पावसाळा तोंडावर आला आहे. पाऊस सुरू होण्यापूर्वी कल्याण, डोंबिवली, टिटवाळा, २७ गाव परिसरातील सर्व मोठे नाले, प्रभागांमधील गटार सफाईंची कामे येत्या १० दिवसात पूर्ण झाली पाहिजेत. इतर कामे बाजूला ठेऊन पूर्णवेळ या नालेसफाईच्या कामांवर लक्ष केंद्रीत करा, असे आदेश आयुक्त डाॅ. विजय सूर्यवंशी यांनी जल, मलनिस्सारण विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.

आयुक्तांकडून कामाची पाहाणी

पालिका हद्दीत नालेसफाईची कामे सुरू आहेत. आयु्क्त सूर्यवंशी, शहर अभियंता सपना कोळी, कार्यकारी अभियंता घनश्याम नवांगुळ यांनी पालिका हद्दीतील नालेसफाईच्या कामांची गुरूवारी पाहणी केली. पाऊस सुरू होण्यापूर्वी शहरातील सर्व मोठे, मध्यम, लहान नाले आणि प्रभागातील गटार सफाईची कामे पूर्ण झाली पाहिजेत, असे आदेश सूर्यवंशी यांनी अधिकाऱ्यांना दिले.

नालेसफाईच्या कामाची पहाणी करताना आयुक्तांसह इतर अधिकारी

काढलेल्या गाळाची विल्हेवाट लावा
गटार, नाल्यांमधून काढलेला गाळ दोन दिवस सुकल्यानंतर तो तातडीने उचलून इच्छित स्थळी टाकण्यात यावा. नाले, गटारातून काढलेल्या गाळामुळे कोणत्याही रहिवासी, सोसायटीला त्रास होणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेश आयुक्तांनी ठेकेदार, अधिकाऱ्यांना दिले.

पालिका हद्दीत ९७ मोठे नाले
आतापर्यंत नालेसफाई, गटार सफाईची तीस टक्के कामे पूर्ण झाली आहेत. नाल्यांच्या काठावरील गाळ सुकल्यानंतर दोन दिवसात तो ठेकेदाराकडून उचलला जातो. काढलेला गाळ पुन्हा नाल्यात जाणार नाही याची काळजी घेतली जात आहे. नालेसफाईच्या कामावर उपअभियंता, साहाय्यक अभियंता पर्यवेक्षण करत आहेत, अशी माहिती जलनिस्सारण विभागाचे कार्यकारी अभियंता नवांगुळ यांनी आयुक्तांना दिली.

कल्याणमध्ये ९७ मोठे नाले
कल्याणमधील सांगळेवाडीतील जरीमरी नाला, खंबाळपाडा नाला, नांदिवली येथील स्वामी विवेकानंद शाळेजवळील नाला, कल्याण पूर्वेतील लोकग्राम नाला, खडेगोळवली नाला या नाल्यांच्या सफाई कामाची पाहणी करण्यात आली. पालिका हद्दीत ९५ किलोमीटर लांबीचे ९७ मोठे नाले आहेत.