ठाणे : महापालिकेत प्रशासकीय राजवट अस्तित्वात येताच कोपरी, वागळे इस्टेट परिसरात दौऱ्यांचा रतीब मांडणारे आयुक्त विपीन शर्मा यांनी कळवा मुंब्र्याकडे पाठ फिरविल्याची चर्चा येथील राजकीय वर्तुळात व्यक्त होत होती. शिवसेना आणि राष्ट्रवादीतील धुसफूसची त्यास किनार असल्याचे बोलले जात होते. या चर्चांना पूर्ण विराम देत आयुक्तांनी बुधवारी मुंब्र्यात अडीच तास दौरा करत येथील विकासकामांचा आढावा घेतला. या दौऱ्याच्या निमित्ताने आयुक्त अखेर मुंब्य्रात प्रकटल्याची चर्चा सुरु झाली आहे.

ठाणे महापालिकेत प्रशासकीय राजवट लागू झाल्यानंतर पालिकेचे प्रशासक म्हणून काम पाहणारे आयुक्त शर्मा हे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने दौरे करत आहेत. यामध्ये ते विकासकामांबरोबरच पावसाळ्यापुर्वीच्या कामांचा आढावा घेत आहेत. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदार संघात कोपरी आणि वागळे इस्टेटचा भाग येतो. या भागात आयुक्त शर्मा हे सातत्याने दौरे करून विकासकामांचा आढावा घेत आहेत. त्याचबरोबर घोडबंदर, ठाणे शहर आणि वर्तकनगर भागात दौरे करून नालेसफाईबरोबरच रस्ते कामांची माहिती घेत आहेत. कोपरी, वागळे इस्टेट परिसरात दौऱ्यांचा रतीब मांडणारे आयुक्त शर्मा यांनी मात्र कळवा मुंब्र्याकडे पाठ फिरविल्याची चर्चा होती. खारेगाव उड्डाण पुलाच्या श्रेयावरून शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यातील वाद झाले होते. त्यात या पुलाच्या उद्घाटन कार्यक्रम ठरविताना विश्वासात घेतले नसल्याचा आऱोप राष्ट्रवादीने केला होता. तसेच दिव्यातील एमएमआरडीए घोटाळ्यातील आरोपींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादीने पालिका मुख्यालयासमोर उपोषण केले होते. त्यांना भेटण्यासाठी पालिकेचा एकही अधिकारी आला नव्हता. यावरून राष्ट्रवादीने आयुक्तांवर टिका केली होती. त्याचबरोबर शिवसेना शाखांमध्ये सुरु करण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेवरून भाजपने आयुक्तांवर टिका केली होती. शिवसेनेचे आयुक्त अशी टिका त्यांच्यावर सातत्याने होत आहे. यामुळेच त्यांचे कळवा -मुंब्य्रात दौरे होत नसल्याची चर्चा शहरात सुरु होती. मात्र, या चर्चांना पूर्ण विराम देत आयुक्तांनी बुधवारी मुंब्र्यात अडीच तास दौरा करत येथील विकासकामांबरोबरच आढावा घेतला. या पाहणी दौऱ्यास अतिरिक्त आयुक्त  संदीप माळवी, संजय हेरवाडे, उपायुक्त मनीष जोशी, जी.जी गोदेपुरे, सहाय्यक आयुक्त सागर साळुंखे, माजी नगरसेवक राजन किणे तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी बुधवारी मुंब्रा आणि दिवा परिसरातील नालेसफाईबरोबरच रस्ते कामांची पाहणी केली. या दौऱ्यादरम्यान साफसफाई  करण्याबरोबरच रस्त्यांची अपूर्ण कामे तातडीने पूर्ण करण्याचे आणि अनधिकृत पोस्टर्स, बॅनर्स हटविण्याचे आदेश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. रेतीबंदर- दत्तवाडी या नव्याने बांधण्यात आलेल्या रस्त्याची पाहणी करुन हा रस्ता वाहतुकीसाठी आजपासून सुरू करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. मुंब्रा परिसरातील रेतीबंदर, राणानगर तसेच मुंब्रा रेल्वेस्थानक येथील नाल्यांची पाहणी केली. डोंगरावरुन येणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर नाल्यात वाहून येणाऱ्या कचऱ्यासाठी बसविण्यात आलेल्या जाळ्याची त्यांनी पाहणी केली. तसेच नालेसफाईच्या कामाबाबत समाधान व्यक्त करत अतिवृष्टीच्या काळात सतर्क राहण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. रेतीबंदर, बॉम्बे कॉलनी, सम्राटनगर, आंबेडकरनगर, शिवाजीनगर, रईसबाग, अमृतनगर, दिवा येथील रशीद कंपाऊंड, कादर पॅलेस, चाँदनगर नाला, किस्मत कॉलनी या ठिकाणचीही त्यांनी पाहणी केली. शहरातील विविध ठिकाणी साफसफाई करण्याचे आदेशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. महापालिकेच्या कौसा रुग्णालयाचीही त्यांनी पाहणी केली. या ठिकाणी सुरू असलेल्या बाह्य रुग्ण कक्षाची माहिती घेऊन परिसरातील रुग्णांसाठी या रुग्णालयात डायलेसीस सेंटर सुरू करण्याचे आदेश त्यांनी दिले.