लोकसत्ता खास प्रतिनिधी

डोंबिवली : डोंबिवली शहरातील अनेक रस्ते गॅस वाहिन्या टाकण्यासाठी खोदून ठेवण्यात आल्या आहेत. काही ठिकाणी नवीन रस्ते कामांसाठी रस्त्यांची खोदाई करण्यात आली आहे. या खोदकामांमुळे शहरांमध्ये जागोजागी वाहन कोंडी होत आहे. या सततच्या कोंडीने प्रवासी, विशेषता शाळा चालक सर्वाधिक हैराण आहेत.

डोंबिवली पूर्व भागात गेल्या दोन वर्षापासून काँक्रीट रस्ते कामे सुरू आहेत. या रस्त्यांसाठी खोदकाम करण्यात आले आहे. काही ठिकाणी गटार कामांसाठी खोदून ठेवण्यात आले. या भागात सततची रस्ते खोदाई सुरू असल्याने या भागातून येजा करणाऱ्या प्रवाशांना त्याचा सर्वाधिक त्रास होत आहे. शाळेच्या बस दत्तनगर, डॉ. राजेंद्र प्रसाद रस्ता भागातून येजा करतात. खराब रस्त्यांमुळे मुलांना सकाळी शाळेत, संध्याकाळी घरी जाण्यास उशीर होतो. दत्तनगर भागात स्मशानभूमी आहे. दहनासाठी पार्थिव आणताना नागरिकांना कसरत करत पार्थिव स्मशानभूमीपर्यंत न्यावे लागते. आता राजेंद्र प्रसाद रस्त्यावर रस्ते खोदकाम करण्यात आले आहे. सर्वाधिक वर्दळीचा रस्ता आहे. एका बाजुने वाहनांना येजा करावी लागते. त्यामुळे या भागातील चौक, रस्त्यांवर कोंडी होते.

आणखी वाचा-बदलापूरच्या होम प्लॅटफॉर्मचे आज लोकार्पण

पालिकेच्या तिजोरीत खडखडात असतान दत्तनगर भागाला पालिकेने रस्ते कामांसाठी निधी कसा आणि कधी उपलब्ध करून दिला, असे प्रश्न जाणकार नागरिक करत आहेत. शहराच्या अनेक भागात गॅस वाहिन्या टाकण्याची कामे सुरू आहेत. रस्त्याच्या कडेला खोदलेला भाग माती टाकून तात्पुरत्या स्वरुपात बुजविला जातो. त्यामुळे माती, बारीक खडीवरून दुचाकी वाहने घसरण्याचे प्रमाण अधिक आहे.

पालिकेने सेवा वाहिन्या, काँक्रीट रस्ते कामे करणाऱ्या ठेकेदांवर नियंत्रण ठेऊन रस्ते कामे करून घ्यावीत, अशी मागणी नागरिक करत आहेत. टिळकनगरमध्ये काँक्रीटचा नवाकोऱ्या रस्त्याचा कडेचा भाग खोदून गॅस वाहिन्या टाकण्यात आल्या आहेत. यामुळे नागरिक नाराज आहेत. दत्तनगरमध्ये सेवा वाहिन्या टाकताना सोसायट्यांना पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या फोडण्यात आल्या आहेत. त्यामुळे अनेक सोसायट्यांना कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. सेवा वाहिन्या टाकणाऱ्या ठेकेदाराचे कामगार मनमानीने खोदकाम करतात. त्याचा फटका रहिवाशांना पाणी टंचाईच्या माध्यमातून बसत आहे, असे दत्तनगर भागातील रहिवासी विनोद बारी यांनी सांगितले.