ग्रामीण भागातील पारंपरिक जत्रा आणि नव्या महानगरीय जीवनशैलीतील विंडो शॉपिंगचे केंद्र ठरलेल्या मॉल- मल्टिप्लेक्स संस्कृतीचे मिश्रण डोंबिवलीतील आगरी महोत्सवात पाहायला मिळते. जत्रांमधील काहीशा अस्ताव्यस्त बाजाराबरोबरच अगदी टापटीप, पोशाखी वृत्तीला मानवेल अशी नेटकी दुकाने हल्ली आगरी महोत्सवात पाहायला मिळतात. विविध प्रकारचे खेळ, अस्सल गावरान पदार्थानी सजलेली सामिष उपाहारगृहे, शोभिवंत तसेच ग्राहकोपयोगी दुकाने असे अगदी सर्व काही आगरी महोत्सवाच्या मांडवात पाहायला मिळते. समाजातील वयोवृद्ध तसेच मोबाइलद्वारे एकमेकांचे सेल्फी काढण्यात मग्न असणारी तरुणाई असा सर्व थरांतील आगरी समाज मोठय़ा संख्येने या महोत्सवात येतोच, शिवाय शहरातील उत्सवप्रिय नागरिकही आवर्जून हजेरी लावतात.