काही महाविद्यालयांमध्ये अद्यापही संभ्रम

ठाणे : शाळांपाठोपाठ महाविद्यालये २० ऑक्टोबरपासून सुरू करण्यास परवानगी देण्यात आली असून त्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्ह्यातील महाविद्यालयांनी पूर्वतयारी सुरू केली आहे. महाविद्यालयांच्या व्यवस्थापकांनी गूगल फॉर्म तयार केले असून त्या माध्यमातून किती विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे तसेच किती विद्यार्थी महाविद्यालयात येण्यास तयार आहेत, अशी माहिती संकलित करण्यात येत आहे, असे जिल्ह्यातील महाविद्यालये व्यवस्थापकांकडून सांगण्यात आले. 

महाविद्यालयात शिक्षण घेत असलेले बहुतांश विद्यार्थी हे १८ वयोगटापुढील असून ज्या विद्यार्थ्यांच्या दोन मात्रा पूर्ण झाल्या आहेत. त्या विद्यार्थ्यांनाच महाविद्यालयात प्रवेश देण्यात येईल, असे राज्य सरकारच्या नियमावलीत नमूद करण्यात आले आहे. जिल्ह्यातील काही महाविद्यालय व्यवस्थापकांनी गूगल फॉर्म तयार केला असून त्यामार्फत विद्यार्थ्यांच्या लसीकरणाची माहिती तसेच विद्यार्थी महाविद्यालयात येण्यास तयार आहेत का, अशी सविस्तर माहिती संकलित करण्यास सुरुवात केली आहे. तसेच चौदावीच्या विद्यार्थ्यांची सध्या ऑनलाइन परीक्षा सुरू असल्यामुळे या विद्यार्थ्यांना परीक्षा संपेपर्यंत सध्या तरी महाविद्यालयात बोलविण्यात येणार नसल्याचे काही महाविद्यालयांनी ठरविले आहे.

ठाण्यातील जोशी-बेडेकर महाविद्यालयानेही गूगल फॉर्म तयार केला आहे. त्यामध्ये किती विद्यार्थी महाविद्यालयात येण्यास तयार आहेत अशा विद्यार्थ्यांची वर्गनिहाय यादी तयार करण्यात येणार आहे. त्यानुसार ५० टक्के उपस्थितीत एक दिवस आड एक वर्ग भरविण्यात येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांची लसीकरण झाले नाही, त्यांसाठी महापालिकेच्या सहकार्याने लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुचित्रा नाईक यांनी दिली.

ठाण्याच्या ज्ञानसाधना महाविद्यालयानेही गूगल फॉर्म तयार केला असून त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या लसीकरणाची माहिती संकलित केली आहे. गूगल फॉर्मच्या सव्रेक्षणात या महाविद्यालयातील अंदाजे ३० टक्के विद्यार्थ्यांच्या दोन्ही मात्रा पूर्ण झाल्या आहेत. तर ३५ टक्के विद्यार्थ्यांची पहिली मात्रा पूर्ण झाली आहे. या विद्यार्थ्यांची दुसरी मात्रा आणि उर्वरित विद्यार्थ्यांचे लसीकरण महापालिकेच्या साहाय्याने येत्या काही दिवसांत पूर्ण करणार असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य हेमंत चित्ते यांनी दिली.  अंबरनाथच्या पी. डी. कारखानीस महाविद्यालयाने संपूर्ण महाविद्यालयाची स्वच्छता केली आहे. ज्या विद्यार्थ्यांचे लसीकरण झाले आहे, त्यांनाच प्रवेश दिला जाणार आहे. त्याचबरोबर ज्यांचे लसीकरण झाले नाही त्यांच्यासाठी पालिकेच्या मदतीने लसीकरण शिबीर राबविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. पुरव यांनी सांगितले.

कल्याण-डोंबिवलीतील महाविद्यालयांत संभ्रम

महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय हा स्थानिक पातळीवर देण्यात आला असून कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील महाविद्यालयांना अद्याप स्थानिक प्रशासनाचे आदेश आले नसल्यामुळे या शहरातील महाविद्यालय व्यवस्थापकांमध्ये महाविद्यालये सुरू करण्याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.