत्ता स्थापनेत मोलाची साथ देणाऱ्या विविध सहकाऱ्यांनी आयोजित केलेल्या दहीहंडी कार्यक्रमांना शिंदे भेटी देणार आहेत. घाटकोपर, मागाठाणे, भिवंडी इथे प्रत्येकी एका ठिकाणी तर ठाण्यात सहा ठिकाणी ते भेट देत आहेत. यानिमित्ताने एक प्रकारे पालिका निवडणुक प्रचाराची पहिली पायरी शिंदे चढत असल्याचं म्हंटलं जात आहे.