जमीन मालकांच्या विरोधामुळे प्रकल्प अडचणीत; सहा महिन्यांत भूसंपादन प्रक्रिया पूर्ण करण्याचा निर्धार

कल्याण : कल्याण तालुका हद्दीतून जात असलेल्या रेल्वे, रस्ते प्रकल्पांसाठी खासगी जमीन मालकांची जमीन आवश्यक आहे. या जमिनी ताब्यात घेण्यासाठी महसूल विभागाने थेट खरेदी योजना राबविल्या. मात्र या प्रक्रियेला शेतकरी, जमीन मालकांकडून अल्प प्रतिसाद मिळाला. त्यामुळे कल्याण परिसरातील रेल्वे, शासनाचे काही महत्त्वाचे रस्ते प्रकल्प अडचणीत आले आहेत. हे प्रकल्प वेळेत पूर्ण होण्यासाठी जमीन मालकांकडून सक्तीने भूसंपादन करून ताब्यात घेण्याचा निर्णय घेण्यात आला असून ही प्रक्रिया आठवडाभरात सुरू केली जाणार आहे, अशी माहिती कल्याणचे उपविभागीय अधिकारी अभिजीत भांडे-पाटील यांनी दिली.

कल्याण ते कसारा रेल्वे मार्गावरील तिसरी आणि चौथी मार्गिका, कल्याण ते बदलापूर दरम्यान तिसरी रेल्वे मार्गिका विकसित केली जाणार आहे. याशिवाय कल्याण-शिळफाटा रस्त्याच्या रुंदीकरण आणि काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. या रस्ते प्रकल्पासाठी जमीन मालकांकडून जमीन देण्यात येत नसल्याने हा रस्ते प्रकल्प तुकडे पद्धतीने करावा         लागत आहे. काही ठिकाणी रस्ते काम भूसंपादन नसल्याने थांबले आहे, अशी माहिती महसूल अधिकाऱ्याने दिली. येत्या चार ते पाच वर्षांत हे प्रकल्प पूर्ण करायचे असल्याने भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण केली नाही तर हे प्रकल्प रखडण्याची भीती आहे. त्यामुळे महसूल विभागाने सक्तीची भूसंपादन प्रक्रिया राबवून जमिनी ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या आठवड्यात ही प्रक्रिया सुरू केली जाणार आहे, असे उपविभागीय अधिकारी भांडे-पाटील यांनी सांगितले.

कल्याण ते कसारा रेल्वेच्या तिसऱ्या, चौथ्या मार्गिकेसाठी कल्याण तालुक्यातील ९.८४ हेक्टर जमीन संपादित केली जाणार आहे. त्यामध्ये राया, बेहरे, पितांबरे, वावेघर, खडवली, बल्याणी, गुरवली, चिंचवली, मोस, मोहने, अटाळी, आंबिवली, मांडा, चिकणघर या भागांतील जमिनींचा समावेश आहे. जाहीर नोटिशीद्वारे या शेतकऱ्यांना आवाहन करून थेट खरेदी प्रक्रियेत सहभागी होण्याबाबत महसूल विभागाने कळविले होते. त्याला अल्प प्रतिसाद मिळाला. ही प्रक्रिया पुढे गतिमान झाली नाही, असे अधिकाऱ्याने सांगितले. कल्याण ते बदलापूर तिसऱ्या मार्गिकेसाठी रेल्वे मार्गालगतच्या गावांमधील २५ एकर जमीन संपादित करायची आहे. हे प्रकल्प विहित वेळेत पूर्ण करण्यासाठी सक्तीने भूसंपादन करून त्याचा योग्य मोबदला लाभार्थींना दिला जाईल, असे महसूल अधिकाऱ्याने सांगितले. रेल्वे प्रकल्पासाठी जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांना मोबदला देण्यासाठी रेल्वे प्रशासनाने दोनशे कोटींच्या निधीची तरतूद केली आहे. कल्याण ते शिळफाटा रस्त्याच्या सहा पदरीकरणाचे काम गेल्या पाच वर्षांपासून सुरू आहे. या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी ७.१२ हेक्टर जमीन संपादित करायची आहे. या प्रकल्पासाठी २७ गावांतील निळजे, काटई, नेतिवली, कचोरे, सागाव, सोनारपाडा, घारीवली, माणगाव या गावांच्या हद्दीतील जमीन संपादन केली जाणार आहे.

कल्याण महसूल हद्दीतील रस्ते, रेल्वे प्रकल्पांसाठी खासगी जमीन मालकांच्या जमिनी आवश्यक आहेत. थेट खरेदी प्रक्रियेतून शेतकरी जमिनी देण्यास तयार नाहीत. थोड्याच शेतकऱ्यांनी या योजनेला प्रतिसाद दिला. त्यामुळे सक्तीचे भूसंपादन सुरू करण्यात येणार आहे. येत्या सहा महिन्यांत रस्ते, रेल्वे मार्गांसाठीच्या जमिनीचे संपादन केले जाईल. – अभिजीत भांडे-पाटील, उपविभागीय अधिकारी, कल्याण