बदलापूर : काही दिवसांपासून उल्हास नदीचे पाणी अचानक गढूळ झाले आहे. यामागचे नेमके कारण शोधण्यासाठी उल्हास नदी बचाव कृती समितीने नदीच्या उगमापासून ते विविध उपनद्यांच्या परिसराची प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणीत कर्जत परिसरातील चिल्हार नदीकाठावर सुरू असलेले डोंगर कापणी, उत्खनन आणि बांधकामे या गढूळपणाला प्राथमिकदृष्ट्या कारणीभूत असल्याचा निष्कर्ष समितीने काढला आहे. याप्रकरणी प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महसूल विभागाकडे तक्रार दाखल करून वैज्ञानिक तपासणीची मागणी समिती करणार आहे.

लाखो नागरिकांना पिण्याचे पाणी देणाऱ्या उल्हास नदीत लालसर गढूळ पाणी आल्याने शुद्धीकरण यंत्रणांसह नागरिकांना त्याचा फटका बसला आहे. जीवन प्राधिकरणाची यंत्रे, नागरिकांच्या घरातील पाणी शुद्धीकरणाची यंत्रे नादुरूस्त झाली. याचा मागोवा घेण्यासाठी उल्हास नदी बचाव कृती समितीच्या शशिकांत दायमा, रवींद्र लिंगायत, राणी कपोते, अशफाक शेख, प्रशांत राऊत, हरेश सोनावळे, मोहन भागवत, आणि सचिन या सदस्यांनी दोन दिवस नदीची पाहणी केली. यात समितीला कर्जतजवळील पिंपळोळी परिसरातील चिल्हार नदीकाठावर राज्यातील एका मंत्र्याच्या कुटुंबाशी संबंधित मोठे खोदकाम आणि सपाटीकरण सुरू असल्याचे निदर्शनास आल्याची माहिती समितीचे शशिकांत दायमा यांनी दिली आहे.

या परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड आणि डोंगर कापण्यात आले आहेत. माती आणि दगड काढल्यामुळे डोंगराचा नैसर्गिक उतार बदलला असून, अनेक ठिकाणी माती, दरड घसरण्याचे प्रकार घडले असावेत, असेही दायमा यांनी सांगितले. पावसाच्या पाण्यासोबत हीच लालसर माती आणि उत्खननातील राडारोडा थेट चिल्हार नदीत मिसळली असावी असाही समितीचा दावा आहे.

पिंपळोळी, काळेवाडी, तलवाडे, भाकरीचा पाडा आणि कोलीवली या भागातून वाहणारी चिल्हार नदी पुढे उल्हास नदीला मिळते. त्यामुळेच चिल्हार नदीतील हा लालसर गाळ थेट उल्हास नदीत येऊन पाण्याचा रंग बदलत असल्याची दाट शक्यता समितीने वर्तवली आहे. पाहणीदरम्यान चिल्हार नदीतील दगडांवरही लालसर मातीचा थर साचलेला आढळून आला आहे.

पावसामुळेही चिखल झाल्याची शक्यता

विशेष म्हणजे या भागात मोजक्या ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्याची माहिती खासगी हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी दिली आहे. कर्जत, नेरळच्या आसपासच्या भागात २१ ते २४ सप्टेंबर दरम्यान काही ठिकाणी एक ते दोन तासात ६० ते १०० मिलीमीटर पाऊस झाल्याची नोंद मोडक यांनी सांगितली आहे. त्यामुळे खोदकाम आणि सपाटीकरणाच्या कामातील लालसर माती चिल्हार नदीत पुढे उल्हास नदीत आली असल्याची शक्यता व्यक्त होते आहे.

चौकशीची मागणी

पाण्याचा रंग निवळण्यास सुरुवात झाली असली तरी शास्त्रीय तपासणीची मागणी कृती समितीने केली आहे. चिल्हार, पेज आणि उल्हास नदीच्या पाण्याचे एकाच वेळी नमुने घेऊन त्यांची वैज्ञानिक तपासणी करावी, तसेच उत्खननातून बाहेर पडलेली माती आणि नदीतील लालसर गाळ यांचे तुलनात्मक परीक्षण करावे, अशी मागणी समितीने केली आहे. या संपूर्ण प्रकाराची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, जिल्हाधिकारी, तहसीलदार, वन विभाग आणि जलसंपदा विभागाने संयुक्त स्थळ पाहणी करावी. तसेच डोंगर कापणे, वृक्षतोड आणि नदीपात्रात उभारण्यात आलेल्या संरक्षक भिंतींसाठी संबंधित प्राधिकरणांची रीतसर परवानगी घेण्यात आली आहे का, याची सखोल चौकशी करून अहवाल सार्वजनिक करावा, अशी आग्रही भूमिका समितीने मांडली आहे.