ब्रिटिशांसोबत पोर्तुगीजांनीही विविध देशांमध्ये आपल्या वसाहती निर्माण केल्या. भारतात गोवा, पाँडेचेरी, दीव-दमण, वसई या ठिकाणी पोर्तुगीज वसाहतीच्या खुणा जागोजागी आढळतात. या ठिकाणी पोर्तुगीजांनी शेकडो चर्च उभारली आहेत. त्यातील काही चर्च ऐतिहासिक ठरली आणि त्या चर्चच्या नावावरून त्या गावालादेखील त्यांची नावे प्राप्त झाली. या चर्चची बांधकामे झाली तो काळ युरोपमध्ये ‘रेनेसांज’ म्हणजे परिवर्तनाचा काळ. या काळावर पोर्तुगालमध्ये तिथला प्रसिद्ध राजा मॅन्युअल याचा मोठा प्रभाव होता, म्हणून त्या कालखंडातील स्थापत्यशास्त्राला ‘मॅन्युएलियन स्थापत्य व कलाकुसर’ असे म्हटले जाते. वसई किल्ल्यात जी भली मोठी सात चर्च होती, त्यातील काही चर्च आणि वसई किल्ल्याबाहेर उभी असलेली काही चर्च याच शैलीत उभी राहिली आहे.
चर्चमध्ये ‘बारोख’ नावाच्या स्थापत्यशास्त्राच्या अनुषंगाने काही चर्च बांधण्यात आली. वसईतील थोडीच काही चर्च या शैलीत बांधण्यात आली आहेत. आज किल्ल्यामध्ये शिरताच उजव्या हातावर काहीशा तांबूस रंगाच्या दगडात संत अंतोनी याला समर्पित केलेले एक चर्च उभे आहे. त्या चर्चच्या प्रवेशद्वाराजवळ एक सभामंडप आहे. त्या सभामंडपाला अर्धवर्तुळाकार अशा तीन कमानी आहेत, तसेच या चर्चच्या सुरुवातीच्या भिंतीला तीन अर्धवर्तुळाकार प्रवेशद्वारे आहेत. त्या कलाकुसरीला ‘बारोख’ असे म्हटले जाते.
अनेक चर्चमध्ये गॉथिक नावाचे स्थापत्यशास्त्र वापरण्यात आले आहे. या स्थापत्यशास्त्रात चर्चमधील प्रत्येक दगड आकाशाकडे डोकावणारा असतो. चर्चचे शिखरही उंची आणि निमुळते असते. जो भाविक चर्चमध्ये जातो, त्याची नजर आणि लक्ष हे आकाशातल्या देवपित्याकडे लागावे ही त्यामागची भावना. वांद्रे येथील जगप्रसिद्ध माऊंट मेरी चर्च, आपले चर्च आणि गिरीज येथील चर्च ही त्या शैलीमध्ये बांधलेली आहेत. अशा देवळाच्या पटांगणात आपण शिरताच त्या चर्चच्या उंच शिखराकडे नजर जातेच.
येशू ख्रिस्ताची शिकवण चार शिष्यांनी लिहून ठेवली, त्यांना ‘सुवार्तिक’ असे म्हणतात. बऱ्याच चर्चमध्ये चार खांबांवर या सुवर्तिकांशी शिल्पे साकारलेली दिसतात. वसईतील बऱ्याच चर्चमध्ये प्रमुख वेदी आणि त्या वेदीत कलाकुसरीने मढवलेले चार स्तंभ गुंफलेले आपल्यास पाहावयास मिळतात. नंदाखालसारख्या ऐतिहासिक चर्चच्या वेदीमध्ये आपल्याला अशा प्रकारचे स्थापत्य पाहावयास मिळते. या चर्चमध्ये जे चार स्तंभ आहेत, त्याच्या बुडाशी हातामध्ये लेखणी म्हणून मोरपिसे घेतलेले चार चेहरे आपल्याला दिसतात. ते आहेत येशूचे चार सुवार्तिक. त्या चार मस्तकांवर त्या चर्चच्या वेदीचा सर्व संभार अधिष्ठित केलेला आहे.
अधिक खोलात गेल्यास तेथे आपल्याला ख्रिस्ती धर्माची शिकवण दडलेली दिसते. कोणत्याही एका विशिष्ट स्थापत्यकलेचा प्रभाव त्या चर्चच्या इमारतीवर पडलेला असला तरी कालानुरूप अन्य स्थापत्यशास्त्राचा प्रभावही त्याच्यावर पडलेला दिसतो. कारण बऱ्याचशा वेळेला त्या चर्चचे आर्किटेक्ट हे पाश्चिमात्य संस्कृतीतील असले तरी प्रत्यक्षात चर्चची जडणघडण करणारे कलाकार भारतीय होते. त्याच्यावर हिंदू आणि मुस्लीम या धार्मिक स्थापत्यशास्त्राचा पगडा होता. त्यामुळे युरोपमधील पाश्चिमात्य संस्कृतीतली चर्च आणि भारतातील चर्च यांच्या थोडीफार तफावत आहे.