सागर नरेकर
उल्हासनगर: सोमवारी उल्हासनगर महापालिका मुख्यालयात कंत्राटदार कंपनीशी संबंधित दोघांनी लेखा विभागातील लिपिकाला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला होता. मात्र मंगळवारी लेखा विभागातील सीसीटीव्ही चित्रण समोर आल्यानंतर या प्रकाराला वेगळे वळण लागले आहे. सोमवारी झालेल्या वादात सर्वप्रथम लिपिक संदीप बिडलान यांनीच कंत्राटदार कंपनीशी संबंधित व्यक्तींवर सर्वप्रथम हात उचलल्याचे दिसून येते आहे. त्यामुळे पालिकेचा लिपिक या प्रकरणाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न करत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
उल्हासनगर महापालिकेच्या लेखा विभागातील आवज जावक सांभाळणाऱ्या संदीप बिडलान या लिपिकाला सोमवारी संजय चांदवानी आणि अजय चांदवानी या दोघांनी मारहाण केली. केलेल्या कामाचे बिल मिळवण्यासाठी सादर केलेली कागदपत्रांची फाईल लेखा विभागाकडे पडून असण्याबाबत जाब विचारण्यासाठी हे दोघे गेले होते. त्यावेळी शाब्दीक चकमकीचे हाणामारीत रूपांतर झाले. याप्रकरणी शासकीय कामत अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकीकडे या प्रकरणानंतर पालिकेच्या कंत्राटदारांवर अधिकारी आणि कर्मचारी वर्गातून संताप व्यक्त होत असतानाच दुसरीकडे या प्रकाराशी संबंधित धक्कादायक बाब समोर आली आहे. उल्हासनगर महापालिका मुख्यालयात दुसऱ्या मजल्यावर असलेल्या लेखा विभागात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात सोमवारी झालेला प्रकार कैद झाला. याचे चित्रण समोर आल्यानंतर या वादात सर्वप्रथम लिपिक संदीप बिडलान यांनीच कंत्राटदारांच्या दोघांवर हात उचलल्याचे दिसून येते आहे. कंत्राटदाराशी संबंधित संजय चांदवानी आणि अजय चांदवानी संदीप बिडलान यांच्याशी कार्यालयातील रस्त्यात बोलत असताना संदीप बिडलान अचानक लाल रंगाचे कपडे घातलेल्या व्यक्तीच्या अंगावर हात उघडताना दिसत आहेत. संदीप बीडलान यांनी पहिल्यांदा हात उचलल्याने संतापलेले संजय चांदवानी आणि अजय चांदवानी दोघे संदीप बिडलान यांना मारहाण करण्यासाठी झटापट करत असल्याचे दिसून येते आहे. त्यामुळे या प्रकाराला संदीप बिडलान यांनीच मारहाणीला सुरुवात केली असे या सीसीटीव्ही चित्रणात दिसून येते आहे. यानंतर चांदवानी बंधूंवर शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र सीसीटीव्ही चित्रण पाहता चांदवानी बंधूवरच सर्वप्रथम पालिकेच्या दीपिकाने हात उचलल्याचे दिसत असल्याने या प्रकरणाला वेगळे वळण मिळते आहे. याबाबत पालिकेच्या वरिष्ठ अधिकार्यांशी संपर्क केला असता आता त्यांनी यावर अधिकृतपणे बोलणे टाळले आहे. मात्र जो दोषी असेल त्यावर कारवाई होईल असेही पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
