उल्हासनगर : वाढत्या प्रदूषणामुळे गटारगंगा झालेल्या वालधुनी नदीच्या रंगात दिवसागणिक बदल होत असतो. कोणतीही प्रक्रिया न केलेले सांडपाणी थेट नदीत सोडले जात असल्याने रविवारी सकाळच्या सुमारास वालधुनी नदीचा रंग गुलाबी झाला होता. उल्हासनगर रेल्वे स्थानकात शेजारून जाणाऱ्या वालधुनी नदी बिरादरीच्या हरी चावला यांनी हे चित्र त्या वेळात कैद केले. सुट्टीच्या दिवसात अशा प्रकारे सांडपाणी सोडल्याचे प्रकार वारंवार दिसून आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे जिल्ह्यातील सर्वात प्रदूषित नदी म्हणून वालधुनी नदीकडे पाहिले जाते. अंबरनाथ तालुक्यातील टाहुलीच्या डोंगरात उगम पावणाऱ्या या वालधुनी नदीवर अंबरनाथच्या अतिरिक्त औद्योगिक वसाहती शेजारी भारतीय रेल्वेचे जीआयपी धरण आहे. येथील पाण्याचा वापर करून रेल निर हे बाटलीबंद पाणी रेल्वे प्रशासन प्रत्येक स्थानकावर पुरवते. मात्र त्यापुढे नदीमध्ये औद्योगिक सांडपाणी आणि नागरी सांडपाणी मिसळत असल्याने वालधुनी नदीची गटारगंगा होते. प्राचीन शिवमंदिर याच वालधुनी नदीवर सुमारे हजार वर्षांपूर्वी उभारण्यात आले आहे. मात्र गेल्या काही वर्षात वालधुनी नदीच्या प्रदूषणात वाढ झाली आहे.

हेही वाचा : खड्डय़ांमुळे नवजात अर्भक दगावले; रुग्णालयात पोहोचण्यास विलंब; भिवंडी तालुक्यातील घटना

शहरातील, शहराबाहेरून आणि परराज्यातून येणाऱ्या रासायनिक सांडपाण्याच्या टँकरचा निचरा या वालधुननीत अनेकदा केला गेला. आजही अनेक कारखान्यांमधून वालधुनी नदीत सांडपाणी सोडले जाते. त्यामुळे अनेकदा वालधुनी नदीच्या पाण्याचा रंग बदललेला दिसतो. रविवारी अशाच प्रकारे उल्हासनगर रेल्वे स्थानकाशेजारी वाहणाऱ्या वालधुनी नदीचा रंग गुलाबी झाल्याचे दिसून आले. वालधुनी नदी बिरादरीचे हरी चावला यांनी सकाळी साडेसातच्या सुमारास गुलाबी झालेल्या वालधुनी नदीचे छायाचित्र टिपले. त्यामुळे आजही छुप्या पद्धतीने रासायनिक आणि प्रक्रिया न केलेले सांडपाणी थेट वालधुनी नदीत सोडले जात असल्याचे दिसून आले आहे.

हेही वाचा : ठाण्यातील खोपट भागात घरावर झाड पडले ; दोघेजण जखमी

सुट्टीचा गैरफायदा

शनिवार आणि रविवार किंवा इतर सणाच्या निमित्ताने आलेल्या सुट्टीचा फायदा घेत प्रदूषणकारी घटक सोडले जात असल्याचे दिसून आल्याची माहिती वालधुनी जलबिरादरीचे शशिकांत दायमा यांनी दिली आहे. सकाळच्या सुमारास किंवा पाऊस सुरू असताना हे सांडपाणी सोडले जाते. काही तासातच हे पाणी वाहून जात असल्याने सातत्याने असले प्रकार केले जात आहेत, असेही दायमा यांनी सांगितले आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Colour of valudhani river is blue suspicion of release of untreated chemical effluent in ulhasnagar tmb 01
First published on: 04-09-2022 at 11:26 IST