चर्चेतील चर्च : प्रकाशाची वाट दाखवणारे चर्च

सध्या या चर्चचे प्रमुख धर्मगुरू फादर ग्रेग परेरा असून फादर विल्यम फरेरा हे साहाय्यक धर्मगुरू आहेत.

fatima church
फातिमा माता चर्च, चुळणे
फातिमा माता चर्च,  चुळणे

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी एक वेगळा पायंडा पाडला. त्यांना तळेगाव येथे काचेचा कारखाना स्थापन करायचा होता. एकेकाने एक एक पैसा द्यावा असा तो प्रकल्प होता. त्यातून ‘एक पैसा’ हा काचेचा कारखाना उभा राहिला. अन्य प्रकारांच्या काचांबरोबर कंदिलाच्या काचादेखील तेथे तयार होऊ  लागल्या. त्या कंदिलाने देशभर हजारोंना प्रकाशाची वाट दाखवली.

[jwplayer EhYE3X0s]

चर्चमध्येदेखील असाच एक पायंडा चुळणे गावाने पाडला. सांडोर धर्मग्रामात असलेले फादर फिऊलप तवारीस यांचे नेतृत्व लागताच चुळणे गावातील दिग्गजांनी महिलांकडून पैसा पैसा वसूल करण्याचा प्रकल्प १९५१ मध्ये चालू केला. त्या निधीच्या बळावर गावात चर्च उभारण्याची स्वप्ने आकार घेऊ  लागली. सुरुवातीला मिस्सा विधी हा गावातील सोसायटीच्या इमारतीमध्ये व्हायचा. १९६४ मध्ये तो चर्चमध्ये होऊ  लागला.

चुळणे गाव तसे वैशिष्टय़पूर्ण. सांडोर, माणिकपूर व गास या गावांच्या सीमांपासून अलिप्त पडलेल्या एका बेटावर जी लोकवस्ती होती ती शंभर टक्के कॅथॉलिक लोकांची होती. गावात पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष असल्यामुळे इतर लोकांनी त्या गावात जाण्याचे धारिष्टय़ काही केले नाही. गावात जेव्हा बाहेरचे पिण्याचे पाणी आले तेव्हाच कुठे बाहेरचे लोक या गावाकडे आकृष्ट होऊ  लागले आणि तिथे चाळी व इमारती उभ्या राहू लागल्या. गावाचे लोक अत्यंत मेहनती. परंतु शेतजमीन ही अर्धी खारट असल्यामुळे लोकांच्या हाती रात्याचेच भात पडे व त्याची रोटी चविष्ट होती. पावसाळ्याच्या दिवसांत समुद्राचे उधाण गावाजवळ पोहोचत असल्यामुळे गावातील लोकांना पावसाळ्यात मासळी पकडणे हा एक बहारदार विरंगुळा होता. मात्र गावात नळाचे गोडे पाणी उपलब्ध होताच गावाचे नूर बदलले. मूळच्या खडकावर हिरवळ दिसू लागली. लोकांनी घराभोवती बागायती कलमे लावली व सणासुदीला लागणारे आंबा, पेरू, चिकू हे गावातच उपलब्ध होऊ  लागले. वाळवंटाचे जणू ओअ‍ॅसिस झाले. जोपर्यंत ही बागायत नव्हती तोपर्यंत गावाने शिक्षणावर भर दिला व या गावातून जे अनेक शिक्षक निर्माण झाले त्यांनी मुंबई महानगरपालिकेत मोलाचे योगदान दिले.

चुळणे गाव पूर्वापार सांडोर चर्चचा उपभोग घेई. गावातील लोक दोन मैल अंतर तुडवून या चर्चला जात. पावसाळ्याच्या दिवसांत शेतशिवारातील रास्ता चिखलाचा, आजच्या सारखा रस्ता तेव्हा नव्हता म्हणून मे १९५२ या वर्षी सांडोर चर्चचे प्रमुख धर्मगुरू फादर मेंडीस यांच्या अध्यक्षतेखाली ‘चर्च कमिटी’ स्थापन झाली. या कमिटीने गावोगावी सणाला जाऊन तसेच मोतमाऊलीच्या चर्चमध्ये सणाच्या वेळी स्टॉल्स टाकून पै पैसा उभा केला. गावातील कलाकारांनी अनेक ठिकाणी नाटकाचे प्रयोग केले. फादर तवारीस यांनी उन्हातान्हात जिवाचे रान करून फातिमा माता हिच्या नावाने एक छोटेखानी नेटके चर्च १९६४ साली उभे केले. माऊलीची मूर्ती माणिकपूर गावचे समाज कार्यकर्ते सावमिंगेल कुलास यांनी दिली. या गावात जे फादर आले त्यांनी या पुतळ्याला साजेशी अशी सजावट मुख्य वेदीजवळ केली. ती अगदी अप्रतिम असून येणाऱ्या-जाणाऱ्यांचे लक्ष ही वेदी आपल्याकडे ओढून घेते.

चर्च येताबरोबर या गावाच्या विकासाला सुरुवात झाली. म्हणता म्हणता या गावातून उच्च बुद्धिमत्तेचे १५ धर्मगुरू व २६ धर्मभगिनी फादर तवारीस यांच्या पावलावर पाऊल ठेवून ईशसेवेला बाहेर पडली. औरंगाबादचे विद्यमान बिशप एलयास घोन्साल्विस हेदेखील या गावाचे सुपुत्र.

चुळणा गावचे रूप बदलण्यात एका बाजूला जसा गोडय़ा पाण्याचा सिंहाचा वाटा आहे तर तसा दुसऱ्या बाजूला आध्यात्मिकदृष्टय़ा चर्चचा वाटा आहे.

सध्या या चर्चचे प्रमुख धर्मगुरू फादर ग्रेग परेरा असून फादर विल्यम फरेरा हे साहाय्यक धर्मगुरू आहेत. या धर्मग्रामात ५२५ कुटुंबे असून त्यांची लोकसंख्या २२८१ आहे.

[jwplayer aDOxuc39]

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Churches of vasai fatima mata church chulne village in vasai