येऊरची प्राणी गणना यंदा सामान्यांना खुली

जंगलातील जैवविविधतेचे परीक्षण करण्याची संधी यंदाच्या वर्षी सर्वसामान्य ठाणेकरांनाही उपलब्ध होणार आहे.

Two person, arrested, hunting deer, nandurba
प्रातिनिधीक छायाचित्र

२५ जणांची लॉटरी पद्धतीने निवड होणार; पाणवठय़ांभोवती कॅमेरे
जंगलातील जैवविविधतेचे परीक्षण करण्याची संधी यंदाच्या वर्षी सर्वसामान्य ठाणेकरांनाही उपलब्ध होणार आहे. दरवर्षी बुद्धपौर्णिमेच्या दिवशी वनविभागामार्फत जंगलातील प्राण्यांच्या गणनेचा मोठा कार्यक्रम हाती घेण्यात येतो. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे एक टोक असलेल्या येऊर जंगलात गेल्या वर्षीपर्यंत पाणथळ्यांभोवती कॅमेरे बसवून त्या माध्यमातून प्राणी गणना केली जात असे. यंदा मात्र वनविभागाचे अधिकारी प्रत्यक्ष मचाण उभारून ही गणना करणार असून या उपक्रमात २५ नागरिकांना सहभागी करून घेतले जाणार आहे. येऊरच्या जंगलात प्रथमच प्राणी गणनेचे दालन नागरिकांसाठी खुले करून दिले जात आहे.
रात्रीची निरव शांतता, चांदण्याच्या लख्ख प्रकाशात स्वच्छ भासणारे जंगलातील पाणवठे, मनात धाकधूक निर्माण करणारी रातकिडय़ांची कुजबुज अशा निसर्गरम्य शांत वातावरणात जंगलातील जैवविविधतेचे निरीक्षण करणे ही पर्यावरणप्रेमींसाठी पर्वणीच म्हणता येईल. बुद्धपौर्णिमेच्या दिवशी वनविभागामार्फत राज्यभरातील जंगल परिसरात प्राण्यांची गणना केली जाते. वनविभागातर्फे नेमण्यात आलेल्या समितीमार्फत प्रत्यक्ष जंगलस्थळी उपस्थित राहून प्राण्यांची नोंद घेतली जाते. येऊर वनविभागातर्फे गेली अनेक वर्षे हा उपक्रम कॅमेऱ्याच्या माध्यमातून राबविला जात होता. यंदा मात्र वनविभाग आणि सामाजिक संस्था यांच्या एकत्रित कृतीतून २१ मे रोजी येऊर जंगलात प्रत्यक्ष जंगलस्थळी उपस्थित राहून येऊरमधील प्राण्यांची गणना करण्यात येणार आहे. वनविभागाच्या या निर्णयामुळे पर्यावरणप्रेमींकडून आनंद व्यक्त केला जात आहे. वनविभागाकडे उपक्रमासाठी नोंदणी केलेल्या नागरिकांपैकी लॉटरीच्या माध्यमातून पंचवीस नागरिकांची निवड करण्यात येणार आहे. यामध्ये नागरिकांचा रक्तगट, शारीरिक आणि मानसिक स्थिती, संपर्क क्रमांक याची नोंद घेण्यात येणार आहे. येऊरमधील मानवी हस्तक्षेप रोखण्यासाठी वनविभागातर्फे बांधण्यात आलेली संरक्षित भिंत, प्राण्यांसाठी स्वच्छ केलेले पाणवठे या उपक्रमांचा सकारात्मक परिणाम प्राण्यांच्या अधिवासावर झाला आहे का हे तपासण्यासाठी ही गणना महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

जैवविविधता निरीक्षणासाठी नियम
येऊर जंगलात जैवविविधता निरीक्षणासाठी निश्चित केलेल्या प्रत्येक ठिकाणी वनविभागाचा एक कर्मचारी आणि संस्थेचे एक प्रतिनिधी आणि वनविभागाकडून निवडण्यात आलेले नागरिक उपस्थित राहू शकतात.
भ्रमणध्वनी बंद ठेवणे.
प्राणी निरीक्षण करत असताना प्राण्यांचे वास्तव्य असणाऱ्या ठिकाणी भ्रमणध्वनी, बॅटरीचा प्रकाश जाणार नाही याची काळजी घेणे.
छायाचित्रणाला परवानगी नाही.
पांढरे कपडे परिधान न करता निसर्गाशी साधम्र्य साधणारे कपडे परिधान करणे.
दुर्बिणीच्या साहाय्याने प्राणी निरीक्षण करण्यात येईल.
पाणवठय़ापासून काही अंतरावर बसून किंवा एखाद्या मोठय़ा झाडावर बसून प्राण्यांची गणना केली जाईल.
प्राण्यांची गणना अशी..
उन्हाळ्यात दोनदा प्राणी पाणवठय़ावर येतात. २१ मे रोजी सायंकाळी ५ ते २२ मे रोजी सायंकाळी ५ पर्यंत वनविभागाचे कर्मचारी आणि काही सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी जंगलातील पाणवठय़ांवर एकत्रित येऊन दुर्बिणीच्या साहाय्याने प्राणी गणना करणार आहेत. वनविभागाने तयार केलेल्या प्रपत्राप्रमाणे वनविभागाचे कर्मचारी पाणवठय़ावर येणाऱ्या प्राण्यांची नोंद करणार आहेत. यात प्राण्यांची जात, प्राण्यांची वेळ, नर, मादी, एका जातीच्या किती प्राण्यांनी पाणवठय़ावर भेट दिली अशा बाबींची नोंद घेतली जाणार आहे.

रात्रीच्या वेळी जास्त प्राणी पाणवठय़ावर येतात. यासाठी रात्रीच्या वेळी प्राणीगणना करणे सोपे जाते. या उपक्रमात नागरिकांनी स्वत:च्या जबाबदारीवर सहभाग घ्यावा. जंगलस्थळी प्राणीगणना होत असल्याने एखादी आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास परिस्थितीशी सामना करण्याची तयारी नागरिकांमध्ये असावी. शारीरिक आणि मानसिकरीत्या कमकुवत असणाऱ्या नागरिकांनी उपक्रमात सहभागी होऊ नये.
उदय ढगे, साहाय्यक वनसंरक्षक, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Common man can watch animal count in yeoor

ताज्या बातम्या