ठाणे : कोकण पदवीधर निवडणूक प्रचाराकरिता गेल्या आठवड्यात महायुतीने आयोजित केलेल्या मेळाव्यात माजी मंत्री गणेश नाईक यांनी केलेल्या एका विधानाची चर्चा शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असले तरीही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच आमचे नेते आहेत, असे विधान गणेश नाईक यांनी केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या असून या विधानामुळे मुख्यमंत्री आणि गणेश नाईक वाद मिटता मिटेना, असे चित्र आहे.

ठाणे लोकसभेची जागा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हट्टाने पदरात पाडून घेत गणेश नाईक यांना शह दिल्याची चर्चा होती. ठाणे जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावर गणेश नाईक यांनी अनेक वर्षे काम केले. या पदावर काम करत असताना नाईक यांनी जिल्ह्यावर वर्चस्व प्रस्थापित केले होते. परंतु सत्ता बदल होताच नाईक या पदावरून पायउतार झाले आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पालकमंत्री झाले. यानंतर शिंदे यांनी जिल्ह्यात वर्चस्व निर्माण केले. तेव्हापासून या दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय वाद रंगला आहे.

हेही वाचा – कल्याणमधील तरुणीची लग्नाचे आमिष दाखवून ठाण्यातील तरुणाकडून ६० लाखाची फसवणूक

नवी मुंबई महापालिकेत गणेश नाईक यांचे वर्चस्व आहे. नगरविकास विभागामार्फत या पालिकेतील प्रशासकीय नियुक्त्यावरून नाईक यांनी नाराजी व्यक्त केली होती. नवीमुंबईचे कारभारी ठरविणारे कोण, असे विधान करत मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीत असलेल्या नगरविकास विभागावर ताशेरे ओढले होते. तसेच या दोन्ही नेत्यांमधील वाद ठाणे लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने पुन्हा दिसून आला. गणेश नाईक यांचे पुत्र, माजी खासदार संजीव नाईक हे भाजपच्या तिकिटावर ठाणे लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक होते. या जागेसाठी नाईक यांचे प्रयत्न सुरू होते. पण, शेवटच्या क्षणी मुख्यमंत्र्यांनी ही जागा पदरात पाडून घेत नरेश म्हस्के यांची उमेदवारी जाहीर केली. त्यावेळेस नाईक कुटुंबियांसह त्यांच्या समर्थकांनी नाराजी व्यक्त केली होती. लोकसभा निवडणुकीनंतर हा वाद शमेल, अशी शक्यता वर्तवली जात होती. पण, वाद मिटता मिटत नसल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे.

हेही वाचा – अन्यथा राजन विचारे, विनायक राऊत पराभूत होण्याचे कारण नव्हते, नाना पटोलेंचा शिंदे सरकारवर आरोप

कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपने निरंजन डावखरे यांना उमेदवारी दिली आहे. डावखरे यांच्या प्रचारासाठी गेल्या आठवड्यात ठाण्यामध्ये महायुतीचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यासाठी नवी मुंबईतून ठाण्यात आलेले गणेश नाईक यांनी एक विधान केले होते. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असले तरीही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच आमचे नेते आहेत, असे विधान गणेश नाईक यांनी केले होते. त्याचीच चर्चा गेल्या आठ दिवसांपासून महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या चवीने चर्चिली जात आहे.