श्वानकेंद्रांचे पशुवैद्यकांशी लागेबांधे?

केंद्रात हाडे मोडूनही ‘साशा’ची दुखापत ‘किरकोळ’!

चिन्मय मांडलेकर यांना कटू अनुभव; केंद्रात हाडे मोडूनही साशाची दुखापत किरकोळ’! 

श्वान म्हणजे कुटुंबातील सदस्यच. जीवापाड जपलेले श्वान जणू काही आपली सावलीच बनलेले असते. मात्र श्वानाला अपरिहार्य कारणास्तव श्वान केंद्रात ठेवायची वेळ आली तर सावधान! तुमचा श्वान सुखरूप असेल, याची शाश्वती ठेवण्यासारखी परिस्थिती नसल्याचे अभिनेता चिन्मय मांडलेकर यांच्या कटू अनुभवातून पुढे आले आहे. विशेष म्हणजे श्वानाला गंभीर दुखापत झाली असली तरी ती किरकोळ असल्याच्या श्वान केंद्राच्या दाव्यावर पशुवैद्यकही शिक्कामोर्तब करतात, या अनुभवाने या दोहोंचे लागेबांधे असण्याची शक्यता मांडलेकर यांनी व्यक्त केली आहे.

अभिनेता चिन्मय मांडलेकर यांच्याकडे दीड दिवसांचा गणपती असतो. गणेशोत्सवाच्या धामधुमीत साशा या आपल्या सैबेरियन श्वानाकडे नीट लक्ष देता येणार नसल्याने त्यांनी देखभालीसाठी तिला ३ सप्टेंबरला भिवंडीतील ‘अ‍ॅपसॅन्स कनिन रिसॉर्ट’ या नावाजलेल्या श्वान केंद्रात दाखल केले. गणपती विसर्जनानंतर चिन्मय ७ सप्टेंबरला साशाला घरी आणण्यासाठी गेले. साशा लंगडतच श्वान केंद्राबाहेर आल्याने चिन्मय यांना धक्काच बसला. याबाबत विचारणा केली असता एका दिवसापूर्वी साशा खेळताना पडल्याचे त्याला श्वान कंेद्र चालकांकडून सांगण्यात आले. दुखापतीनंतर साशावर श्वान केंद्रात कोणतेही प्राथमिक उपचार करण्यात आले नाहीत. उलट सैबेरियन हस्की जातीच्या श्वानांना अ‍ॅलर्जी होत असल्याचे कारण त्यासाठी श्वान केंद्राच्या मालकाकडून सांगण्यात आले.

चिन्मयने ठाण्यातील पशुवैद्यक डॉ. जया चॅरियर यांच्याकडे साशाला उपचारासाठी नेले. तिथे साशाच्या पायाचे एक्सरे काढण्यात आले. एका पायाची दोन हाडे मोडल्याचे त्यातून लक्षात आले. मात्र डॉ. चॅरियर यांनी साशाच्या हाडाला किरकोळ दुखापत असल्याचा अहवाल दिल्याचे चिन्मय यांनी सांगितले. एक्सरे अहवाल, पशुवैद्यकांचे निदान आणि साशाची स्थिती लक्षात येताच चिन्मय यांनी तिला उपचारासाठी इतर पशुवैद्यांकडे नेले. या वैद्यांच्या सल्ल्यातून साशाच्या पायाला गंभीर दुखापत असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे डॉ. जया चॅरिअर आणि अ‍ॅपसॅन्स कॅनिन रिसॉर्ट श्वान केंद्राचे लागेबांधे असल्याची शक्यता चिन्मय मांडलेकर यांनी फेसबुक पेजवर व्यक्त केली.

अपघाताबाबत साशंकता

श्वान केंद्रात साशा नेमकी कुठे पडली आणि हा अपघात कसा झाला, हे कळण्यासाठी मांडलेकर यांनी श्वान केंद्रातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील चित्रीकरण मागितले. मात्र कॅमेरे बंद असल्याचे केंद्राकडून त्यांना सांगण्यात आले. यामुळे केंद्राची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप मांडलेकरांनी केला आहे.

प्राणी कायदा काय सांगतो?

प्राण्यांना जीवे मारणे किंवा अपंग करणे या गुन्ह्य़ांसाठी भारतीय दंड संहितेत ४२९ कलम आहे. या कलमानुसार पाच वर्षांपर्यंत कैद आणि दंड अशा शिक्षेची तरतूद आहे. तसेच श्वान केंद्राच्या मालकाकडून उपचाराचा खर्च घेता येऊ शकतो, असे मुंबई उच्च न्यायालयातील अ‍ॅनिमल वेल्फेअर ऑफिसर मित आशर यांनी सांगितले.

 

श्वानांना केनेलच्या आवारात खेळायला सोडले असताना साशा पडली आणि तिला दुखापत झाली. त्या वेळी साशाला दुखत नसल्याचे निदर्शनास आल्याने डॉक्टरांना बोलावले नाही. सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे काम सुरू आहे. त्यामुळे चित्रीकरण दाखवता येणे शक्य नाही.

 –सनिल कदम, मालक, अ‍ॅपसॅन्स कॅनिन रिसॉर्ट

 

साशाच्या पायाला काही दिवसांचे प्लास्टर करून उपचाराने पाय बरा होऊ शकतो. अ‍ॅपसॅन्स कॅनिन रिसॉर्ट श्वान केंद्राशी आमचे कोणतेही वैयक्तिक संबंध नाहीत. इतर डॉक्टरांचे श्वान त्या ठिकाणी जातात त्याचप्रमाणे माझे श्वान या केंद्रात पाठवते. एवढाच संबंध येतो.

 –डॉ. जया चॅरिअर, पशुवैद्य

 

साशाला पट्टय़ाशिवाय फिरवू नका, असे श्वान केंद्राच्या मालकाला स्पष्ट सांगण्यात आले होते. अपघात घडल्यानंतर श्वान केंद्राच्या मालकांनी डॉक्टरांना किंवा आम्हाला कोणतीही माहिती दिली नाही.

 – नेहा मांडलेकर

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Chinmay mandlekar comment on dog center

ताज्या बातम्या