लोकसत्ता खास प्रतिनिधी

डोंबिवली : शेअर गुंतवणुकीत आपण माझ्याकडे गुंतवणूक केली तर त्या रकमेवर आपण २० टक्के परतावा देतो, असे सांगून गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करून कोकणातील चिपळूण तालुक्यातील निवळी कोंडवाडी गावातील एका व्यावसायिकाने डोंबिवलीसह कोकण परिसरातील अनेक गुंतवणूकादाराची फसवणूक केली आहे. डोंबिवलीतील गुंतवणूकदाराची १६ लाखाची फसवणूक करण्यात आली आहे. या फसवणूक प्रकरणी डोंबिवलीतील ग्राहकाने विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुरुवारी तक्रार दाखल केली.

डोंबिवलीतील गुंतवणूकदार नवापाडा सुभाष रस्ता भागात कुटुंबीयांसह राहतात. ते मुंबई पालिकेत नोकरीला आहेत. ते मुळचे चिपळूण तालुक्यातील सावर्डे गावचे रहिवासी आहेत. तीन वर्षापूर्वी डोंबिवलीतील तक्रारदार गुंतवणूदाराला त्यांच्या नातेवाईक महिलेने चिपळूण जवळील निवळीचे एक गृहस्थ शेअर बाजारातील गुंतवणुकीतून २० टक्के परतावा देतात, असे सांगितले. गुंतवणुकीवर कमी कालावधीत वाढीव परतावा मिळतो म्हणून डोंबिवलीतील गुंतवणूकदाराने प्रत्यक्ष, मोबाईलद्वारे संबंधित व्यावसायिकाशी संपर्क साधला. त्यांनीही गुंतवणुकीवर २० टक्के परताव्याची हमी दिली. आपण रक्कम धनादेशाव्दारे नव्हे तर रोखीने रक्कम स्वीकारतो, अशी अटक व्यावसायिकाने गुंतवणूकदारांना टाकली होती.

व्यावसायिकावर विश्वास बसल्यावर डोंबिवलीतील गुंतवणूकदाराने दोन लाखापासून चिपळूणमधील व्यावसायिकाच्या सल्ल्याने शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास सुरूवात केली. गुंतवणूक रकमेवर व्यावसायिकाने विहित वेळेत परतावा देण्यास सुरूवात केली. चार लाख गुंतवणूक केल्यावर त्या रकमेवर दोन लाख २३ हजाराचा परतावा गुंतवणूकदाराला देण्यात आला. गुंतवणुकीवर जसा परतावा मिळत गेला तसा चिपळूणच्या व्यावसायिकाने डोंबिवलीतील गुंतवणूकदाराला अधिकची रक्कम गुंतवणूक करण्यास भाग पाडले. आपणास दिलेल्या शब्दाप्रमाणे व्यावसायिकाची पत्नी, आई, वडील, भाऊ यांनीही आपल्या गुंतवणुकीवर हमखास चांगला परतावा मिळेल, अशी हमी दिली होती.

वाढीव परताव्याच्या आमिषाने गुंतवणूकदाराने व्यावसायिकाकडे आपल्या नातेवाईकांच्या माध्यमातून १९ लाख रूपये रोखीने दिले. या रकमेवर अधिक परतावा मिळेल असे गुंतवणूकदाराला वाटले. या गुंतवणुकीवर नियमितचा परतावा मागण्यास डोंबिवलीतील गुंतवणूकदाराने सुरुवात केली. त्यावेळी व्यावसायिकाने थोड्या अवधीत परतावा देतो अशी कारणे सांगून परतावा देण्यास टाळाटाळ सुरू केली. डोंबिवलीतील गुंतवणूकदाराने चिपळूण येथे जाऊन व्यावसायिकाची भेट घेतली. त्यावेळी त्यांच्या नातेवाईकांनी तुमची रक्कम लवकरच मिळेल असे सांगितले. व्यावसायिकाने एका हमीपत्रावर आपल्या गुंतवणुकीच्या रकमेवर तुम्हाला २३ लाख रूपये तीन महिन्यात देतो असे लिहून दिले. त्याची पूर्तता करण्यात आली नाही.

काही मध्यस्थांच्या मदतीने व्यावसायिकाने आपल्या बँक ऑफ इंडियाच्या बँक खात्याचे दोन धनादेश गुंतवणूकदाराला दिले. व्यावसायिकाच्या खात्यात पैसे नसल्याने ते वटले नाहीत. व्यावसायिक आपली फसवणूक करत असल्याचे निदर्शनास आल्यावर डोंबिवलीतील गुंतवणूकदाराने व्यावसायिक आणि त्याच्या वडील, भाऊ आणि पत्नी विरुध्द विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. या व्यावसायिकाने इतर अनेक गुंतवणूकदारांची फसवणूक केली आहे, असे तक्रारादाराने तक्रारीत म्हटले आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.