scorecardresearch

ठाणे जिल्ह्यातील संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी यंत्रणांनी १५ दिवसात आराखडा सादर करावा, जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

वाहतूक नियोजनाचा आराखडा प्राप्त झाल्यानंतर एप्रिलमध्ये टास्क फोर्सची पुन्हा एकदा बैठक घेतली जाईल

रस्ते, महामार्ग, उड्डाणपूल यांच्या दुरुस्तीचे काम आणि नवीन प्रकल्पांच्या कामांमुळे दरवर्षी पावसाळ्यात महत्वाच्या रस्त्यांवर वाहतूक कोंडी होते. यातून मार्ग काढण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्यावर्षी सर्व यंत्रणांची बैठक घेऊन जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स नियुक्त केला होता. त्याची आज पहिली बैठक जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दुरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून घेतली. यावेळी सर्व महापालिका आयुक्त, वाहतूक पोलीस उपायुक्त, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.

जिल्ह्यामध्ये पावसाळ्यात होणारी संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी जिल्ह्यातील यंत्रणांनी १५ दिवसात वाहतूक नियोजन आराखडा सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा रस्ते दुरुस्तीसाठीच्या टास्कफोर्सचे अध्यक्ष श्री. नार्वेकर यांनी येथे दिले.

दरवर्षी पावसाळ्यात विविध पायाभूत सुविधांच्या कामांमुळे वाहतूक कोंडी होते. ती टाळण्यासाठी नियोजन करण्याच्या दृष्टिकोनातून सर्व यंत्रणांकडून पावसाळापूर्व पूर्ण होणारी कामे आणि त्यांची कालमर्यादा तसेच पावसाळापूर्व पूर्ण न होऊ शकणारी मोठी कामे यामुळे संभाव्य वाहतूक कोंडीवर उपाययोजना व पर्यायी मार्गांचे नियोजन याचा आढावा या बैठकीत घेण्यात आला.

वाहतूक नियोजनाचा आराखडा प्राप्त झाल्यानंतर एप्रिलमध्ये टास्क फोर्सची पुन्हा एकदा बैठक घेतली जाईल. विविध यंत्रणांच्या समन्वयातून वाहतूक शाखेची बैठक घेऊन संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नियोजन केले जाईल, या नियोजनाचा आराखडा पालकमंत्री यांना सादर केला जाईल, असे श्री. नार्वेकर यांनी सांगितले.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Collector orders to present plan to solve traffic problem in thane district sgy

ताज्या बातम्या