ठाणे : ठाणे शहरातील समूह पुनर्विकास (क्लस्टर) आणि झोपडपट्टी पुनर्विकास (झोपु) योजनांच्या अंमलबजावणीच्या आडून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील संघर्ष समोर येऊ लागला आहे. झोपु योजना लागू करण्यात आलेल्या लोकमान्य नगर येथील पाडा क्रमांक चार परिसरात शिवसेनेचे नगरसेवक दिलीप बारटक्के यांनी क्लस्टर योजना राबवण्याविषयी पत्रकबाजी सुरू केली. त्यामुळे झोपु प्राधिकरणाच्या वतीने या ठिकाणी अशा प्रकारच्या प्रचाराला बळी न पडण्याचे आवाहन करणारे फलक लावण्यात आले आहेत.
वरकरणी हा वाद स्थानिक स्वरूपाचा वाटत असला तरी, पुनर्विकासाच्या निमित्ताने या ठिकाणी आपले वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे.
ठाण्यातील झोपडपट्टी, चाळी तसेच धोकादायक इमारतींचा एकत्रित पुनर्विकास करण्यासाठी क्लस्टर योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेसाठी पालिकेने ४४ नागरी पुनरुथ्थान आराखडे तयार केले आहेत. या योजनेसाठी पालिकेकडून विविध भागांत सर्वेक्षणाचे कामही सुरू करण्यात आले आहे. काही ठिकाणी यापूर्वीच झोपू योजना मंजूर झाली आहे. त्या ठिकाणी देखील क्लस्टर योजनेचा आग्रह काहीजणांकडून धरला जात आहे. यातूनच शहरातील वेगवेगळय़ा भागांमध्ये क्लस्टर विरुद्ध झोपू योजनेचा सामना रंगल्याचे चित्र आहे. कोपरी भागात काही दिवसांपूर्वी असाच वाद झाला होता. त्यापाठोपाठ लोकमान्यनगर येथे याच मुद्दयावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीत संघर्ष सुरू झाल्याचे चित्र आहे.
लोकमान्यनगर पाडा क्रमांक ४ मधील झोपू योजना राबविण्यासाठी नागरिकांनी मेसर्स शिव औदुंबर एस.आर.ए सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन केली आहे. या संस्थेने झोपू योजनेसाठी मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडे २५ सप्टेंबर २०२१ मध्ये प्रस्ताव दिला होता. त्यास या विभागाने मान्यता देऊन तेथील झोपडपट्टीधारकांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण आणि पात्रता निश्चिती करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. असे असतानाही शिवसेनेचे माजी नगरसेवक दिलीप बारटक्के आणि शाखाप्रमुख प्रदीप खाडे यांनी या ठिकाणी क्लस्टर योजना राबविण्यात येणार असल्यासंबंधीची पत्रके वाटण्यास सुरुवात केली. यातून या वादाला सुरुवात झाली. बारटक्के यांच्या पत्रकबाजीमुळे येथील नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. या संदर्भात संबंधित गृहनिर्माण संस्थेने झोपू प्राधिकरणाला पत्र पाठविले होते. त्यावर कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता झोपू योजना राबविण्यासाठी सोसायटीला सहकार्य करण्यासंबंधीचे पत्र झोपू प्राधिकरणाने संस्थेला दिले. या पत्राचे फलक नागरिकांनी परिसरात लावलेआहेत.
लोकमान्यनगर पाडा क्रमांक ४ मधील सव्‍‌र्हे क्रमांक ४०७, २ (पै) या ६७५३.७६ चौ.मी क्षेत्रफळाच्या भूखंडावर झोपू योजना राबविण्यात येणार आहे. हा परिसर झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे, अशी माहिती झोपू प्राधिकरणाने दिली.
प्राधिकरणाचे आवाहन
‘लोकमान्यनगर पाडा क्रमांक ४ मधील परिसर झोपडपट्टी प्राधिकरण क्षेत्र म्हणून यापूर्वीच घोषित करण्यात आला आहे. झोपडपट्टीधारकांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण आणि पात्रता निश्चिती करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या ठिकाणी झोपू योजना राबविली जाणार आहे. त्यामुळे कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता झोपू योजना राबविण्यासाठी सोसायटीला सहकार्य करावे’, असे आवाहन ठाणे झोपु प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता राजकुमार पवार यांनी केले असून त्या पत्राचे फलक परिसरात लावण्यात आले आहेत.
लोकमान्यनगर भागात झोपू योजना राबविण्यात येत असली तरी तेथील बहुसंख्य नागरिकांना क्लस्टर योजना हवी आहे. त्याबाबत तेथील नागरिकांनी आमच्याशी संपर्क साधल्यानंतर आम्ही तिथे क्लस्टर योजना राबविण्याची प्रक्रिया सुरू केली. या योजनेमुळे संपूर्ण परिसरात चांगल्या पायाभूत सुविधा निर्माण होणार आहेत. कुणी राजकारण करत असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. आम्हाला या भागाचा विकास करायचा आहे. -दिलीप बारटक्के, माजी नगरसेवक, शिवसेना