ठाणे : भाजपमधील नाराजीचे पडसाद वेगवेगळ्या भागात उमटू लागताच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी सायंकाळी ठाण्यात ठाण मांडत ठाणे लोकसभेतील सहाही विधानसभा क्षेत्रातील प्रमुख नेते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेत मोर्चेबांधणी सुरू केली.

टेंभीनाका येथील आनंद आश्रमात तब्बल सहा तास मुख्यमंत्री ठिय्या घेऊन होते. रात्री उशीरापर्यंत चाललेल्या या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी निवडणूक तयारीचा आढावा घेतला. शिवाय, वेगवेगळ्या विधानसभेत कोणती रणनीती आखायची याबद्दल सुचना दिल्या. ठाणे, भिवंडीतील महायुतीच्या उमेदवारीचे अर्ज शुक्रवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत दाखल करण्यात आले. ठाण्याचे उमेदवार नरेश म्हस्के यांचा अर्ज दाखल केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पक्षाच्या नेत्यांकडून परिस्थितीचा आढावा घेतला. यानंतर टेंभीनाका येथील आनंद आश्रमात त्यांनी सहाही विधानसभा क्षेत्रातील प्रमुख पदाधिकाऱ्यांना आणि नेत्यांना तातडीने हजर राहण्याच्या सूचना केल्या. नरेश म्हस्के यांची उमेदवारी जाहीर होताच, या मतदारसंघातील भाजपमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटण्यास सुरूवात झाली आहे.

हेही वाचा – कल्याण लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे रमेश जाधव यांचा उमेदवारी अर्ज

नवी मुंबईतील भाजप नेते गणेश नाईक यांच्या समर्थकांनी आक्रमक भूमिका घेत गुरुवारी आपल्या पदाचे राजिनामे सादर केले. काहीही झाले तरी नरेश म्हस्के यांचे काम करायचे नाही अशी भूमिका घेत या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांवर टीकेचे प्रहार केले. नवी मुंबईतील महायुतीतील हा बेबनाव उघडपणे पुढे आला असताना ठाणे आणि मिरा भाईंदर या शहरांमध्येही या घटनेचे पडसाद उमटले. मिरा भाईंदरमधील नाईक समर्थकांनी आपल्या पदाचे राजिनामे देत असताना ठाण्यातील भाजप आमदार संजय केळकर यांनी आमचा आत्मसन्मान राखला गेला पाहिजे अशी भूमिका घेत भाजप कार्यकर्त्यांमधील नाराजीला बळ दिले. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी नरेश म्हस्के यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी भाजपचे सर्व नेते उपस्थित झाले खरे मात्र कार्यकर्त्यांमधील नाराजी दूर करण्यात यश आल्याचा दावा यापैकी कोणीही करू शकले नाही.

नवी मुंबईचे नेते गणेश नाईक हे कुटुंबियासह अर्ज दाखल करण्यासाठी आले. मात्र त्यांचे नवी मुंबईतील पदाधिकारी फिरकलेच नाही. भाजपमधील या नाराजीच्या या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शुक्रवारी दुपारपासूनच ठाण्यात ठाण मांडून दिसल्याचे पाहायला मिळाले.

हेही वाचा – गणेश नाईक यांची ठाणे लोकसभेच्या उमेदवारीवरून प्रतिक्रिया, मुख्यमंत्र्यांना भेटलो, हस्तांदोलन झाले आणि…

आक्रमकपणे कामाला लागा

काँग्रेस नेते संजय निरूपम यांचा पक्ष प्रवेश होताच, मुख्यमंत्र्यांनी ठाणे लोकसभेतील पदाधिकारी आणि नेत्यांची झाडाझडती घेण्यास सुरुवात केली. बेलापूर, ऐरोली, कोपरी पाचपाखाडी, ठाणे शहर, ओवळा माजिवडा, मिरा भाईंदर या सहा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांकडून त्यांनी निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला. संघटनात्मक पातळीवर आपण आक्रमपणे तयारीला लागले पाहिजे असे आदेश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

कोणत्याही परिस्थितीत संघटनेत मरगळ येऊ देऊ नका आणि कामाला लागा अशा सूचना त्यांनी दिल्या. सहा तासांहून अधिक तास मुख्यमंत्री आनंद आश्रमात ठाण मांडून होते. नवी मुंबईतील भाजपच्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर येथील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधत मित्र पक्षासोबत जूळवून घ्या असा संदेशही त्यांनी दिला.