ठाण्यात सध्या सुरू असलेल्या फेरीवाला हटाव मोहिमेदरम्यान मंगळवारी पालिका कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की झाल्याची घटना घडली . पालिकेने सध्या रस्त्यावर हातगाडी लावणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. याअंतर्गत वागळे इस्टेट येथील रामचंद्र नगर परिसरात मंगळवारी पालिकेचे पथक रस्त्यावरील अनधिकृत हातगाड्या हटवत होते. त्यावेळी काही हातगाडीच्या मालकांनी कारवाईला विरोध करत पालिकेच्या ३ ते ४ कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केली. या प्रकरणी वागळे इस्टेट पोलिसांनी दोन जणांना ताब्यात घेतले आहे.

फेरीवाल्यांना मैदान खुले?

ठाण्याच्या स्टेशन परिसरात काही दिवसांपूर्वी पालिकेचे उपयुक्त आणि जनसंपर्क अधिकारी संदीप माळवी यांना फेरीवाल्याकडून मारहाण झाली होती. त्यानंतर पालिका आयुक्तांनी अनधिकृत फेरीवाला विरोधात धडक कारवाई केली होती. हा सर्व प्रकार थंड होत असतानाच आज पुन्हा एकदा पालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने ठाण्यातील हातगाडी आणि फेरीवाल्यांवर पुन्हा एकदा कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. याचाच एक भाग म्हणून आज संध्याकाळी सात ते साडेसातच्या सुमारास वागळे इस्टेट परिसरातील हातगाडीवर कारवाई करण्यासाठी पालिकेचे पथक गेले असता त्यांना किरकोळ धक्काबुक्की झाली. यानंतर पालिकेच्या अतिक्रमण विभागाने १०० पेक्षा अधिक हातगाड्या रस्त्यावरून हटवल्या. या घटनेनंतर परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

‘सुरक्षा निधी’च्या नावाखाली खंडणी