मध्य आशियातील संघर्षजन्य परिस्थिती आणि जागतिक इंधन बाजारातील अस्थिरता याचा थेट परिणाम आता सर्वसामान्य हॉटेल आणि खानावळ व्यावसायिकांवर होताना दिसत आहे. केंद्र सरकारकडून व्यावसायिक वापराच्या गॅस सिलिंडरच्या दरात गेल्या आठवड्यात तब्बल ९९३ रुपयांच्या करण्यात आलेल्या मोठ्या दर वाढीमुळे हॉटेल व्यवसाय, लहान खानावळी आणि घरगुती जेवण पुरवणाऱ्या महिला बचत गटांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. सिलिंडरच्या दरात झालेल्या वाढीमुळे व्यवसायाचा ताळमेळ बिघडला असून आता अनेकांनी खाद्यपदार्थांच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. काही लहान खानावळ चालक मात्र व्यवसाय काही काळासाठी बंद करण्याच्या विचारात असल्याची माहिती त्यांनी लोकसत्ताशी संवाद साधताना दिली.
मध्य आशियातील देशांमध्ये गेल्या काही काळात निर्माण झालेला लष्करी संघर्ष आणि परिणामी ऊर्जा पुरवठा साखळीतील अडथळ्यांचा परिणाम जगभरातील इंधन बाजारावर झाला. नैसर्गिक वायू आणि पेट्रोलियम उत्पादनांच्या पुरवठ्यात अनिश्चितता निर्माण झाल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात ऊर्जा दर सातत्याने वाढत गेले. त्याचा थेट परिणाम भारतातील एलपीजी आणि विशेषतः व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरांवर दिसून आला. हॉटेल उद्योगासाठी हा काळ अत्यंत कठीण ठरला. एकीकडे व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर सातत्याने वाढत होते, तर दुसरीकडे ग्राहकांची संख्या कमी होत होती. गॅसच्या वाढत्या खर्चामुळे अनेक लहान हॉटेल, खानावळी, डब्बा सेवा आणि रस्त्यावरील खाद्य व्यवसायिकांचे आर्थिक गणित पूर्णपणे बिघडले.
काही व्यावसायिकांनी खर्च कमी करण्यासाठी यादीतील पदार्थ कमी केले, तर काहींना व्यवसाय तात्पुरता बंद ठेवण्याचा निर्णय घ्यावा लागला. यामुळे ठाणे, मुंबई, कल्याण, डोंबिवली आणि नवी मुंबई परिसरातील अनेक हॉटेलमध्ये काम करणारे कामगार आपल्या मूळ गावी परतल्याचे चित्र दिसून आले. उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल तसेच महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील अनेक कामगार रोजगाराची अनिश्चितता पाहता गावाकडे परतले. कामगारांची संख्या कमी झाल्याने हॉटेल व्यावसायिकांसमोर आणखी मोठे संकट निर्माण झाले. एकीकडे गॅसचे वाढते दर आणि दुसरीकडे कुशल मनुष्यबळाची कमतरता यामुळे अनेक हॉटेल्सची सेवा विस्कळीत झाली. काही ठिकाणी हॉटेलच्या वेळा कमी करण्यात आल्या, तर काही ठिकाणी पूर्ण क्षमतेने व्यवसाय चालवणे अशक्य झाले. यातच आता त्यांना लागणाऱ्या व्यावसायिक सिलिंडरच्या दरात वाढ झाल्याने हॉटेल आणि खानावळ चालक मोठया संकटात सापडले आहेत.
सध्या एका व्यावसायिक गॅस सिलिंडरसाठी सुमारे ३ हजार रुपयांपर्यंत खर्च करावा लागत असल्याने लहान व्यावसायिकांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे. “एक सिलिंडर घेण्यासाठी जेवढा खर्च होतो, तेवढा तर आमचा नफा देखील नसतो,” अशी भावना काही महिला खानावळ चालकांनी व्यक्त केली आहे. घरगुती स्वरूपात सुरू केलेल्या या खानावळी अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह चालवत होत्या. मात्र सतत वाढणारा गॅस खर्च यामुळे हा व्यवसाय आता तोट्यात जात असल्याचे चित्र आहे. काही खानावळ चालकांनी चपाती, भाजी, वरण-भात, नाश्त्याचे पदार्थ तसेच इतर नियमित खाद्यपदार्थांच्या किंमतीमध्ये वाढ केली आहे. सुमारे ७ रुपयांना मिळणारी चपाती १० रुपये केली आहे. ३० ते ३५ रुपयांना मिळणारी भाजी ४० रुपये इतकी केली आहे. तर वरण भात हा ६० ते ७० रुपयांना मिळत होता त्याचे दर आता ८० ते ९० करण्यात आले आहे.
याचा सर्वाधिक फटका हा विद्यार्थ्यांना, नोकरीसाठी बाहेर राहणाऱ्या तरुणांना, कामगार वर्गाला आणि रोज खानावळीवर अवलंबून असणाऱ्या मध्यमवर्गीय नागरिकांना बसत आहे. दररोज बाहेरचे जेवण घेणाऱ्या हजारो नागरिकांच्या मासिक खर्चात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
ठाणे शहरासह परिसरातील अनेक हॉटेल व्यावसायिकांनीदेखील या दरवाढीचा गंभीर परिणाम होत असल्याचे सांगितले आहे. हॉटेल चालक संघटनांनी स्पष्ट संकेत दिले आहेत की, उत्पादन खर्चात सातत्याने वाढ होत असल्यामुळे खाद्यपदार्थांच्या दरात वाढ करणे अपरिहार्य ठरणार आहे. हॉटेल व्यावसायिक आणि खानावळ धारकांनी सरकारकडे व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरवाढीचा फेरविचार करण्याची मागणी केली आहे. “जर ही दरवाढ तातडीने कमी झाली नाही, तर व्यवसाय टिकवणे अशक्य होईल. नफा तर दूरच, फक्त तोटा सहन करत व्यवसाय चालवावा लागेल,” अशी प्रतिक्रिया काही हॉटेल व्यावसायिकांनी दिली आहे.
व्यावसायिक सिलिंडरच्या दरात झालेली वाढ हे अत्यंत गैर आहे. आधीच गॅस टंचाईमुळे आमचे हॉटेल व्यवसाय मोठया संकटात सापडले आहेत. कामगार गावी परतल्याने अधिकच्या ग्राहकांना सेवा देणे देखील बंद झाले आहे. त्यात ही इतक्या मोठ्या प्रमाणात झालेली वाढ हॉटेल चालक सहन करू शकत नाही. यामुळे खाद्यपदार्थांचे दर वाढविण्याशिवाय कोणताही दुसरा पर्याय नाही. – रघुनाथ राय, सचिव, ठाणे हॉटेल संघटना
