scorecardresearch

अंबरनाथ पालिकेच्या रूग्णालयाचा मार्ग मोकळा ; सुर्योदय सोसायटीतील चार एकर जमीनीचे पालिकेला हस्तांतरण

अंबरनाथ पूर्वेतील सुर्योदय सोसायटतील सुमारे चार एकर क्षेत्रफळाचा भुखंड रूग्णालयाच्या उभारणीसाठी अंबरनाथ नगरपालिकेला देण्याचा निर्णय नुकताच राज्य शासनाने जाहीर केला आहे.

hospital

अंबरनाथ पूर्वेतील सुर्योदय सोसायटतील सुमारे चार एकर क्षेत्रफळाचा भुखंड रूग्णालयाच्या उभारणीसाठी अंबरनाथ नगरपालिकेला देण्याचा निर्णय नुकताच राज्य शासनाने जाहीर केला आहे. त्यामुळे अंबरनाथ शहरात नवे रूग्णालय उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. मौज कानसई येथील अंदाजे ६० ते ७० कोटी रूपये बाजारमुल्य असलेला हा भुखंड मिळवण्यासाठी पालिका प्रशासन गेल्या अनेक महिन्यांपासून प्रयत्नशील होते.

करोनाच्या संकटात अंबरनाथ शहरातील आरोग्य व्यवस्था तोकडी असल्याचे दिसून आले होते. खासदार आणि आमदार दोघेही डॉक्टर असल्याने करोनाच्या संकटात अंबरनाथ शहरात तात्पुरत्या आरोग्य सुविधा उभारण्यात यश आले. मात्र त्याचवेळी कायमस्वरूपी आरोग्य सुविधा मिळाव्यात अशी मागणी जोर धरत होती. त्यानंतर शहरातील रूग्णालयासाठी आरक्षित असलेल्या भुखंडांचा शोध सुरू करण्यात आला होता. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी पालिका अधिकाऱ्यांसोबत जागेची पाहणीही केली होती. अखेर १९ मे रोजी राज्य शासनाने महसूल विभागाच्या ताब्यात असलेला चार एकरचा भुखंड अंबरनाथ नगरपालिकेला हस्तांतरीत करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. अंबरनाथ नगरपालिका क्षेत्रातील पूर्व भागात मौजे कानसई येथील सुर्योदय सोसायटीतील सर्वे क्रमांक ४४९० (अ) हा चार एकरचा भुखंड पालिकेला देण्यात आला आहे. या भुखंडाचे बाजारमुल्य अंदाजे ६० ते ७० कोटी रूपये आहे. हा भुखंड रूग्णालयासाठी आरक्षित ठेवण्यात आला होता. मात्र त्याचा ताबा पालिकेकडे नव्हता. करोनानंतर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यासाठी प्रयत्न सुरू केले. अंबरनाथ नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांनी याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला होता. नुकताच महसूल व वने विभागाने याबाबतचा शासन निर्णय जाहीर केला आहे. त्यानुसार सुमारे १६ हजार चौरस मीटर क्षेत्रफळाचा हा भुखंड पालिकेकडे मोफत हस्तांतरीत करण्यात आला आहे. यामुळे अंबरनाथ पूर्वेत रूग्णालय उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे.

वैद्यकीयदृष्ट्या सक्षम अंबरनाथ

अंबरनाथ पश्चिमेतील राज्य शासनाच्या डॉ. बी. जी. छाया उपजिल्हा रूग्णालयात नुकताच शस्त्रक्रिया विभाग नव्याने सुरू झाला. येथे विविध सुविधा उपलब्ध केल्या जात आहेत. पूर्व अंबरनाथमध्ये समायोजित आरक्षणातून १०० खाटांचे रूग्णालय उभे राहते आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्याल आणि रूग्णालयामुळे उपचार आणि वैद्यकीय शिक्षण अंबरनाथमध्ये उपलब्ध होणार आहे. तर नव्या रूग्णालयामुळे वैद्यकीयदृष्ट्या अंबरनाथ शहर सक्षम होणार आहे.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Clear the way ambernath municipal hospital four acres land suryoday society municipality amy