डोंबिवली – मागील वर्षापासून रखडलेला डोंबिवली पश्चिमेतील श्रीधर म्हात्रे चौक ते अनमोल नगरी रस्ता मार्गी लावण्यास प्रशासनाकडून चालढकल सुरू आहे. त्याचा निषेध आणि हे काम पाऊस सुरू होण्यापूर्वी पूर्ण करावे, या मागणीसाठी गरीबाचा वाडा उत्कर्ष समिती आणि नागरिकांच्या उपस्थितीत रविवारी श्रीधर म्हात्रे चौकात निषेध आंदोलन करण्यात आले.

सुमारे दोन हजाराहून अधिक नागरिक या आंदोलनात सहभागी झाले होते. गेल्या वर्षी एमएमआरडीएच्या माध्यमातून या सुमारे ३०० ते ४०० मीटर लांबीच्या रस्ते कामाला सुरूवात करण्यात आली. हा रस्ता रूंदीकरण आणि काँक्रीटीकरणाचा केला जाणार आहे. वर्ष होत आले तरी या रस्त्याचे अतिशय संथगतीने काम सुरू असल्याने या रस्त्यावर दररोज अलीकडे वाहतूक कोंडी होते. नागरिकांनी रेटा लावल्यामुळे या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले.

आता या रस्त्याच्या दुतर्फाची गटारे बांधणीची कामे सुरू आहेत. ही कामे संथगतीने सुरू असल्याने आणि बांधकामाचे साहित्य, माती, मलब या भागात पडलेला असल्याने नागरिकांना या रस्त्यावरून चालणे अवघड होते. अवजड वाहन, रेडिमिक्सर या रस्त्याने जात असतील तर वाहने कोंडीत अडकतात. अनमोलनगरीच्या पुढील भागात वळण रस्त्याचे काम सुरू आहे. त्यामुळे एमएमआरडीएची अवजड वाहने याच रस्त्यावरून धावतात.अनमोलनगरी, गरीबाचावाडा, देवीचापाडा भागातील नागरिकांची या रस्त्यावरून वर्दळ असते. पाऊस सुरू होण्यापूर्वी या रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण झाले नाहीतर या भागात चिखल आणि पाणी तुंबण्याचे प्रकार होतील, असे आंदोलनकर्त्या गरीबाचावाडा उत्कर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

श्रीधर म्हात्रे चौक ते प्रकाश प्रतिमा सोसायटीपर्यंतचा रस्ता सखल आहे. यापूर्वी या भागात नेहमीच पाऊस पडला की पाणी तुंबण्याचे प्रकार घडले आहेत. आता या रस्त्याच्या दुतर्फा उंच गटारे आणि खोलगट रस्ता असे चित्र आहे. मुसळधार पाऊस पडला तर या भागात गुडघाभर पाणी साचेल, अशी भीती नागरिक व्यक्त करत आहेत.

ही कामे लवकर पूर्ण करावी म्हणून रविवारी उत्कर्ष समितीचे सदस्य आणि परिसरातील नागरिक या निषेध आंदोलनात सहभागी झाले होते. गरीबाचावाडा उत्कर्ष समितीचे अध्यक्ष विवेकानंद धवसे, उपाध्यक्ष युवराज सकपाळ, वैभव केसरकर, विजय राऊत, दीपेश सोनी, संदीप सालेकर प्रतिक म्हामुणकर, सुनील पांचाळ, श्याम बोलके, बारी जयवंत, विकास शिर्के यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या आंदोलनाची माहिती मिळताच आमदार रवींद्र चव्हाण, पालिकेचे कार्यकारी अभियंता मनोज सांगळे घटनास्थळी आले. आमदार चव्हाण यांनी एमएमआरडीएचे अधिकारी, पालिका अधिकाऱ्यांशी संवाद साधून तातडीने हे काम पूर्ण करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले.