दर्जेदार सांस्कृतिक उपक्रमांना प्रोत्साहन हवे!

महाविद्यालयाची ओळख तेथील शैक्षणिक उपक्रमांमुळे होत असली तरी महाविद्यालयातील सांस्कृतिक वातावरणालासुद्धा खूप मोठे महत्त्व आहे.

महाविद्यालयाची ओळख तेथील शैक्षणिक उपक्रमांमुळे होत असली तरी महाविद्यालयातील सांस्कृतिक वातावरणालासुद्धा खूप मोठे महत्त्व आहे. कलाक्षेत्रामध्ये कारकीर्द घडवण्याच्या उद्देशाने महाविद्यालयात tv02प्रवेश घेणारे अनेक विद्यार्थी अशा सांस्कृतिक वातावरणाकडे पाहूनच प्रवेश घेत असतात. त्यांच्या अपेक्षा, ध्येय यांची महाविद्यालयीन जीवनात पूर्ती होते का? त्यांच्या जडणघडणीत महाविद्यालयांचे योगदान किती? महाविद्यालयातील सांस्कृतिक कार्यक्रम खरोखरच किती उपयुक्त आहेत? अशा प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी ‘लोकसत्ता ठाणे’च्यावतीने ‘कट्टयावरची गोलमेज’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. ठाणे, कल्याण, डोंबिवलीतील काही महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेऊन यासंदर्भात विद्यार्थ्यांची प्रातिनिधिक भूमिका आणि अपेक्षा मांडल्या.

कलागुणांबरोबर व्यक्तिमत्त्व घडवणारा महोत्सव
महाविद्यालयातील महोत्सवांमध्ये नृत्य, गायन, अभिनय अशा स्पर्धामधून विद्यार्थ्यांचा प्रचंड उत्साह दिसून येतो. बांदोडकर महाविद्यालयात साजरा होणारा आकांक्षा महोत्सवसुद्धा त्याला अपवाद नाही. दर वर्षी बांदोडकर महाविद्यालयात हा आकांक्षा महोत्सव विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडतो. नृत्य, गायन, अभिनय, क्रीडा स्पर्धातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव तर मिळतोच शिवाय त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडणही होते. गेल्या वर्षांपासून या महोत्सवाचे वेगळेपण ठरले ते महाविद्यालयात होणारा रक्षाबंधनाचा दिवस. या वेळी वृक्षतोड थांबण्यासाठी, वृक्षलागवडीची जागरूकता निर्माण होण्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थिनींनी महाविद्यालयाच्या परिसरात असणाऱ्या सगळ्या झाडांना राखी बांधून आगळ्या वेगळ्या पद्धतीने रक्षाबंधन साजरा केला.  व्यक्तिमत्त्व विकासासाठी उपयोग होईल अशा स्पर्धाची रेलचेल महाविद्यालयात असते.
सांस्कृतिक महोत्सव म्हटले की, महोत्सवाची तयारी आणि त्यासाठी लागणारा वेळ यासाठी महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांना योग्यरीत्या सहकार्य केले जाते. विद्यार्थीसुद्धा तितक्याच उत्साहाने, ‘आपला महोत्सव’ ही भावना मनात ठेवून महोत्सव यशस्वी होण्यासाठी प्रयत्नशील असतात. महोत्सव आयोजित करण्यासाठी आर्थिक पाठबळाची गरज असते. जितके आर्थिक सहकार्य लाभेल तितका महोत्सव भव्य दिव्य आणि यशस्वी होऊ  शकतो. महाविद्यालयाकडून अशा पाठबळाची आवश्यकता आहेत. महोत्सवाचे आयोजन विद्यार्थ्यांकडून होत असते त्यामुळे एकजुटीने कामाची पूर्तता होते, तसेच व्यवस्थापनकौशल्य वाढीस लागते.   
*तृप्ती शिर्के बांदोडकर महाविद्यालय, ठाणे

