scorecardresearch

ठाण्याच्या सीडी देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेत मार्गदर्शन वर्ग; विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याचे पालिकेचे आवाहन

महानगरपालिकेच्या चिंतामणराव देशमूख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेच्यावतीने स्पर्धा परीक्षा पुर्वतयारी मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे.

college student
( संग्रहित छायचित्र )

ठाणे : महानगरपालिकेच्या चिंतामणराव देशमूख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेच्यावतीने स्पर्धा परीक्षा पुर्वतयारी मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. या निःशुल्क मार्गदर्शन वर्गांसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात आले असून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केले आहे.

 सध्या पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या अथवा दुसऱ्या वर्षात असलेल्या विद्यार्थ्यासाठी चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेतर्फे स्पर्धा परीक्षा पूर्वतयारी मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. या वर्गात प्रवेश घेणेकरीता उच्च माध्यमिक परीक्षेत विज्ञान, वाणिज्य, कला शाखेत व पदविका परीक्षेत किमान ७० टक्के गुण मिळालेले विद्यार्थी अर्ज करण्यास पात्र आहेत, अशी माहिती पालिकेने दिली.

या वर्गात प्रवेश घेण्यास इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांनी ४ ते २९ जुलै पर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत उच्च माध्यमिक परीक्षा उत्तीर्ण गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला, आणि स्टॅम्प साईज छायाचित्राच्या दोन प्रतीसह संस्थेकडील उपलब्ध असलेल्या विहीत नमुन्यात अर्ज सादर करावा. टपालद्वारे, कुरिअरद्वारे तसेच ई-मेल द्वारे प्राप्त झालेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत किंवा विचारात घेतले जाणार नाहीत याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी, असेही पालिकेने स्पष्ट केले आहे.

प्रवेश परीक्षेचा अभ्यासक्रम, परीक्षेसंबंधी सर्व माहिती व सूचना संस्थेच्या नोटीस बोर्डावर तसेच ठाणे महापालिकेच्या wwww.thanecity.gov.in व संस्थेच्या http://www.cdinstitute.net तसेच  http://www.cdinstitute.in या संकेतस्थळावर उपलब्ध देण्यात आली आहे. जास्तीत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केले आहे.

तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि सुसज्ज ग्रंथालय

प्रशिक्षण केंद्रात तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेतली जाते. संस्थेचे अद्ययावत ग्रंथालय असून स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणारी जगभरातील नियतकालिके येथे विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आली आहेत. ग्रंथालयासाठी दरवर्षी महापालिका प्रशासन मोठ्या प्रमाणात अत्यावश्यक पुस्तके खरेदी करते. तसेच सकाळी ८ ते रात्री १० दहापर्यंत येथील अभ्यासिका विद्यार्थ्यांसाठी खुली असून वायफाय-इंटरनेट सुविधाही विनामूल्य देण्यात आली आहे. 

उल्लेखनीय कामगिरी

ठाणे महापालिकेने १९८७ मध्ये चिंतामणराव देशमूख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेची निर्मिती केली. तेव्हापासून आजतागायत या संस्थेतून एकूण ६८ प्रशिक्षणार्थीनी भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय पोलिस सेवा, इतर संलग्न स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविले आहे. तसेच, महाराष्ट्र लोकसेवा आयोग व इतर संलग्न स्पर्धा परीक्षांमध्ये संस्थेतील एकूण ४०० पेक्षा अधिक प्रशिक्षणार्थीनी यश संपादन केलेले आहे. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन क्षेत्रात चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्था सातत्याने उल्लेखनीय कामगिरी करीत आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Classes cd deshmukh administrative training institute municipal appeal admission students ysh

ताज्या बातम्या