तिकीट नाकारल्याने ठाणे, डोंबिवली, कल्याण स्थानकांत प्रवासी संतप्त; उग्र आंदोलनाचा इशारा

कल्याण : डोंबिवली, कल्याण रेल्वे स्थानकांत शुक्रवारी सकाळी रेल्वे तिकीट खिडक्यांवर महत्त्वाच्या, वैद्यकीय कामासाठी बाहेर पडलेल्या सामान्य प्रवाशांना तिकीट मास्तरांनी तिकीट देण्यास नकार दिला. त्यामुळे कल्याण, डोंबिवली रेल्वे स्थानकांवर प्रवाशांनी सकाळी गोंधळ घातला. निर्बंध शिथील झाल्याने वाढलेल्या प्रवासी संख्येमुळे मध्य रेल्वे मार्गावर १०० टक्के क्षमतेने लोकल फेऱ्या वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी प्रवाशांसाठी पासची सक्ती कायम असल्याने प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर आहे. ठाणे रेल्वे स्थानकातही यावरून काही प्रवासी आक्रमक झाले होते.

कल्याण रेल्वे तिकीट खिडक्यांच्या बाहेर प्रवाशांची गर्दी उसळली होती. तिकीट नाकारल्याने प्रवाशांनी रेल्वे, शासनाच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. आवश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसह सामान्य नागरिकांकडे करोना प्रतिबंधाच्या दोन मात्रा घेतल्याचे साक्षांकित पत्र असल्याशिवाय रेल्वे तिकीट देऊ नये, असे निर्बंध शासनाने जाहीर केले आहेत. या निर्बंधांची कठोर अंमलबजावणी रेल्वे तिकीट तपासणीसांनी शुक्रवारपासून सुरू केली. तिकीट न काढता प्रवास केला तर तिकीट तपासणीस पकडून दंड वसूल करणार. तिकीट खिडक्यांवर तिकीट दिले जात नाही, अशा दुहेरी कोंडीत प्रवासी अडकले आहेत.

डोंबिवली रेल्वे स्थानकात शुक्रवारी सकाळपासून तिकीट देण्यास तिकीट मास्तरांनी नकार दिला. त्यामुळे प्रवासी संतप्त झाले. त्यांनी स्थानक व्यवस्थापकांच्या दालनाबाहेर गोंधळ घातला. गेल्या काही महिन्यांपासून रुग्णालयातील रुग्णाला मुंबई, ठाण्यात नेणे, अंत्यविधीसाठी जाणे किंवा इतर अत्यावश्यक कामांसाठी प्रवाशांकडील आवश्यक कागदपत्रे पाहून रेल्वे तिकीट दिले जात होते. शुक्रवारपासून हा प्रकार बंद करण्यात आल्याने महत्त्वाच्या कामासाठी रेल्वेने प्रवास करण्यासाठी निघालेल्या प्रवाशांची स्थानकांवर कोंडी झाली. सणासुदीच्या दिवसांत आप्त, नातेवाईकांकडे जावे लागते. तसेच व्यापाऱ्यांना आवश्यक वस्तू मुंबई, ठाण्यातून आणाव्या लागतात. त्यामुळे तिकीट देण्यात यावेत, अशी मागणी प्रवाशांनी केली.

‘किती पास काढायचे?’

शासकीय कार्यालयातील शिपाई, फिरतीची कामे करणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांना रेल्वेने विविध ठिकाणी प्रवास करावा लागतो. एखादा कर्मचारी कल्याण, डोंबिवली, बदलापूर भागात राहतो. तो आपल्या निवासाच्या ठिकाणापासून ते मंत्रालय किंवा शासकीय कार्यालय असलेल्या रेल्वे स्थानकापर्यंतचा रेल्वे पास काढतो. अशा कर्मचाऱ्यांना कार्यालयातून बोरिवली, वसई, डहाणू, पनवेल, वाशी भागांत जायचे असेल तर त्याने या प्रत्येक ठिकाणचा यापुढे रेल्वे पास काढायचा का, असे किती पास काढून अशा कर्मचाऱ्याने प्रवास करायचे, असा प्रश्न उपनगरी रेल्वे महिला प्रवासी संघाच्या अध्यक्षा लता अरगडे यांनी केला.