अभियांत्रिकी महाविद्यालयात सांस्कृतिक वातावरण गरजेचे
अभियांत्रिकी महाविद्यालय म्हटले की, विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त कल अभ्यासाकडे दिसून येतो. परंतु विद्या प्रसारक मंडळाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘पोलीस्पार्क’ या सांस्कृतिक महोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थी आपले कलागुण जोपासत असतात. इतर महाविद्यालयांत होणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या ‘डे’ज प्रमाणे या महाविद्यालयात पोलीस्पार्कच्या माध्यमातून हे डेज साजरे केले जातात. पिंक डे, चॉकलेट डे असे डेज साजरे करताना महोत्सवाच्या वेळी एक सांस्कृतिक वातावरण इथे पाहायला मिळते. ग्रीन डे साजरा करताना विद्यार्थी महाविद्यालयाच्या परिसरात वृक्ष लागवड करतात. महाविद्यालयाचे दर वर्षी ‘इनोविजन’ हे नियतकालिक प्रसिद्ध होते ज्यात तंत्रज्ञानासंबंधित लेखांचा समावेश असतो. परंतु अंतर्गत महोत्सवांमध्ये, स्पर्धामध्ये विद्यार्थी सहभागी होत असले तरी इतर महाविद्यालयाप्रमाणे आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा आमच्यापर्यंत पोहचत नाहीत. त्यामुळे आमच्या कला-गुणांचा विकास हा मर्यादित राहतो अशी खंत असते. तर कधी कधी प्रचंड अभ्यासामुळे इच्छा असूनही अशा स्पर्धामध्ये वेळेअभावी सहभागी होता येत नाही. महाविद्यालयामध्ये कार्यक्रम होत असले तरी त्याचे स्वरूप तंत्रज्ञानाशी निगडित असते त्यामुळे तंत्रज्ञानाविषयी जागरूक असलो तरी कला, साहित्य या क्षेत्रात आम्ही मागे पडतो. त्यामुळे महाविद्यालयाने आम्हाला तसे पोषक वातावरण निर्माण करून दिले तर नक्कीच इतर शाखांमधील विद्यर्थ्यांसारखे आम्हीसुद्धा आमचे कलागुण जोपासू शकतो. सांस्कृतिक कार्यक्रमाविषयी विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता येण्यासाठी महाविद्यलयानेसुद्धा सहकार्य वाढवण्याची गरज आहे. तंत्रज्ञान आणि कला, साहित्य यांचा मेळ असणारे महोत्सव आमच्या महाविद्यालयात व्हावेत.
*प्रतिक वाघ, विद्या प्रसारक मंडळ, अभियांत्रिकी महाविद्यालय, ठाणे

