|| किशोर कोकणे

वादामुळे वरिष्ठ निरीक्षकांची पदे रिक्त

ठाणे : ठाणे पोलीस दलात दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या विसंवादाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सतत जोर धरू लागली असून आयुक्तालयातील महत्त्वाच्या बदल्या, नियुक्त्यांचे गाडे यामुळे रुतल्याने येथील पोलीस दलातील अस्वस्थता टोक गाठू लागली आहे.

वाहतूक शाखेतील साहाय्यक आयुक्तपद, याच विभागातील काही निरीक्षक पदे, गुन्हे अन्वेषण विभागातील नियुक्त्या तसेच काही मोक्याच्या  समजल्या जाणाऱ्या पोलीस ठाण्यांमधील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची पदे गेल्या काही महिन्यांपासून याच वादातून रिक्त असल्याचे समजते. विशेष म्हणजे, राज्य सरकारने नुकत्याच बदल्या केलेले काही अधिकारी नवी जबाबदारी मिळेल या आशेवर नियंत्रण कक्षात अक्षरश: दिवस ढकलत असून ठाण्यातील राजकीय व्यवस्थाही या गोंधळात बघ्याची भूमिका घेत असल्याने पोलीस अधिकारी हवालदिल झाले आहेत.

ठाण्याचे पोलीस आयुक्त जयजीत सिंग आणि सह पोलीस आयुक्त डॉ. सुरेश मेकला यांच्यात गेल्या काही दिवसांपासून विस्तवही जात नसल्याने अगदी उघडपणे बोलले जात आहे. या दोन्ही अधिकाऱ्यांशी लोकसत्ता प्रतिनिधीने संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही त्यांच्याकडून ठोस उत्तर मिळाले नाही. ठाणे पोलीस दलात अनेक महत्त्वाची पदे रिक्त असताना ती का भरली जात नाहीत असा सवाल सहआयुक्त सुरेश मेकला यांना विचारला असता मे सीपी हू क्या…तुम उमको पुछो असे उत्तर त्यांनी दिले. आयुक्त जयजीत सिंग यांनी तर प्रस्तुत प्रतिनिधीचा फोन दिवसभर उचलला नाही.  माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या वादग्रस्त आरोपानंतर गृह विभागाने जोरदार बदलीसत्र सुरू केले त्यामध्ये ठाणे पोलीस आयुक्तालयातील अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यामुळे  गुन्हे अन्वेषण शाखा, वाहतूक पोलीस आणि स्थानिक पोलीस ठाण्यांतील विविध जागा रिक्त झाल्या आहेत. मुंबई तसेच आसपासच्या पोलीस दलातून बदली होऊन आलेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची या ठिकाणी नेमणूक होणे अपेक्षित होते. मात्र, पोलीस आयुक्त जयजीत सिंग आणि सहआयुक्त डॉ. सुरेश मेकला यांच्या शीतयुद्धामुळे  या बदल्या रखडल्या आहेत, अशी चर्चा आहे. गेल्या काही दिवसांत शहरात खून, खुनाचा प्रयत्न, सोनसाखळ्या चोरी, वाहन चोरीचे प्रमाण वाढले आहे. वाहतूक नियंत्रण कक्षातही साहाय्यक पोलीस आयुक्त आणि पोलीस निरीक्षकांच्या जागा रिक्त आहेत. अपुऱ्या मनुष्यबळामुळे वाहतूक नियंत्रण करणेही कठीण जात आहे. रिक्त पदांवर अधिकाऱ्यांच्या बदल्या होत नसल्याने पोलीस दलातही नाराजी आहे. मनुष्यबळ कमी असल्याने गुन्हेगारी रोखायची कशी अशी चर्चा दबक्या आवाजात पोलीस अधिकारी करत आहेत.