ठाणे : मुख्य मार्गांवरील खड्डे, सेवा रस्त्यांची दुरवस्था आणि वाहतुकीचे अपुरे नियोजन यामुळे होणाऱ्या वाहतुक कोंडीमुळे विटलेल्या घोडबंदर भागातील नागरिकांनी एकत्र येत ‘जस्टीस फॉर घोडबंदर रोड’ या नावाने जन आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी व्हॉट्सॲप ग्रुप तयार करण्यात आला आहे. ऑनलाईन स्वाक्षरी मोहीम, समाजमाध्यमांवर रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत छायाचित्र, चित्रीकरण टाकण्यास सुरूवात केली आहे. यानंतरही प्रशासनाला जाग आली नाही तर आंदोलनाचे हत्यार उपसण्याशिवाय पर्याय नाही असे रहिवाशांचे म्हणणे आहे. गेल्याकाही वर्षांपासून ठाणे जिल्ह्यातील घोडबंदर भागात म्हणजेच, कापूरबावडी ते गायमुख, भाईंदरपाडा भागात मोठ्याप्रमाणात गृहसंकुले उभी राहिली आहेत. नागरिकांना कोट्यवधी रुपये खर्च करून येथे गृहखरेदी केली आहे. मुंबईपासून जवळचा भाग असल्याने घोडबंदर भागात नोकरदारांच्या गृहखरेदीचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे मागील काही वर्षांपासून येथे मोठ्याप्रमाणात लोकवस्ती वाढली आहे. रस्ते मार्गाचा भार कमी करण्यासाठी येथे वडाळा- घाटकोपर- कासारवडवली या मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाचे काम सुरू आहे. त्यामुळे मुख्य रस्त्यांमधील दुभाजक, सेवा आणि मुख्य रस्त्याकडेला अडथळे बसविण्यात आले आहे. या प्रकल्पामुळे घोडबंदरची मुख्य मार्गिका अरुंद झाली आहे. येथे ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. तर कासारवडवली भागात सेवा रस्त्यांची अक्षरश: चाळण झाली आहे. आणखी वाचा-विश्लेषण: ठाणे खड्डे आणि कोंडीमुक्त कसे होईल? मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर परिस्थिती किती सुधारली? घोडबंदर मार्गावर वाहने बंद पडणे आणि खड्ड्यांमुळे दररोज वाहतुक कोंडी होऊ लागली आहे. येथे राहणारे नोकरदार महिला-पुरूष आणि शाळकरी विद्यार्थ्यांना याचा सर्वाधिक फटका सहन करावा लागतो. कोंडी टाळण्यासाठी नागरिकांनी त्यांच्या बाहेर पडण्याच्या वेळा बदलल्या आहेत. जेणेकरून वेळेत कार्यालयात पोहचता येईल. संतापलेल्या घोडबंदरमधील रहिवाशांनी जनआंदोलनाचा निर्णय घेतला आहे. येथील खड्डे आणि रस्त्यांची वाईट अवस्था याचे छायायित्र, चित्रफीती समाजमाध्यमांवर प्रसारित करण्यास सुरूवात केली आहे. ऑनलाईन स्वाक्षरी मोहीम देखील यावेळी हाती घेण्यात आली आहे. यानंतर प्रशासनाने रस्ते दुरुस्त केले नाही. तर नागरिक रस्त्यावर उतरतील असा इशारा त्यांनी दिला आहे. आणखी वाचा-डोंबिवलीतील कुख्यात एमडी किंग अटकेत समाजमाध्यमांवर आम्ही मोहीम हाती घेतली आहे. आमच्याकडे रस्त्यांच्या दुरावस्थेचे छायाचित्र आणि चित्रीकरण आहेत. हे सर्व तपशील समाजमाध्यमांवर पाठवून नागरिकांपर्यंत पोहचणार आहोत. परंतु यानंतरही प्रशासनाने दखल घेऊन कोणतीही कार्यवाही केली नाही. तर, उपोषणला बसून आंदोलन करू. -गिरीश पाटील, सदस्य, जस्टीस फाॅर घोडबंदर रोड.