सकारात्मक सांस्कृतिक वातावरण असलेले सीएचएम
ठाण्यापलीकडच्या महाविद्यालयांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रम आणि येथील वातावरणाबद्दल उदासीनता दिसत असली तरी उल्हासनगरचे सीएचएम महाविद्यालय याला पूर्णपणे अपवाद आहे. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी परिपूर्ण सांस्कृतिक वातावरण या महाविद्यालयात भरभरून आहे. कारण आजवर आम्ही अनेक स्पर्धामध्ये भाग घेतला आहे. यासाठीचा सगळ्या प्रकाराचा पाठिंबा महाविद्यालयाच्यावतीने दिला जात आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना कोणात्याही प्रकारची तडजोड करावी लागत नाही. स्पर्धा म्हटले की हरणे-जिंकणे हे आलेच परंतु कोणत्याही अपेक्षेविना केवळ आत्मविश्वासाच्या जोरावर सर्व शिक्षक मोठय़ा उत्साहात आम्हाला भाग घेण्याची परवागी देतात. शिक्षकांच्या याच विश्वासामुळे आजवर आम्ही अनेक स्पर्धामध्ये विजयी झालो आहोत. यापुढे व्यवस्थापन अशाच प्रकारचे सहकार्य करेल, अशी खात्री आहे. महाविद्यालयीन ‘चांदीत्सव’ आणि आंतरमहाविद्यालयीन ‘इंद्रधनुष्य’ हा महोत्सव सगळ्यात लोकप्रिय आहे. तसेच महोत्सवाचे संपूर्ण व्यवस्थापन विद्यार्थी करतात. त्यासाठी लागणरी सर्व मदत शिक्षक करतात. आजवर आम्ही अनेक स्पर्धामध्ये भाग घेतला, त्यासाठी काही वेळा वर्गामध्ये बसणे शक्य होत नाही. परंतु महाविद्यालयाचे त्यासाठीही पूर्ण सहकार्य असते. विद्यार्थ्यांमधील योग्य गुणांना हेरून त्यावर भर देणे महत्त्वाचे मानणाऱ्यांपैकी माझे महाविद्यालय आहे. महाविद्यालयातील विविध उपक्रमांमधून एक योग्य व्यक्तिमत्त्व घडत असते आणि त्याला महाविद्यालय नेहमीच प्रोत्साहन देते.
* श्रीकांत भगत, सीएचएम महाविद्यालय, उल्हासनगर
आंतरमहाविद्यालयीन महोत्सवांबद्दल जागृती हवी
महोत्सवाच्या रुपाने महाविद्यालयीन तरुणाईमध्ये लपलेल्या कलावंताला ओळख मिळू लागली आहे. महोत्सव म्हटलं की, मज्जा, धम्माल आणि स्पर्धा आलीच. पण या पलीकडेही हे महोत्सव त्या त्या महाविद्यालयाची ओळख बनते. जसे आमच्या ज्ञानसाधना महाविद्यालयाचा ‘युथोपिया’ हा महोत्सव महाविद्यालयाची ओळख बनला आहे. परंतु विद्यार्थ्यांनी केवळ आपल्या महाविद्यालयापर्यंत मर्यादित न राहता इतर महाविद्यालयांशी स्पर्धा करायला हवी आहे. यासाठी मुंबई विद्यापीठाचा ‘यूथ फेस्टिव्हल’ हा एक उत्तम पर्याय आहे. परंतु आमच्या महाविद्यालयामध्ये याबाबतीत पुरेशी जागृकताच होत नाही, याची खंत वाटते. यूथ फेस्टिव्हल कधी होतो, कधी संपतो हेच विद्यार्थ्यांपर्यंत पोहचत नाही. यासाठी व्यवस्थापनाकडून प्रयत्न व्हायला हवेत, जेणेकरून आपल्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांना एक मोठे व्यासपीठ मिळू शकेल.
महाविद्यालयाच्या महोत्सवांमुळे तरुणाईला त्यांची कला सादर करण्याची संधी मिळत असते. त्यामुळे हे महोत्सव हळूहळू एक दर्जेदार कलावंत घडत असतो. त्याचबरोबर अशा सांस्कृतिक महोत्सवांमुळे विद्यार्थ्यांमधील आत्मविश्वास आणि नेतृत्व गुणांना अधिक चालना मिळते. महाविद्यालयामधील तरुण कलावंतांची एक वेगळी ओळख तयार होते. इथूनच खऱ्या अर्थाने त्यांच्या कलेला वाव मिळतो व त्याच्या करिअरला सुरुवात होते. ज्ञानसाधना महाविद्यालयातील विद्यार्थी अनेक अंतर महाविद्यालयीन महोत्सवांमध्ये भाग घेतात. बक्षिसे मिळवत महाविद्यालयाचे नाव उंचावतात याचा अभिमान वाटतो. कलावंत छोटय़ा महाविद्यालयाचा असो वा मोठय़ा पण त्या सर्वानाच या महोत्सवांमध्ये समान संधी मिळणे गरजेचे आहे. त्यातूनच एक उच्च व उत्तम दर्जाचा कलावंत घडू शकतो. महाविद्यालयात याच महोत्सवांच्या माध्यमातून मुलांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकाससुद्धा होत असून शिस्त, कार्यक्रमांचे आयोजन आणि व्यवस्थापन याची पुरेपूर माहिती विद्यार्थ्यांना या माध्यमातून मिळू शकते.  महाविद्यालयाचे व्यवस्थापन आणि विद्यार्थी यांच्यातील संवाद  वाढवण्याची गरज आहे.
*उमेश भदाणे, ज्ञानसाधना महाविद्यालय, ठाणे

