कल्याण : कल्याणमधील पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात सोमवारी रुग्णवाहिके अभावी एक कष्टकरी महिलेचा मृत्यू झाला. या घटनेची गंभीर दखल घेत आयुक्त अभिनव गोयल यांनी मंगळवारी संध्याकाळी रुक्मिणीबाई रुग्णालयातील रुग्णसेवा आणि व्यवस्थापन विषयावर चार तास अधिकाऱ्यांची बैठक घेतली. बुधवारी सकाळी सव्वा नऊ वाजता आयुक्त गोयल यांनी अचानक रुक्मिणीबाई रुग्णालयाला भेट दिली. उपस्थित डाॅक्टर आणि विविध विभागातील कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेतली.

रुक्मिणीबाई रुग्णालयात रुग्णवाहिकेअभावी गरीब महिलांचा मृत्यू होण्याची गेल्या दोन वर्षातील ही दुसरी घटना आहे. या विषयावरून आमदार विश्वनाथ भोईर, ठाकरे गटाचे शहरप्रमुख विजय साळवी, ठाकरे गटाचे डोंबिवली जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे, माजी नगरसेवक महेश गायकवाड आणि इतर राजकीय पदाधिकाऱ्यांनी प्रशासनावर टीकेची झोड उठवली आहे. बुधवारी सकाळी आयुक्त गोयल यांंनी पालिका मुख्यालयात जाण्याऐवजी आपला दौरा रुक्मिणीबाई रुग्णालयात वळविला.

बाह्य रुग्ण विभागाची वेळ सकाळी नऊची असताना त्या दालनात आयुक्तांना डाॅक्टर आढळले नाहीत. रुग्णालयात बायोमेट्रिक हजेरी कर्मचारी करत नसल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास आले. कार्यालयीन वेळेत आस्थापनेवरील आणि बाह्यस्त्रोत संस्थेतील डाॅक्टर रुग्णालयात उपस्थित नव्हते.आयुक्त अचानक रुग्णालयात आल्याने कर्मचाऱ्यांची पळापळ झाली. आयुक्तांची माहिती मिळताच इतर अधिकारी रुग्णालयाच्या दिशेने धावतपळत आले. रुग्णालयातील प्रत्येक विभाग, रुग्ण कक्ष, औषध कक्ष, क्ष किरण यंत्र, शस्त्रक्रिया गृहात जाऊन आयुक्तांनी रुग्ण सेवेची माहिती घेतली. यावेळी उपायुक्त प्रसाद बोरकर, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डाॅ. दीपा शुक्ल, मुख्य वैद्यकीय अधिकारी डाॅ. संदीप पगारे उपस्थित होते.

जिल्हा परिषद आरोग्य सेवेचा अनुभव असल्याने आयुक्त गोयल यांनी उपस्थित डाॅक्टरांवर आरोग्य सेवाविषयक प्रश्नांचा भडीमार करून त्यांना फैलावर घेतले. वैद्यकीय विभागाच्या प्रमुखांचा रुग्णसेवा, वैद्यकीय सुविधांकडे लक्ष नाही या विषयावरून आयुक्तांनी वैद्यकीय विभाग प्रमुखांना फैलावर घेतले. गैरहजर कर्मचाऱ्यांची नावे नोंदून घेण्यात आली. औषध साठा कक्षात आयुक्तांनी औषधे ऑनलाईन माध्यमातून दिसण्याची सुविधा का उपलब्ध करून दिली नाही. औषधे अक्षरी क्रमवारीप्रमाणे का लावली नाहीत, असे प्रश्न केले.

आयुक्तांचे आदेश

रुग्णवाहिका तात्काळ दुरुस्त करून घेणे, वाहन चालकांनी सेवा टाळल्यास कारवाई. स्त्रीरोग तज्ज्ञांची बाह्य रुग्ण सेवा तातडीने सुरू करावी. डाॅक्टरांसह कर्मचाऱ्यांनी वेळेत उपस्थितीसाठी बायोमेट्रिक पध्दत सुरू करावी. बायोमेट्रिक हजेरीप्रमाणे वेतन अदा करावे. औषध साठ्यांवर संगणक प्रणालीतून नियंत्रण ठेवावे. प्रसूती सेवा रुग्णालयात सुरू करावी.

पालिका रुग्णालयात रुग्णांना गुणवत्तापूर्ण तत्पर सेवा मिळाली पाहिजे. या कामात हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कठोर कारवाई प्रस्तावित केली जाईल. -अभिनव गोयल आयुक्त.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आयुक्त अचानक रुक्मिणीबाई रुग्णालयात आले होते. रुग्णसेवा, वैद्यकीय साधनांची माहिती त्यांनी घेतली. दर्जेदार रुग्णसेवा देण्याबाबत, रुग्णालयात आवश्यक वैद्यकीय सुविधा तत्परतेने उपलब्ध करून घेण्याच्या सूचना केल्या. आयुक्तांच्या सूचनेप्रमाणे रुग्णालयात रुग्णसेवेविषयी आवश्यक बदल केले जातील.- डाॅ. संदीप पगारे प्रभारी मुख्य वैद्यकीय अधिकारी,रुक्मिणीबाई रुग्णालय.