बदलापुरातील बाजारपेठ परिसरात तुंबलेल्या पाण्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत असतानाच याबद्दल फेसबुकवर ‘पोस्ट’ टाकणाऱ्या शहरातील मनसे महिला पदाधिकारी व नगराध्यक्ष यांच्यात जुंपली. नगराध्यक्षांनी तक्रारीच्या ‘पोस्ट’वर अपशब्द वापरल्याचा आरोप मनसेच्या संगीता चेंदवणकर यांनी केला आहे, तर खोटय़ा आरोपांवर प्रतिक्रिया दिल्याचे स्पष्टीकरण नगराध्यक्षांनी दिले आहे.

बदलापूर पश्चिम रेल्वे स्थानकालगत असलेल्या बाजारपेठेत गेल्या आठवडाभरापासून पावसाने चांगलेच पाणी तुंबते आहे. बाजारपेठेतील कारवाईनंतर बांधकामाच्या साहित्यामुळे येथील नाला बुजला गेल्याने तसेच नाल्याचे काम अपूर्ण राहिल्याने पाणी रस्त्यावर येत आहे. त्यासंदर्भात बदलापूर चेंदवणकर यांनी नालेसफाईचा बोजवारा उडाला असून नगरसेवक मात्र दार्जिलिंग, काठमांडू येथे अभ्यास दौऱ्यावर असल्याची प्रतिक्रिया फेसबुकवर टाकली होती. तसेच यासह नगरसेवक कंत्राटातील काही टक्केवारी घेऊन फिरायला जातात, असाही आरोप यावेळी पोस्टवर होता. यावर नगराध्यक्ष  म्हात्रे प्रतिक्रियेत ‘औकात’ या शब्दाचा वापर केल्याने बदलापूरमधील नेटिझन्सनी समाज माध्यमावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या;  मात्र अपशब्दांचा वापर केल्याचे लक्षात येताच त्यांनी  प्रतिक्रिया फेसबुकवरून  काढून टाकली. मात्र  चेंदवणकर यांनी या गोष्टीचा निषेध करत असमाधानकारक कामांवर नाराजी दाखवणे हा सर्वसामान्यांचा अधिकार असल्याचे सांगितले. तसेच शहराच्या प्रथम नागरिकाने खालच्या पातळीवर येऊन बोलणे हे अशोभनीय असल्याचेही त्यांनी सांगितले. याबाबत वामन म्हात्रे यांनी कोणतीही माहिती न घेता केलेल्या बिनबुडाच्या आरोपांवर मी प्रत्युत्तर दिल्याचे त्यांनी सांगितले. मला अपशब्द वापरायचा नव्हता, फक्त बौद्धिक कुवत कमी असल्याचे सांगायचे होते, असेही त्यांनी सांगितले.