उन्हाळी सुट्टी आणि बालनाटय़े जणू समीकरणच बनले आहे. शाळा संपताच बालनाटय़ाची रेलचेल पहावयास मिळते. मुलांना समजेल अशा स्वरूपात विषयांची केलेली मांडणी, प्राण्यांच्या माध्यमातून केले जाणारे समाजप्रबोधन किंवा वास्तववादी विषय अगदी नेटकेपणाने मांडून ते अभिनयाच्या माध्यमातून मुलांपर्यंत पोहचविण्याचे काम ही बालनाटये करीत असतात. उन्हाळयाच्या सुट्टया संपेपर्यंत सर्वच नाटयगृहात बालनाटयाचे प्रयोग असल्याचे पाहावयास मिळते. परंतु यंदा हा बालनाटय़ाचा पडदा मे महिन्यातच पडला आहे. नाटयगृहाचे न परवडणारे भाडे, तारखा तसेच प्रेक्षकांची कमतरता अशा अनेक गोष्टी या बालनाटय़ाच्या अर्थकारणाशी निगडित असल्यामुळे अनेक निर्माते दिग्दर्शकांनी यंदा प्रयोगाची संख्या कमी झाल्याने बालरंगभूमीचा पडदा लवकर पडला आहे.

ठाण्यातही अनेक नाटयसंस्था आहे, प्रत्येक नाटयसंस्थेत किमान ५० ते ६० मुले प्रशिक्षण घेत असतात. या प्रत्येक मुलांमधील कलागुण बाहेर काढून त्यांना वाव देण्याचा प्रत्येक दिग्दर्शक प्रयत्न करताना दिसतो. या कलागुणांना रंगमंचावर वाव मिळावा अशी प्रत्येक पालकांची इच्छा असते. तसेच आपला अभिनय इतरांनी पहावा अशी प्रत्येक बालकलाकारांची इच्छा असते. बालनाटय़ासाठी नाटयगृहाचे अवास्तव भाडे हे दिग्दर्शकांना परवडत नाही, त्यापेक्षा तिकीटदरांच्या किमतीही जास्त असल्यामुळे अनेकजण याकडे पाठ फिरवतात. व्यावसायिक तसेच प्रायोगिक नाटकांच्या तिकिटांना जेवढा दर ठेवलेला असतोच तेवढाच दर बालनाटय़ांना असतो, त्यामुळे मध्यमवर्गीय पालक मुलांना नाटके दाखवीत नाही. यावर काय पर्याय शोधता येईल याची खलबते पालकांमध्ये सुरू असतात, पण यासाठी खरंच पुढाकार घेणे आवश्यक आहे.

बालरंगभूमी जगवली पाहिजे किंबहुना याच रंगभूमीवरून नवोदित कलाकार घडणार आहेत, अशी मते नुकत्याच ठाण्यात झालेल्या अखिल भारतीय नाटयसंमेलनात ज्येष्ठ रंगकर्मीनी व्यक्त केली. या उद्घाटनपर कार्यक्रमात ज्येष्ठ रंगकर्मी मोहन जोशी यांनी नाटयक्षेत्रातील रंगकर्मीच्या, पडद्यामागच्या कलावंतांच्या व्यथा मांडल्या. बालरंगभूमीबाबतही चर्चा झाली. परंतु प्रत्यक्षात मात्र बालरंगभूमीसाठी कोणतेही प्रयत्न होताना दिसत नाही. बालरंगभूमी ही अविरत सुरू राहावी, यासाठी सर्वच बालनाटय दिग्दर्शकांनी एकत्र येणे गरजेचे आहे. ठाण्यात राजू तुलालवार, राजेश राणे, प्रवीणकुमार भारदे, मंदार टिल्लू, अरुंधती भालेराव यांच्यासह अनेक दिग्दर्शक बालनाटय रंगभूमीसाठी काम करत आहेत, किंबहुना या बालरंगभूमीच्या माध्यमातून नवे कलाकार देण्याचा प्रयत्न करीत आहे असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. मुलांना अभिनयाचे धडे देणे, कोणाची आवड कशात आहे याचा अभ्यास करून त्या पद्धतीने बालकलाकारांना घडविणे हेदेखील कौशल्याचे काम असते. या बालरंगभूमीच्या माध्यमातून अनेक कलावंत रंगभूमीला मिळणार आहेत, ही रंगभूमी जगविण्यासाठी सर्वानीच एकत्र येणे आवश्यक आहे. सुट्टीच्या कालावधीत बालनाटय़ाच्या प्रयोगासाठी नाटय़गृहाचे नाममात्र भाडे असावे, तसेच प्रत्येक नाटय़गृहासाठी बस हवी आदीसाठी संबंधित महापालिकेकडे पाठपुरावा करणे आवश्यक आहे. ठाणे महापालिकेच्यावतीने दरवर्षी तीन दिवसांचा बालनाटयमहोत्सव आयोजित केला जातो, या बालनाटय महोत्सवात दिग्दर्शक आपली नाटके सादर करतात, यासाठी कोणतेही भाडे आकारले जात नाही. असा महोत्सव उन्हाळी सुट्टीत घेतला तर त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल यात शंका नाही.