डोंबिवली – डोंबिवली पूर्व शिवमंदिर रस्त्यावरील शहराच्या मध्यवर्ति ठिकाणच्या शिवमंदिर स्मशानभूमीतील स्वच्छतागृहातील सांडपाणी स्वच्छतागृहाच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत वाहत येत असल्याने स्मशानभूमीत प्रवेश कसा करायचा, असा प्रश्न स्मशानभूमीत पार्थिव घेऊन येणाऱ्या नागरिकांना पडत आहे. स्वच्छतागृहाची दैनंदिन स्वच्छता केली जात नसल्याने आणि स्वच्छतागृहातील सांडपाणी स्मशानात पसरल्याने दुर्गंधीमुळे नागरिकांना नाकाला रुमाल धऊन उभे राहावे लागते.
मागील काही दिवसांपासून स्मशानभूमीत हा प्रकार सुरू आहे. दररोज सात ते आठ पार्थिव स्मशानभूमीत दहनासाठी येतात. विविध भागातून लोक अंत्ययात्रेसाठी येतात. त्यांना शहराच्या मध्यवर्ती भागातील ही दुर्गंधीने भरलेली स्मशानभूमी पाहून किळस येत आहे. या स्मशानभूमीवर कल्याण डोंबिवली पालिकेचे नियंत्रण आहे की नाही असे प्रश्न स्मशानभूमीत येणारे नागरिक करत आहेत.
अंत्येष्टीचे विधी, पार्थिवाचे दहन होईपर्यंत नागरिकांना स्मशानभूमीत एक ते दीड तास थांबावे लागते. तोपर्यंत स्वच्छतागृहातून येणारी दुर्गंधी आणि स्वच्छतागृहातून बाहेर पडलेल्या सांडपाण्याच्या उग्र वासाने उपस्थित नागरिक हैराण होत आहेत. काही नागरिक दुर्गंधीचा त्रास होत असल्याने स्मशानभूमीच्या बाहेर उभे राहत आहेत. डोंबिवली शहराच्या मध्यवर्ती ठिकाणची स्मशानभूमी म्हणून शिवमंदिर रस्त्यावरील स्मशानभूमीकडे पाहिले जाते. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणच्या या स्मशानभूमीची दुरवस्था पाहून नागरिक तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत.
मागील पाच ते सहा वर्षापासून शिवमंदिर स्मशानभूमीचे नुतनीकरण करून पालिकेकडून लाखो रूपये खर्च केले जात आहेत. प्रत्यक्षात या स्मशानभूमीची दुरवस्थाच नागरिकांंना पाहण्यास मिळत आहे. या स्मशानभूची डागडुजी, देखभाल होऊच नये. आणि ही स्मशानभूमी बंद व्हावी म्हणून एक राजकीय गट मागील पाच ते सहा वर्षापासून शहरात सक्रिय आहे. पण जागरूक नागरिक हा राजकीय मंडळींचा डाव हाणून पाडत आहेत.
स्मशानभूमी ही स्मशानभूमीच्या आरक्षणाच्या जागेत आहेत. पण या स्मशानभूमीच्या बाजुला असलेल्या इमारती आता पुनर्विकास आणि मोकळ्या जागांंवर विकासकांना इमले उभे करायचे आहेत. त्यामुळी ही स्मशानभूमी अन्य जागेत हटवली तर तेथे तात्काळ विकासक आजुबाजुच्या जुन्या इमारती, मोकळे भूखंड विकसित करण्यासाठी धावतील, असे काही मंडळींचे डाव आहेत. त्यामुळे यापूर्वी नंंदनवनासारखी जपलेली शिवमंदिर स्मशानभूमी आता उजाड झाल्याचे चित्र दिसत आहे.
शिवमंदिर स्मशानभूमीतील या दुर्गंधी आणि सांडपाण्याविषयी अनेक नागरिकांनी पालिकेत तक्रारी केल्या आहेत. पण कर्मचारी वर्ग पालिका निवडणूक कामात व्यक्त असल्याने या तक्रारींची कोणी दखल घेत नसल्याचे नागरिकांनी सांगितले. अधिक माहितीसाठी पालिका अधिकाऱ्यांना संपर्क केला, ते निवडणूक कामात व्यक्त असल्याने त्यांच्याश संपर्क होऊ शकला नाही.
