चिरनेर हुतात्मा वारसांची ससेहोलपट सुरूच, शासकीय स्मृतिदिन सोहळ्यात आत्मदहनाचा इशारा

उरणमधील काही भूमाफियांनी शासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून जमिनीच्या वारस नोंदीत फेरफार केल्याचा वारसांचा आरोप आहे.

रायगड जिल्ह्य़ातील उरण तालुक्यातील चिरनेर येथील आंदोलनात हुतात्मा झालेले हसुराम बुधाजी घरत यांच्या वारसांना इनाम म्हणून मिळालेल्या जमिनीच्या हक्कावरून उद्भवलेला वाद अद्याप कायम आहे. या संदर्भात गेली काही वर्षे शासनदरबारी पत्रव्यवहार आणि हेलपाटे घालून हताश झालेल्या घरत कुटुंबीयांनी अखेर चिरनेर सत्याग्रह स्मृतिदिनी २५ सप्टेंबरला होणाऱ्या शासकीय कार्यक्रमस्थळी आत्मदहन करण्याचा इशारा दिला आहे.

उरणमधील काही भूमाफियांनी शासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून जमिनीच्या वारस नोंदीत फेरफार केल्याचा वारसांचा आरोप आहे.
हुतात्मा हसुराम घरत यांच्या वारसांना उरण तालुक्यातील मौजे खोपटे गावात सव्र्हे नं. ३५/२ ची ३८ गुंठे शेतजमीन इनाम म्हणून मिळाली आहे. तेव्हापासून घरत कुटुंबीय या जमिनीत कब्जेदार म्हणून कसत आहेत. ज्यांच्या नावावर जी जमीन आहे, ते जमीनदार वसंत माधव वेदक १५ डिसेंबर १९५१ रोजी मृत्यू पावले. त्यानंतर तब्बल ५९ वर्षांनंतर १० डिसेंबर २०१० रोजी किशोर वसंत वेदक आणि सावित्रीबाई वसंत वेदक यांची नावे या जमिनीच्या सातबाऱ्यावर वारसदार म्हणून नोंदविण्यात आली आहेत. एवढय़ा वर्षांनंतर वारस नोंद करताना तत्कालीन तहसीलदारांनी कब्जेदार असूनही आम्हाला अंधारात ठेवले, असा घरत कुटुंबीयांचा आरोप आहे.

‘ध चा मा’
पनवेल उपविभागीय अधिकाऱ्यांनी घरत यांचा वारस नोंदीबाबतचा अर्ज फेटाळून लावताना जुन्या अभिलेखानुसार ही जमीन तत्कालीन काँग्रेस कमिटी सदस्य त्र्यंबक नारायण बेडेकर आणि वसंत माधव वेदक यांच्या नावे खरेदी केल्याचे नमूद केले आहे. मात्र त्याच परिच्छेदात पुढे मात्र शासकीय आदेशातच वसंत महादेवराव वेदक यांच्या नावाची नोंद आहे. त्यामुळे ‘माधव’ की ‘महादेव’ असा नावाचा घोळ कायम आहे. हुतात्मा हसुराम घरत यांचे वारस नारायण घरत यांनी लिहिता-वाचता येत नसल्याने ती बक्षीसपात्र जमीन उपरोक्त काँग्रेस कमिटी सदस्यांची नावे होती. पुढे की कायम राहिल्याने हा घोळ झाला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Chirner legend not getting justice

ताज्या बातम्या