भाजप-शिवसेनेने गेल्या २० वर्षांत शहरांची वाट लावली असल्याचा हल्लाबोल करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी डोंबिवली येथील जाहिर सभेत कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले. राज यांनी आपल्या भाषणात सत्ताधारी शिवसेना-भाजपवर चौफेर टीका केली. पैसे मागण्यासाठी मुख्यमंत्री परदेश दौऱयावर जातात, अशा कानपिचक्या राज यांनी मुख्यमंत्र्यांच्या परदेश दौऱयांवरून दिल्या. तसेच विकासाच्या बाता करणारे सत्तेत येऊनही विकास काही झालेला दिसत नसल्याचेही राज म्हणाले. आघाडी सरकारच्या काळात जी परिस्थिती होती तिच परिस्थिती या सरकारच्या काळतही कायम असल्याचे सांगत आधीच्या सरकारच्या काळात दाभोलकरांची हत्या, या सरकारच्या काळात पानसरेंची हत्या, दोन्ही सरकार मध्ये फरक काय? असा सवाल राज यांनी उपस्थित केला. कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीसाठी पक्षाचा एकही उमेदवार फुटू दिला नसल्याचाही दावा राज यांनी केला. तसेच मनसेला एकहाती सत्ता देण्याचे आवाहन त्यांनी केले. नाशिकप्रमाणेच कल्याण-डोंबिवलीचा विकास करू व सत्ता दिल्यावर पुढील पाच वर्षात माझ्या हातून काहीच न घडल्यास पुढच्या निवडणुकीला पक्षाचा एकही उमेदवार उभा राहणार नाही, असे राज यांनी जाहीर केले. नाशिकमधील मनसेच्या कामाचा २८ आणि २९ ऑक्टोबरला होणाऱया जाहीर सभांमध्ये आढावा देणार असल्याचे राज यांनी सांगितले आहे. कल्याण-डोबिंवली महापालिका निवडणुकीसाठी राज ठाकरे यांच्या चार जाहीर सभा होणार आहेत.