ठाणे : शहरातील बहुचर्चित समूह विकास योजनेचा (क्लस्टर) शुभारंभ येत्या सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून कागदावर असलेल्या या योजनेच्या अंमलबजावणीला अखेर सुरुवात होणार असून अधिकृत आणि मालकी हक्काच्या घरात राहण्याचे नागरिकांचे स्वप्न लवकरच साकार होणार आहे. ठाणे शहरात मोडकळीस आलेल्या धोकादायक अनधिकृत व अधिकृत इमारतींचा सुनियोजित तसेच संपूर्ण नागरी पायाभूत सुविधांसह पुनर्विकास करण्यासाठी क्लस्टर योजना राबविण्यात येणार आहे. एकूण ४५ नागरी पुनरुत्थान आराखडे तयार करण्यात आले असून त्याचे एकूण क्षेत्रफळ १५०० हेक्टर इतके आहे. अनधिकृत व अधिकृत धोकादायक इमारतीचा सामूहिक पुनर्विकास करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांच्या संकल्पनेतून नियमावली तयार करण्यात आली. या ४५ आराखडय़ांपैकी अत्यंत दाटीवाटीचे क्षेत्र असलेल्या किसननगर नागरी पुनरुत्थान आराखडा क्रमांक १२ मधील नागरी पुनरुत्थान योजना क्रमांक १ आणि २ ची अंमलबजावणी सिडको या शासनाच्या कंपनीमार्फत होणार आहे. येथील अंतिम भूखंड क्रमांक १८६/ १८७ या वरील ७७५३ चौ.मी. क्षेत्रफळावरील भूखंडावर आणि त्याचप्रमाणे रस्ता क्रमांक २२ लगतचा भूखंड क्रमांक एफ - ३ या ठिकाणी १९२७५ चौ.मी. जागेवर योजनेच्या कामाला सुरुवात होणार असून त्याचे उदघाटन मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. त्याचप्रमाणे समूह विकास योजनेचे कामकाज सांभाळण्यासाठी कशिश पार्क येथे क्लस्टर पुनर्विकासचे कार्यालय निर्माण करण्यात आले असून त्याचेही उद्घाटन यावेळी होणार आहे. यानिमित्ताने देशातीलच नव्हे तर आशिया खंडातील सर्वात मोठय़ा, महत्त्वाकांक्षी व ऐतिहासिक समुह विकास योजना (क्लस्टर) मूर्तरूप घेत असल्याचा दावा पालिकेने केला आहे. योजनेतील सुविधा.. अनधिकृत इमारतीसह वसाहतीच्या टाऊनशिप धर्तीवर एकत्रित पुनर्विकासाचा प्रकल्पमोडकळीस आलेल्या घरातून थेट सुरक्षित व सुनियोजित संकुलामध्ये घरपात्र निवासी लाभधारकास विनामूल्य ३२३ चौ. फूट मालकी हक्काचे घरप्रत्येक सेक्टरमध्ये सण, उत्सव, धार्मिक कार्यक्रम सामाजिक उपक्रमांसाठी विशेष जागाप्रत्येक सेक्टरमध्ये वाचनालय, व्यायामशाळा, आरोग्य केंद्र आणि कम्युनिटी सेंटरची व्यवस्थापाळणाघरासह महिला सक्षमीकरण केंद्र आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्रअरुंद रस्ते आणि गजबजलेल्या गल्लीऐवजी प्रशस्त व दर्जेदार रस्ते आणि वाहतूक सुविधापाणीपुरवठा, मल व जलनिस्सारण, घनकचरा व्यवस्थापनासह पायाभूत सुविधापुनर्विकसित टाऊनशिप आराखडय़ामध्ये सुसज्ज आरोग्य, शैक्षणिक, क्रीडा, मनोरंजन, उद्यान पार्किंग, मंडई आदी नागरी सुविधांचा समावेश