ठाणे : महापालिका क्षेत्रातील अनेक भागांत नालेसफाईची कामे सुरू झाली नसल्याची टीका होत असून या पार्श्वभूमीवर आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी मंगळवारी स्वत: रस्त्यावर उतरून तब्बल साडेपाच तासांचा दौरा करत संपूर्ण शहरातील नालेसफाईच्या कामांचा आढावा घेतला. शहरातील नालेसफाईची कामे ६५ ते ७० टक्के पूर्ण झाली असून उर्वरित कामे येत्या आठ दिवसांत पूर्ण केली जाणार आहेत, असा दावा आयुक्तांनी पाहणी दौऱ्यानंतर पत्रकारांशी बोलताना केला.
ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा हे गेल्या काही दिवसांपासून शहरात दौरे करून विविध कामांचा आढावा घेत आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी वागळे इस्टेट भागातील नालेसफाईच्या कामांची पाहणी केली होती. या दौऱ्यावेळी शिवसेना आणि भाजपच्या माजी नगरसेवकांकडून नालेसफाई कामांच्या तक्रारी प्राप्त होताच आयुक्त शर्मा यांनी संबंधित अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली होती. शहरात ४० ते ५० टक्के नालेसफाईची कामे पूर्ण झाल्याचा दावा त्यांनी या दौऱ्यादरम्यान केला होता. त्यानंतर शहरात काही ठिकाणी नालेसफाईच्या कामांना सुरुवात झालेली नसल्याचा दावा करत राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून टीका होऊ लागली होती.
आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांना अधिकारी नियोजित जागीच घेऊन जातात आणि सर्वत्र व्यवस्थित काम चालू असल्याचे भासवून आयुक्तांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात, असा आरोप काँग्रेसने केला होता. स्थानिक नागरिकांना बरोबर घेऊन दौरा करावा, अशी मागणी त्यांनी केली होती. या सर्वाच्या पार्श्वभूमीवर आयुक्त शर्मा यांनी कासारवडवली, पातलीपाडा, नळपाडा, उथळसर, नौपाडा, वागळे इस्टेट आणि वर्तकनगर भागातील नालेसफाईच्या कामांची पाहणी केली.
सकाळी ८ वाजता सुरू झालेला हा दौरा दुपारी १.३० वाजेपर्यंत सुरू होता. नाल्यातील वरवरचा कचरा काढू नका तर नाल्याची खोलवर सफाई करा आणि त्याचबरोबर नाल्यातून काढून ठेवलेला गाळ व कचरा तातडीने उचला, अशा सूचना त्यांनी दौऱ्यादम्यान दिल्या. नालेसफाईची उर्वरित कामे वेळेत पूर्ण करा, असे आदेशही त्यांनी दिले.
पंपांची व्यवस्था
नाल्यांमधील कचऱ्यामुळे पाणी तुंबून त्याचा नागरिकांना त्रास होणार नाही, याची काळजी प्रशासनाकडून घेतली जात आहे. शहरातील नालेसफाईची कामे ६५ ते ७० टक्के पूर्ण झाली असून उर्वरित कामे येत्या आठ दिवसांत पूर्ण केली जाणार आहेत. तसेच सखल भागांमध्ये साचणाऱ्या पाण्याचा निचरा करण्यासाठी पंपाची व्यवस्था करण्यात आली आहे, असे आयुक्त शर्मा यांनी सांगितले.