ठाणे: शहापूर तालुक्यातील वेळुक कातकरी वाडी येथे एका १७ वर्षाच्या मुलीचा बालविवाह रोखण्यास जिल्हा प्रशासनाला यश आले आहे. संबंधित मुलगी राहत असलेल्या वाडीतच राहणाऱ्या एका मुलासोबत तिचे प्रेमसंबंध होते. गावात बदनामी होऊ नये या भीतीने आणि दोन्ही मुलांच्या हट्टापायी दोन्ही कुटुंबीयांनी समंतीने या विवाहाचा घाट घातला. मात्र चाईल्ड लाईन वरून या लग्नाची माहीत जिल्हा प्रशासनाला मिळाली या माहितीवरून अधिकारी धनश्री साळुंखे यांनी घटनास्थळी धाव घेऊन हा बालविवाह रोखला.
चाईल्ड हेल्पलाईन वरून जिल्हा प्रशासनाला बालविवाह होत असल्याच्या अनेक तक्रारी आणि माहिती येत असते. याच माहितीच्या आधारे स्थानिक जिल्हा प्रशासनकडून घटनास्थळी धाव घेऊन बालविवाह रोखण्यात येतो. याच पद्धतीने शहापूर तालुक्यातील वेळुक कातकरी वाडी येथे एका १७ वर्षाच्या मुलीचा बालविवाह रोखण्यास जिल्हा प्रशासनाला यश आले आहे. या वाडीत राहणाऱ्या संबंधित मुलीचे घराजवळ राहणाऱ्या एका बालिक मुलाबरोबर प्रेमाचे सूत जुळले. तर मुलगी काही दिवस मुलाच्या घरी राहण्यासाठी देखील गेली. हे सर्व प्रकार थांबावे आणि गावात अधिक बदनामी होऊ नये म्हणून दोन्ही कुटुंबीयांनी संगनमताने मुलीचा बालविवाह करण्याचा घाट घातला.
मात्र लग्नाच्या दिवशी चाईल्ड हेल्पलाईनला एका सामाजिक संस्थेच्या माध्यमातून लग्नाची माहिती मिळाली. याची माहिती मिळताच बालविकास प्रकल्प अधिकारी धनश्री साळुंखे, पोलीस निरीक्षक सुरेश गावित आणि सेवा सामाजिक संस्थेचे सुरेखा विशे यांनी घटनास्थळी धाव घेऊन बालविवाह रोखला. तर मुलीला बालकल्याण समिती समोर हजर करण्यात येणार असून तिला सध्या उल्हासनगर येथील एका वसतिगृहात ठेवण्यात आले आहे. तर दोन्ही कुटुंबीयांविरोधात बालविवाह कायद्यानुसार कार्यवाही सुरु आहे.
जिल्ह्यातील बालविवाह रोखण्याच्या कार्यवाहीबाबतची आकडेवारी
वर्ष २०२४: १८ बालविवाह प्रकरणे रोखण्यात आली
वर्ष २०२५ (आजअखेर): ६ प्रकरणे यशस्वीरित्या रोखण्यात आली.
ही आकडेवारी लक्षात घेता जिल्ह्यातील जनजागृती उपक्रम आणि प्रशासनाची तात्काळ कृती यामुळे बालविवाह प्रकरणांमध्ये लक्षणीय घट झाली आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.
लग्न मुहूर्तांवर लक्ष
सध्या सर्वत्र लगीनसराई सुरु असून जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून प्रामुख्याने लग्न मुहूर्ताच्या दिवशी ग्रामीण भागातील लग्नांवर लक्ष ठेवले जाते आहे. यामध्ये मुलीचे आणि मुलाचे ओळखपत्र आणि वय नमूद असलेली कागदपत्रे देखील स्थानिक अंगणवाडी सेविका यांच्या माध्यमातून तपासली जात आहेत.