पोटात होत असलेल्या असह्य वेदनांमुळे एका महिलेने उल्हासनगरच्या मध्यवर्ती रूग्णालयात धाव घेतली. डॉक्टरांनी तपासणी केली असता महिलेच्या पोटात कापडाचा गोळा आढळला. मध्यवर्ती रूग्णालयाच्या डॉक्टरांनी आपले वैद्यकीय कसब लावत महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया केली आणि महिलेच्या पोटातील कापडाचा बोळा बाहेर काढला. सहा महिन्यांपूर्वी प्रसुतीवेळी केलेल्या शस्त्रक्रियेवेळी हा बोळा आत राहिल्याची शक्यता आहे. ही महिला मुळची उत्तर प्रदेशातील असून ती उल्हासनगरात पाहुणी म्हणून आली होती.
डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे रूग्णांना त्रास सहन करावा लागल्याची अनेक उदाहरणे आहेत. असाच काहीसा प्रकार उल्हासनगर शहरात समोर आला आहे. मुळची उत्तर प्रदेशातील फतेपूर येथील नाझरीन खान (२५) या ऑक्टोबर २०२१ मध्ये तिच्या मुळ गावातील एका खासगी रूग्णालयात प्रसुत झाल्या. त्यांच्यावर प्रसुती शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रीयेदरम्यान त्यांचे बाळ दगावले होते. मात्र शस्त्रक्रीयेनंतर अधून मधून नाझरीन पोटात सतत वेदना होत असल्याची सातत्याने तक्रार करत होती. मात्र शस्त्रक्रियेचे हे परिणाम असावे असे समजून या दुखण्याकडे नाझरीन दुर्लक्ष करत होत्या.
काही दिवसांपूर्वी नाझरीन उल्हासनगर येथील तिच्या नातेवाईकांकडे पाहुण्या म्हणून आल्या होत्या. दोन दिवसांपूर्वी नाझरीनच्या पोटात असह्य वेदना होऊ लागल्या होत्या. त्यामुळे त्यांना उल्हासनगरच्या मध्यवर्ती रूग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी तपासणी केली असता त्यांच्या पोटात कापडासारखे काहीतरी दिसून आले. मध्यवर्ती रूग्णालयाचे शल्य चिकित्सक डॉ. सुधाकर शिंदे यांनी तात्काळ शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला. डॉ. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हा शल्य चिकित्सक डॉ. शशिकांत दोड़े, स्त्री रोग तज्ञ डॉ. नंदा सावंत, डॉ. नर्मता कुलकर्णी, डॉ. कासम दलवाई, डॉ. तहसिन फातिमा आणि डॉ. राजेश म्हस्के तसेच मुख्य परिचारिकाच्या चमूने नाझरीन यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया केली.
शस्त्रक्रियेमध्ये कापडाचा बोळा पोटातून बाहेर काढण्यात आला. त्यामुळे नाझरीनला दिलासा मिळाला असून त्यांची प्रकृती व्यवस्थित असल्याची माहिती मध्यवर्ती रूग्णालय प्रशासनाने दिली आहे. यशस्वी शस्त्रक्रियेबद्दल नाझरीनच्या कुटुंबियांनी आणि नागरिकांनी रूग्णालय प्रशासनाचे कौतुक केले आहे. तसेच शस्त्रक्रियेत केलेल्या निष्काळजीपणाबाबत मध्यवर्ती रूग्णालय प्रशासनाने नाझरीनवर शस्त्रक्रीया करणाऱ्या फतेहपुर येथील खासगी रूग्णालयाविरोधात मध्यवर्ती पोलिस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आल्याचे उपजिल्हा शल्य चिकित्सक डॉ. शशिकांत दोडे यांनी सांगितले आहे.