‘गंधर्व महोत्सव’च जोशी बेडेकरची ओळख
महाविद्यालयाचे सांस्कृतिक कार्यक्रम असो किंवा विद्यापीठाचे युथ फेस्टिवल असो यात जोशी बेडेकरचे विद्यार्थी नेहमीच बाजी मारतात. अभ्यासासोबतच महाविद्यालयाचे सांस्कृतिक वातावरणही तितकेच पोषक आहे. महाविद्यालयात होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे प्रतीक म्हणजे महाविद्यालयात साजरा होणारा ‘नवरंग’ आणि ‘गंधर्व’ हा अंतरमहाविद्यालयीन महोत्सव. महाविद्यालयातर्फे साजरा केला जाणाऱ्या नवरंग महोत्सवाची विद्यार्थी उत्सुकतेने वाट पाहत असतात. टी-शर्ट पेंटिंग, रांगोळी, नृत्य, गायन, मेहंदी, केशभूषा, वृत्तवाचन, वक्तृत्व अशा वेगवेगळ्या स्पर्धाचे आयोजन या महोत्सवात केले जाते. महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी प्राध्यापक आणि विद्यार्थी पारंपरिक पद्धतीने रासगरबा खेळतात. तर वार्षिक पारितोषीक वितरणाने महोत्सवाची सांगता होते.
आंतरमहाविद्यालयीन गंधर्व महोत्सवात दर वर्षी शंभरहून अधिक महाविद्यालये सहभागी होत असतात. यातही शास्त्रीय नृत्य, गायन, समूह नृत्य तसेच काही खेळासंबंधित स्पर्धा भरविल्या जातात. जास्तीत जास्त स्पर्धामध्ये भाग घेऊन विजेत्या होणाऱ्या महाविद्यालयाला जोशी बेडेकर महाविद्यालयाचे गंधर्व महोत्सवाचे फिरते चषक दिले जातात. याशिवाय विद्यापीठाच्या युथ फेस्टिवलमध्येसुद्धा हे महाविद्यालय अग्रेसर ठरते. महाविद्यालयाच्या ‘नाटय़मय’ या अभिनयाच्या संघाने ‘मोसलेम’, ‘पुनर्जन्म’, ‘ओश्तोरीज’ अशा दर्जेदार एकांकिका विविध स्पर्धामध्ये सहभागी करून पारितोषिके मिळवली आहेत. या वर्षीच्या पुरुषोत्तम, आय.एन.टी एकांकिका स्पर्धेत जोशी बेडेकरच्या एकांकिका सर्वोत्कृष्ट ठरल्या. युथ फेस्टिवल अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या रांगोळी स्पर्धेत अश्विनी शर्मा हिने राष्ट्रीय पातळीवर पारितोषिक मिळवले. तर दुबईमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय कत्थक स्पर्धेत पल्लवी लेले हिने सुवर्ण पदक पटकावले आहे. वक्तृत्व स्पर्धा, वादविवाद स्पर्धा अशा स्पर्धामध्ये जोशी बेडेकरचे विद्यार्थी सहभागी होऊन विजेते ठरत असतात. महाविद्यलयाचे मराठी वाङ्मय मंडळ तितकेच समृद्ध आहे. निबंधलेखन, काव्यवाचन अशा स्पर्धाचे आयोजन केले जाते. ‘स्वरसंपदा’ या उपक्रमांतर्गत महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग आपली गायनाची आवड जोपासत असतात. एकंदरीतच अभ्यासासोबतच विद्यार्थ्यांची सांस्कृतिक जडणघडण होण्यासाठी महाविद्यालयाचे प्राध्यापक आणि प्राचार्या डॉ. शकुंतला सिंग नेहमीच सहकार्य करत असतात.
*किन्नरी जाधव, जोशी बेडेकर महाविद्यालय, ठाणे.

बिर्ला म्हणजे सांस्कृतिक कार्यक्रमांची पंढरी
कल्याणमधील लोकप्रिय बिर्ला महाविद्यालयातील सांस्कृतिक कार्यक्रमांच्या वाढत्या संख्येमुळे महाविद्यालय सांस्कृतिक कार्यक्रमांची पंढरी असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. व्यक्तिमत्त्व विकास, नृत्य, गायन, फॅशन अशा विविध विषयांशी निगडित कार्यशाळांचे आयोजन करण्यात महाविद्यालय अग्रेसर आहे. महिन्याभराच्या अवधीत सातत्याने दोन ते तीन कार्यशाळा, शिबिरे आणि व्याख्याने महाविद्यालयातर्फे आयोजित करण्यात येतात. पाली भाषा, चायनीज भाषा विद्यार्थ्यांना अवगत व्हाव्यात या उद्देशाने महाविद्यालयातर्फे अशा कार्यशाळांचे आयोजन करण्यात येते. कार्यशाळांबरोबरच अनेक मराठी चित्रपटांच्या प्रसिद्धी कार्यक्रमांचे आयोजन होत असल्याने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक उपक्रमांशी असलेला ऋणानुबंध अधिक दृढ होऊ लागला आहे.
बिर्ला महाविद्यालयात ‘बिलरेत्सव’ हा आंतरमहाविद्यालयीन महोत्सव होत असून महाविद्यालयाच्या बी.एम्.एम्. शाखेचा ‘दृश्य’ तर विज्ञान शाखेचा ‘प्रवाह’ हा महोत्सव साजरा करण्यात येतो.  महाविद्यालयातील विविध विभागांच्या स्पर्धात्मकतेमुळे बिलरेत्सव अधिकच दर्जेदार बनला आहे. बिर्लोत्सवामध्ये अंतरमहाविद्यालयीन स्वरूपाचा असला तरी मुंबई आणि इतर भागांतील महाविद्यालयांचा या भागात येण्याचा दृष्टिकोन नसल्याने ठाणे जिल्ह्य़ातील महाविद्यालयांचा मोठा प्रतिसाद याला लाभतो. शैक्षणिकदृष्टय़ा बिर्लासारखे दुसरे महाविद्यालय सापडणार नाही. तसेच महाविद्याच्या सांस्कृतिक मंडळाद्वारे सांस्कृतिक उपक्रम राबवण्याचा महाविद्यालयाचा प्रयत्नही कौतुकास्पद आहे. विद्यार्थी वर्ग महोत्सवांमध्ये सहभागी होताना सेट लावण्यापासून, अभिनय, रंगमंचावरील सर्व कामे उत्साहाने करतात, त्यामुळे नेतृत्व आणि व्यक्तिमत्त्व घडवणारा हा एक उत्तम मार्ग आहे. महाविद्यालयातील प्रा. नितीन बर्वे, शीतल चित्रे हे सांस्कृतिक वातावरण अधिक दृढ करण्यासाठी झटत आहेत.
*स्वप्निल आजगांवकर, भावेश कुंटला बिर्ला महाविद्यालय, कल्याण

‘सुटीतील गोलमेज’मध्ये विद्यार्थ्यांनी मांडलेल्या भूमिकांपलीकडे काही अपेक्षा, मते मांडावयाची असल्यास आम्हाला जरूर कळवा. अशा प्रतिक्रियांना पुढच्या गुरुवारच्या ‘कट्टय़ावरची गोलमेज’मध्ये स्वतंत्र प्रसिद्धी दिली जाईल. आपली मते आम्हाला  ई-मेलवर नक्की कळवा.
newsthane@gmail.com

संकलन
शलाका सरफरे, समीर पाटणकर

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ठाणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: College students round table discussion on several issues

Next Story
सरस्वतीच्या साधनेने ‘लक्ष्मी’ प्रसन्न
ताज्या बातम्या